श्री एकनाथी भागवत – (अध्याय आठवा)

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्‍गुरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचें घटित पाहसी ।

चिद्‍ब्रह्मेंसी लग्न लाविशी । पुण्येंसी तत्त्वतां ॥१॥

वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं ।

आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥

लग्न लाविती हातवटी । पांचां पंचकांची आटाटी ।

चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका प्रतिष्ठी निजबोधें ॥३॥

चहूं पुरुषार्थांचें तेलवण । लाडू वळिले संपूर्ण ।

अहंभावाचें निंबलोण । केलें जाण सर्वस्वें ॥४॥

साधनचतुष्ट्याचा सम्यक । यथोक्त देऊन मधुपर्क ।

जीवभावाची मूद देख । एकाएक सांडविली ॥५॥

विषयसुख मागें सांडे । तेंचि पायातळीं पायमांडे ।

सावधान म्हणसी दोंहीकडे । वचन धडफुडें तें तुझें ॥६॥

व्यवधानाचें विधान तुटे । सहजभावें अंत्रपटु फिटे ।

शब्द उपरमोनि खुंटे । मुहूर्त गोमटे पैं तुझें ॥७॥

अर्धमात्रा समदृष्टी । निजबिंबीं पडे गांठी ।

ऐक्यभावाच्या मीनल्या मुष्टी । लग्नकसवटी अनुपम ॥८॥

तेथ काळा ना धवळा । गोरा नव्हे ना सांवळा ।

नोवरा लक्षेना डोळां । लग्नसोहळा ते ठायीं ॥९॥

परी नवल कैसें कवतिक । दुजेनवीण एकाएक ।

एकपणीं लग्न देख । लाविता तूं निःशेख गुरुराया ॥१०॥

तुज गुरुत्वें नमूं जातां । तंव आत्मा तूंचि आंतौता ।

आंतु कीं बाहेर पाहों जातां । सर्वीं सर्वथा तूंचि तुं ॥११॥

तुझें तूंपण पाहतां । माझें मीपण गेलें तत्त्वतां ।

ऐसें करूनियां गुरुनाथा । ग्रंथकथा करविसी ॥१२॥

मागील कथासंगती । सप्तमाध्यायाचे अंतीं ।

अवधूतें यदूप्रती । कथा कपोती सांगीतली ॥१३॥

पृथ्वी-आदिअंतीं चोखट । कपोतापर्यंत गुरु आठ ।

सांगितले अतिश्रेष्ठ । गुरु वरिष्ठ निजबोधें ॥१४॥

उरल्या गुरूंची स्थिती । अवधूत सांगेल यदूप्रती ।

तेथें सावधान ठेवा चित्तवृत्ती । श्रवणें स्थिति तद्‍बोधें ॥१५॥

श्रीब्राह्मण उवाच ।

सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च ।

देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः ॥ १ ॥

श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी ।

तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥१६॥

तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन ।

तें स्वर्गनरकीं गा समान । नाहीं अनुमान ये अर्थी ॥१७॥

भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गीं इंद्रासी ।

तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी । सूकरीपासीं निश्चित ॥१८॥

हें जाणोनि साधुजन । उभय भोगीं न घालिती मन ।

नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥१९॥

जीत सापु धरावा हातीं । हें प्राणियांसी नुपजे चित्तीं ।

तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥२०॥

जैसें न प्रार्थितां दुःख । प्राणी पावताति देख ।

तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥२१॥

मज दुःखभोगु व्हावा । हें नावडे कोणाच्या जीवा ।

तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा अदृष्टें ॥२२॥

ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा ।

यालागीं सांडूनि विषयआस्था । परमार्था भजावें ॥२३॥

केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर ।

येच निर्धारीं साचार । गुरु 'अजगर' म्यां केला ॥२४॥

ग्रासं सुमृष्टं विरसं महान्तं स्तोकमेव वा ।

यदृच्छयैवापतितं ग्रसेदाजगरोऽक्रियः ॥ २ ॥

उद्योगेंवीण आहारु । अयाचित सेवी अजगरु ।

डंडळोनि न सांडी धीरु । निधडा निर्धारु पैं त्याचा ॥२५॥

स्वभावें तो मुख पसरी । सहजें पडे जें भीतरीं ।

सरस नीरस विचारु न करी । आहार अंगीकारी संतोषें ॥२६॥

तैशीचि योगियांची गती । सदा भाविती आत्मस्थिती ।

यदृच्छा आलें तें सेवती । रसआसक्ती सांडूनि ॥२७॥

योगियांचा आहारु घेणें । काय सेविलें हें रसना नेणे ।

रसना-पंगिस्त नाहीं होणें । आहारु सेवणें निजबोधें ॥२८॥

आंबट तिखट तरी जाणे । परी एके स्वादें अवघें खाणें ।

सरस नीरस कांहीं न म्हणे । गोड करणें निजगोडियें ॥२९॥

मुख पसरिलिया निर्धारा । स्वभावें रिघालिया वारा ।

तोचि आहारु पैं अजगरा । तेणेंचि शरीरा पोषण ॥३०॥

तैशीचि योगियांची स्थिति । वाताशनें सुखें वर्तती ।

आहारालागुनी पुढिलांप्रती । न ये काकुलती सर्वथा ॥३१॥

थोडें बहु सरसनिरसासी । हें कांहीं म्हणणें नाहीं त्यासी ।

स्वभावें जें आलें मुखासी । तें सावकाशीं सेवितु ॥३२॥

शयीताहानि भूरीणि निराहारोऽनुपक्रमः ।

यदि नोपनयेद्ग्रासो महाहिरिव दिष्टभुक् ॥ ३ ॥

अजगरासी बहु काळें । यदृच्छा आहारु न मिळे ।

तरी धारणेसी न टळे । पडिला लोळे निजस्थानीं ॥३३॥

तैसें योगियासी अन्न । बहुकाळें न मिळे जाण ।

तरी करूनियां लंबासन । निद्रेंविण निजतु ॥३४॥

निद्रा नाहीं तयासी । परी निजे निजीं अहर्निशीं ।

बाह्य न करी उपायासी । भक्ष्य देहासी अदृष्टें ॥३५॥

अदृष्टीं असेल जें जें वेळें । तें तें मिळेल तेणें काळें ।

यालागीं त्याचें ज्ञान न मैळे । धारणा न ढळें निजबोधें ॥३६॥

ओजःसहोबलयुतं बिभ्रद् देहमकर्मकम् ।

शयानो वीतनिद्रश्च नेहेतेन्द्रियवानपि ॥ ४ ॥

अजगरासी बळ उदंड । देहो पराक्रमें प्रचंड ।

परी न करी उद्योगाचें बंड । पसरूनि तोंड पडिलासे ॥३७॥

तैसाचि योगिया केवळ । शरीरीं असे शारीर बळ ।

बुद्धिही असे अतिकुशळ । इंद्रियबळ पटुतर ॥३८॥

आहारालागीं सर्वथा । हेतु स्फुरों नेदी चित्ता ।

कायावाचा तत्वतां । नेदी स्वभावतां डंडळूं ॥३९॥

स्वप्नजागृती मुकला । सुषुप्ती सांडोनि निजेला ।

शून्याचा पासोडा झाडिला । निजीं पहुडला निजत्वें ॥४०॥

मुनिः प्रसन्नगम्भीरो दुर्विगाह्यो दुरत्ययः ।

अनन्तपारो ह्यक्षोभ्यः स्तिमितोद इवार्णवः ॥ ५ ॥

'समुद्र' जो गुरु करणें । त्याचीं परिस पां लक्षणें ।

गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणें इत्यादि ॥ ४१ ॥

समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्नवदन ।

केव्हांही धुसमुशिलेंपण । नव्हें जाण निजबोधें ॥४२॥

मीनल्या सरितांचें समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ ।

तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥

जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर ।

वेळा नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥

समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसी ।

योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥

जो रिघणें निघणे जाणें जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी ।

येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी करीतसे ॥४६॥

तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी ।

आपभयें भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥

जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघवे सागरा ।

तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥

मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी ।

तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्यानें निर्धारीं न राहे ॥४९॥

समुद्रीं मीनली ताम्रपर्णी । तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी ।

योगिया मिनली श्रद्धा येऊनि । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥

जो समुद्रामाजीं रिघोनि राहे । तो नानापरीचीं रत्ने लाहे ।

योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्‍रत्नें ॥५१॥

जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा ।

तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥

प्रवाहेंवीण जळ । समुद्रीं जेवीं निश्चळ ।

मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥

समुद्रीं प्रवाहो नव्हे कांहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं ।

तैसे योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥

समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां ।

ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥

समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ ।

योगिया अंतरी अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥

समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळें ।

सर्वथा योगी नुचंबळें । योगबळें सावधु ॥५७॥

समुद्रीं भरतें पर्वसंबंधें । योगिया परिपूर्ण सदानंदें ।

समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधें सदा सम ॥५८॥

समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर ।

तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥

जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता ।

त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्वता सेंदेची ॥६०॥

सागरीं वरुषल्या घन । वृथा जायें तें जीवन ।

तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥

अल्पही योगिया होये घेता । तेणें निवारी भवव्यथा ।

यालागीं मुमुक्षीं सर्वथा । भगवद्‍भक्तां भजावें ॥६२॥

समृद्धकामो हीनो वा नारायणपरो मुनिः ।

नोत्सर्पेत न शुष्येत सरिद्‌भिरिव सागरः ॥ ६ ॥

वर्षाकाळीं सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ ।

तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥

ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे राहती ।

ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥

तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृध्दि आलिया पाहीं ।

अहंता न धरी देहीं । गर्वु कांहीं चढेना ॥६५॥

समृध्दि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं ।

तो नारायणपरदृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततु ॥६६॥

संपत्तीमाजीं असतां । मी संपन्नु हें नाठवे चित्ता ।

दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥

दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता ।

नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधें ॥६८॥

या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासी मूळ स्त्रीसंगु ।

येचिविषयी गुरु पतंगु । केला चांगु परियेसीं ॥६९॥

दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्‍भावैरजितेन्द्रियः ।

प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥ ७ ॥

दैवी गुणमयी जे माया । तिचें सगुणस्वरूप त्या स्त्रिया ।

तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥

हावभावविलासगुणीं । व्यंकट कटाक्षांच्या बाणीं ।

पुरुषधैर्य कवच भेदोनि । हृदयभुवनीं संचरती ॥७१॥

दारुण कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं ।

योषिताबंदीं पाडिले नाहीं । भोग-कारागृहीं घातले ॥७२॥

स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख ।

तोंडीं घालितां मधुर विख । परिपाकीं देख प्राणांतु ॥७३॥

दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ।

वळें आलिंगूं जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥

पुढिला पतंग निमाला देखती । तरी मागिल्या दीपीं अतिआसक्ती ।

तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एकां अतिप्रीती पतंगन्यायें ॥७५॥

तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य उपजे स्त्रीसुखा ।

तत्संसर्गें मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥

दीप-रूपाचेनि कोडें । पतंग जळोनि स्नेहीं बुडे ।

तेवीं स्त्रीसंगे अवश्य घडे । पतन रोकडें अंधतमीं ॥७७॥

योषिद् हिरण्याभरणाम्बरादि द्रव्येषु मायारचितेषु मूढः ।

प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥ ८ ॥

पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रें आभरणें रत्‍ने ।

मायेनें रचिलीं पडणें । पतनाकारणें जनांच्या ॥७८॥

एकली योषिता नरकीं घाली । सुवर्णलोभे नरकु बळी ।

रत्‍नें भूषणें तत्काळीं । नरकमेळीं घालिती ॥७९॥

ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं ।

ते देखतांचि पुरंध्री । जनांसी उरी मग कैंचेनि ॥८०॥

अंगीं वेताळसंचारा । त्यावरी पाजिलिया मदिरा ।

मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा पैं नाहीं ॥८१॥

कां भांडाचे तोंडीं भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण ।

मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी ॥८२॥

हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातलें उन्मादद्रव्यासी ।

सेवन करितां त्या रसासी । पारु भ्रमासी पैं नाहीं ॥८३॥

तैसें सोलीव मोहाचें रूप । तें जाण योषितास्वरूप ।

त्याहीवरी खटाटोप । वस्त्रें पडप भूषणें ॥८४॥

काजळ कुंकूं अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर ।

वनिता शोभित सुंदर । मायेचे विकार विकारले ॥८५॥

माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी ।

ज्याची अतिप्रीती गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥

कैसा रीतीं रक्षी भक्त । मूळीं अत्मा आत्मी नाहीं तेथ ।

स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधें ॥८७॥

वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी ।

प्रलोभें उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥

देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगी ।

उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥

एवं योषितारूपें माया । उपभोगबुद्धि भुलवी प्राणियां ।

जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥

मधुकरीचेनि विंदाणें । 'मधुकर' म्यां गुरु करणें ।

दुःख नेदितां कार्य साधणें । तींहि लक्षणें परिस पां ॥९१॥

स्तोकं स्तोकं ग्रसेद् ग्रासं देहो वर्तेत यावता ।

गृहानहिंसन्नातिष्ठेद् वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥ ९ ॥

भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फुल तरी कुचुंबों नेदी ।

आपुली करी अर्थसिद्धी । चोखट बुद्धि भ्रमराची ॥९२॥

तैसीच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं ।

भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥९३॥

प्राणधारणेपुरतें । योगी मागे भिक्षेतें ।

समर्थ दुर्बळ विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥९४॥

रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासी ।

पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥९५॥

जो कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला ठाये ।

प्रिया दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु न पाहे आपुला ॥९६॥

तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या लोलुप्येंसीं ।

तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥९७॥

अणुभ्यश्च महद्‍भ्यश्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः ।

सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥ १० ॥

अतिलहान सुमन जें कांहीं । भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं ।

रिघोनि त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥९८॥

थोराथोरा ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणीं ।

त्यांच्याही ठायीं रिघोनी । सारांश सेवुनी जातसे ॥९९॥

तैसाचि योगिया नेटकु । शास्त्रदृष्टी अतिविवेकु ।

न करी लहान थोर तर्कु । सारग्राहकु होतसे ॥१००॥

वेदांतीं ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुतीं ।

इतर स्तोत्रीं ब्रह्मव्युत्पत्ती । तेही अतिप्रीतीं मानितु ॥१॥

पंडितांचें वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं ।

तेंही अतिआदरें मानूनी । सार निवडूनि घेतसे ॥२॥

प्रीती होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासर्‍यांसी ।

मान देतसे त्यांच्या दासासी । तेचि प्रीतीसी लक्षूनि ॥३॥

भेसळल्या क्षीरनीरासी । निवडुनि घेईजे राजहंसीं ।

तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥४॥

सर्वभूतीं भगवद्‍भावो । हा सारभागु मुख्य पहा हो ।

हे निष्ठा ज्यासि महाबाहो । त्यासी अपावो स्वप्नीं नाहीं ॥५॥

भरलेया जगाआंतु । सारभागी तो योगयुक्तु ।

यदूसि अवधूत सांगतु । गुरुवृत्तांतु लक्षणें ॥६॥

गुरुत्वें म्यां मानिली 'माशी' । ऐके राया दो प्रकारेंसी ।

एक ते मोहळमासी । ग्रामवासी दूसरी ॥७॥

सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षितम् ।

पाणिपात्रोदरामत्रो मक्षिकेव न सङ्ग्रही ॥ ११ ॥

पहा पां घरींची माशी । बैसल्या साखरेचे राशीं ।

हातीं धरोनि घाली मुखाशी । संग्रहो तिसी पैं नाहीं ॥८॥

हे होईल सायंकाळा । हे भक्षीन प्रातःकाळां ।

ऐसा संग्रहो वेगळा । नाहीं केला मक्षिका ॥९॥

तैशी योगसंन्यासगती । प्राप्तभिक्षा घेऊनि हातीं ।

तिसी निक्षेपु मुखाप्रती । संग्रहस्थिति त्या नाहीं ॥११०॥

भिक्षेलागीं पाणिपात्र । सांठवण उदरमात्र ।

या वेगळें स्वतंत्र । नाहीं घरपात्र सांठवणें ॥११॥

सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षुकः ।

मक्षिका इव सङ्गृह्णन् सह तेन विनश्यति ॥ १२ ॥

सायंकाळ-प्रातःकाळासी । भक्ष्यसंग्रहो नसावा भिक्षूसी ।

संग्रहें पावती नाशासी । येविषीं 'मधुमाशी' गुरु केली ॥१२॥

रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधुमाशी ।

तो संग्रहोचि करी धातासी । मधु न्यावयासी जैं येती ॥१३॥

संग्रहो यत्नाचिया चाडा । मोहळ बांधिती अवघडां कडां ।

ते दुर्गमीं रिगू करिती गाढा । अर्थ-चाडा मधुहर्ते ॥१४॥

कां झाडितां मोहळासी । नाशु होतसे मासियांसी ।

संग्रहाची जाती ऐशी । जीवाघातासी करवितु ॥१५॥

ऐसें देखोनिया जनीं । भक्त-भिक्षु-योगी-सज्जनीं ।

संग्रहो न करावा भरंवसेनी । नाशु निदानीं दिसतुसे ॥१६॥

आचारावें सत्कर्म । संग्रहावा शुद्ध धर्म ।

हेंचि नेणोनियां वर्म । धनकामें अधम नाशती ॥१७॥

अर्थ विनाशाचें फळ । दुसरें एक नाशाचें मूळ ।

विशेष नाशाचें आहळबाहळ । स्त्री केवळ वोळख पां ॥१८॥

मूळ नाशासि जीविता । कनक आणि योषिता ।

जंव जंव यांची आसक्तता । तंव तंव चढता भवरोगु ॥१९॥

कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी ।

तोचि जनार्दनु जनीं । भरंवसेंनी ओळख पां ॥१२०॥

जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें स्त्रियेसी ।

येचिविषयीं 'मदगजासी' । गुरु विशेषीं म्यां केला ॥२१॥

पदापि युवतीं भिक्षुर्न स्पृशेद् दारवीमपि ।

स्पृशन् करीव बध्येत करिण्या अङ्गसङ्गतः ॥ १३ ॥

पहा पां षष्टिहायन भद्रजाती । त्यांपुढें मनुष्य तें किंती ।

ते हस्तिणीचे अंगसंगतीं । बंधन पावती मनुजांचें ॥२२॥

जो दृष्टीं नाणी मनुष्यांसी । तो स्त्रियां वश केला मानवांसी ।

त्यांचेनि बोलें उठी बैसी । माथां अंकुशीं मारिजे ॥२३॥

एवं जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी ।

तिंही देखोनि योषितांसी । लागवेगेंसी पळावें ॥२४॥

नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी ।

स्त्री देखतांचि दिठीं । उठाउठीं पळावें ॥२५॥

पळतां पळतां पायांतळी । आल्या काष्ठाची पुतळी ।

तेही नातळावी कुशळीं । निर्जीव स्त्री छळी पुरुषातें ॥२६॥

अनिरुद्धें स्वप्नीं देखिली उखा । तों धरूनि नेला चित्ररेखा ।

बाणासुरें बांधिला देखा । कृष्णा सखा जयाचा ॥२७॥

त्यासी सोडवणेलागीं हरी । धांवतां आडवा आला कामारी ।

युद्ध जाहलें परस्परीं । शस्त्रास्त्री दारुण ॥२८॥

एवं हरिहरां भिडतां । जो बांधला स्वप्नींचिया कांता ।

तो सहसा न सुटेची सोडवितां । इतरांची कथा कायसी ॥२९॥

पहा पां स्वप्नींचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता ।

मा साचचि स्त्री हाती धरितां । निर्गमता त्या कैंची ॥१३०॥

'पुरुष' आपणया म्हणविती । सेखीं स्त्रियांचे पाय धरिती ।

त्यांसी कैसेनि होईल मुक्ती । स्त्रीसंगतीं अधःपात ॥३१॥

नाधिगच्छेत् स्त्रियं प्राज्ञः कर्हिचिन्मृत्युमात्मनः ।

बलाधिकैः स हन्येत गजैरन्यैर्गजो यथा ॥ १४ ॥

क्रीडतां गजींमाजीं गजपती । त्यावरी सबळ भद्रजाती ।

येऊनियां युद्ध करिती । निजबळें मारिती तयातें ॥३२॥

तो मारोनियां हस्ती । त्या हस्तिणी समस्ती ।

सबळ भोगी भद्रजाती । नाशप्रती स्त्री मूळ ॥३३॥

अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंबिला अमरपती ।

भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसंगतीस्तव जाली ॥३४॥

देखोनि तिलोत्तमा उत्तम वधू । सुंद उपसुंद सखे बंधु ।

स्त्री अभिलाषें चालिला क्रोधु । सुहृदसंबंधू विसरले ॥३५॥

मग स्त्रीविरहें युद्धाचे ठायीं । दोघे निमाले येरयेरांचे घायीं ।

शेखीं स्त्रीभोगुही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥३६॥

ऐसीच पूर्वकल्पींची कथा । अवतारी श्रीकृष्ण नांदतां ।

तेणें शिशुपाळ गांजोनि सर्वथा । हिरोनि कांता पैं नेली ॥३७॥

एवं सुरनरपशूंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसंगती ।

तिचेनि संगें गृहासक्ती । कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥३८॥

ग्राम्य स्त्रियांचे संगतीं जाणें । तो बैसला मरणाधरणें ।

मरण आल्याही न करणें । जीवेंप्राणें स्त्रीसंगु ॥३९॥

वेश्येचे संगती जातां । बळाधिक्य करी घाता ।

निरंतर स्वपत्नी भोगितां । नाहीं बाधकता हें न म्हण ॥१४०॥

अविश्रम स्त्री सेवितां । कामु पावे उन्मत्तता ।

उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥४१॥

एवं हा ठावोवरी । स्त्रीसंग कठिण भारी ।

क्वचित्संगु जाहल्यावरी । नरकद्वारीं घालील ॥४२॥

नरकीं घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा ।

नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥४३॥

स्त्री आणि दुसरा अर्थु । हाचि ये लोकीं घोर अनर्थु ।

येणें अंतरला निजस्वार्थु । शेखीं करी घातु प्राणाचा ॥४४॥

न देयं नोपभोग्यं च लुब्धैर्यद् दुःखसञ्चितम् ।

भुङ्क्ते तदपि तच्चान्यो मधुहेवार्थविन्मधु ॥ १५ ॥

स्वयें खाये ना धर्मु न करी । घरच्यांसी खाऊं नेदी दरिद्री ।

मधुमक्षिकेच्या परी । संग्रहो करी कष्टोनि ॥४५॥

माशा मोहळा बांधिती बळें । माजीं सांचले मधाचे गोळे ।

तें देखोनि जगाचे डोळे । उपायबळें घेवों पाहाती ॥४६॥

मग झाडींखोडीं अरडींदरडीं । जेथिंच्या तेथ जगु झोडी ।

भरती मधाचिया कावडी । ते सेविती गोडी श्रीमंत ॥४७॥

माशा मधु न खाती काकुळतीं । झाडित्याचे हात माखती ।

स्वादु श्रीमंत सेविती । ज्यांसी लक्ष्मीपती प्रसन्न ॥४८॥

तैसेंचि कृपणाचें यक्षधन । नाहीं दान धर्मसंरक्षण ।

त्यातें तस्कर नेती मारून । त्यांसही दंडून राजा ने ॥४९॥

जे शिणोनि संग्रह करिती । त्यांसी नव्हे भोगप्राप्ती ।

ते द्रव्यें अपरिग्रही सेविती । दैवगती विचित्र ॥१५०॥

प्रयासें गृहस्थ करवी अन्न । तें संन्यासी न शिणतां जाण ।

करूनि जाय भोजन । अदृष्ट प्रमाण ये अर्थीं ॥५१॥

यालागीं दैवाधीन जो राहे । तो संग्रहाची चाड न वाहे ।

तें अदृष्टचि साह्य आहे । कृपणता वायें करिताति ॥५२॥

सुदुःखोपार्जितैर्वित्तैराशासानां गृहाशिषः ।

मधुहेवाग्रतो भुङ्क्ते यतिर्वै गृहमेधिनाम् ॥ १६ ॥

दुःखें उपार्जूनि वित्त । गृहसामग्री नाना पदार्थ ।

त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडीं ॥५३॥

तेथ समयीं आला अतिथ । संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ ।

गृहस्थाआधीं तो सेवित । तोंड पाहत गृहमेधी ॥५४॥

जैसें दवडून मोहळमाशियांसी । मधुहर्ता मधु प्राशी ।

तैसें होय गृहस्थासी । नेती संन्यासी सिद्धपाकु ॥५५॥

समयीं पराङ्‍मुख झालिया यती । सकळ पुण्यें क्षया जाती ।

यथाकाळीं आलिया अतिथी । स्वधर्मु रक्षिती सर्वथा ॥५६॥

अर्थ संग्रहाची बाधकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां ।

'मृग' गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसी ॥५७॥

ग्राम्यगीतं न शृणुयाद् यतिर्वनचरः क्वचित् ।

शिक्षेत हरिणाद् बद्धान् मृगयोर्गीतमोहितात् ॥ १७ ॥

ग्राम्यजनवार्ता । कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता ।

ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥५८॥

अखंड पाहतां दीपाकडे । घंटानादें झालें वेडें ।

मृग पाहों विसरला पुढें । फांसीं पडे सर्वथा ॥५९॥

ग्राम्य योषितांचे गीत । ऐकतां कोणाचें भुलेना चित्त ।

मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥१६०॥

जो बोलिजे तापसांचा मुकुटी । ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेट गोष्टी ।

तो ऋष्यश्रृंग उठाउठी । स्त्रीगीतासाठीं भुलला ॥६१॥

नृत्यवादित्रगीतानि जुषन् ग्राम्याणि योषिताम् ।

आसां क्रीडनको वश्य ऋष्यशृङ्गो मृगीसुतः ॥ १८ ॥

मधुर वीणागुणक्वणित । ग्राम्य स्त्रियांचें गीत नृत्य ।

देखतां पुरुष वश्य होत । जैसें गळबंधस्थ वानर ॥६२॥

जो तपसांमाजीं जगजेठी । जो जन्मला मृगीच्या पोटीं ।

जो नेणे स्त्रियांची भेटीगोठी । न पाहे दृष्टीं योषिता ॥६३॥

तो ऋष्यश्रृंग स्त्रीदृष्टीं । वश्य जाहला उठाउठी ।

धांवे योषितांचे पाठोवाठीं । त्यांचे गोष्टीमाजी वर्ते ॥६४॥

गारुड्याचें वानर जैसें । स्त्रियांसंगें नाचे तैसें ।

प्रमदादृष्टीं जाहला पिसें । विवेकु मानसें विसरला ॥६५॥

विसरला तपाचा खटाटोपु । विसरला विभांडक बापु ।

विसरला ब्रह्मचर्यकृत संकल्पु । स्त्रियानुरूपु नाचतु ॥६६॥

स्त्रीबाधे एवढा बाधु । संसारी आणिक नाहीं गा सुबुद्धु ।

नको नको स्त्रियांचा विनोदु । दुःखसंबंधु सर्वांसी ॥६७॥

वारिलें नाइकावें ग्राम्य गीता । हे सत्य सत्य गा सर्वथा ।

तेथ हरिकीर्तन कथा । जाहल्या परमार्थतां ऐकावें ॥६८॥

रामनामें विवर्जित । ग्रामणीं बोलिजे तें 'ग्राम्यगीत' ।

तें नाइकावें निश्चित । कवतुकें तेथ न वचावें ॥६९॥

'मीन' गुरु करणें । तेंही अवधारा लक्षणें ।

रसनेचेनि लोलुप्यपणें । जीवेंप्राणे जातसे ॥१७०॥

जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः ।

मृत्युमृच्छत्यसद्‍बुधिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥ १९ ॥

अर्थ-संग्रहें जीवघातु । स्त्रिया-आसक्तीं अधःपातु ।

रसनालोलुप्यें पावे मृत्यु । विविध घातु जीवासी ॥७१॥

ज्यासी रसनालोलुप्यता गाढी । त्यासी अनर्थुचि जोडे जोडी ।

दुःखाच्या भोगवी कोडी । रसनागोडी बाधक ॥७२॥

रसना आमिषाची गोडी । लोलुप्यें मीनु गिळी उंडी ।

सवेंचि गळु टाळू फोडी । मग चरफडी अडकलिया ॥७३॥

पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगांचे गळ गुप्त ।

रस आसक्तीं जे सेवित । ते चडफडित भवरोगें ॥७४॥

गळीं अडकळा जो मासा । तो जिता ना मरे चरफडी जैसा ।

तेवीं रोगु लागल्या माणसा । दुःखदुर्दशा भोगित ॥७५॥

जो रसनालोलुप्यें प्रमादी । त्यासी कैंची सुबुद्धी ।

जन्ममरणें निरवधी । भोगी त्रिशुद्धी रसदोषें ॥७६॥

रस सेविलियासाठीं । भोगवी जन्मांचिया कोटी ।

हें न घडे म्हणसी पोटीं । राया ते गोठी परियेसीं ॥७७॥

इंद्रियांची सजीवता । ते रसनेआधीन सर्वथा ।

रसनाद्वारें रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥७८॥

मातली जे इंद्रियसत्ता । ते नेऊन घाली अधःपाता ।

रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥७९॥

आहारेंवीण देह न चले । सेविल्या इंद्रियवर्गु खवळे ।

रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळें मावळतीं ॥१८०॥

इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः ।

वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥ २० ॥

आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रियें जिंतिलीं देख ।

तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक्य न जिंकवे ॥८१॥

इंद्रियांसी आहाराचें बळ । तीं निराहारें झालीं विकळ ।

तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचें बळ निरन्नें ॥८२॥

तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् ।

न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥ २१ ॥

निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली ।

अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥८३॥

जंव रसना नाहीं जिंकिली । तंव 'जितेंद्रिय' मिथ्या बोली ।

जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥८४॥

विषयाआंतील गोडपण । रसने-आंतील जाणपण ।

दोंहीसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥८५॥

सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे ।

त्यासीचि रसना वश्य होये । रस-अपाये न बाधिती ॥८६॥

रसनाजिताचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें ।

सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥८७॥

पिङ्गला नाम वेश्याऽऽसीद् विदेहनगरे पुरा ।

तस्या मे शिक्षितं किञ्चिन्निबोध नृपनन्दन ॥ २२ ॥

अवधूत म्हणे नृपनंदना । 'वेश्या' गुरु म्यां केली जाणा ।

तिच्या शिकलों ज्या लक्षणां । विचक्षणा अवधारीं ॥८८॥

पूर्वी विदेहाचे नगरीं । 'पिंगला' नामें वेश्या वासु करी ।

तिसी आस निरासेंवरी । वैराग्य भारी उपजलें ॥८९॥

सा स्वैरिण्येकदा कान्तं सङ्केत उपनेष्यती ।

अभूत् काले बहिर्द्वारि बिभ्रती रूपमुत्तमम् ॥ २३ ॥

ते स्वैरिणी स्वेच्छाचारी । सायंकाळीं उभी द्वारीं ।

नाना अळंकार-अंबरीं । श्रृंगारकुसरी शोभत ॥१९०॥

आधींच रूप उत्तम । वरी श्रृंगारिली मनोरम ।

करावया ग्राम्यधर्म । पुरुष उत्तम पहातसे ॥९१॥

मार्ग आगच्छतो वीक्ष्य पुरुषान् पुरुषर्षभ ।

तान् शुल्कदान्वित्तवतः कान्तान् मेनेऽर्थकामुकी ॥ २४ ॥

सगुण सुरूप धनवंत । कामकौशल्यें पुरवी आर्त ।

अर्थ देऊनि करी समर्थ । ऐसा कांत पहातसे ॥९२॥

ऐक गा पुरुषश्रेष्ठा । पुरुष येतां येतां देखे वाटा ।

त्यासी खुणावी नेत्रवेंकटा । कामचेष्टा दावूनि ॥९३॥

आगतेष्वपयातेषु सा सङ्केतोपजीविनी ।

अप्यन्यो वित्तवान् कोऽपि मामुपैष्यति भूरिदः ॥ २५ ॥

येत्या पुरुषास हाणी खडा । एकासी म्हणे घ्या जी विडा ।

डोळा घाली जात्याकडा । एकापुढां भंवरी दे ॥९४॥

ठेवूनि संकेतीं जीवित । ऐसे नाना संकेत दावित ।

पुरुष तिकडे न पाहात । येत जात कार्यार्थी ॥९५॥

गेल्या पुरुषातें निंदित । द्रव्यहीन हे अशक्त ।

रूपें विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारें ॥९६॥

आतां येईल वित्तवंत । अर्थदानीं अतिसमर्थ ।

माझा धरोनियां हात । काम‍आर्त पुरवील ॥९७॥

एवं दुराशया ध्वस्त निद्रा द्वार्यवलम्बती ।

निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥ २६ ॥

ऐसें दुराशा भरलें चित्त । निद्रा न लगे उद्वेगित ।

द्वार धरोनि तिष्ठत । काम वांछित पुरुषांसीं ॥९८॥

रिघों जाय घराभीतरीं । सांचल ऐकोनि रिघे बाहेरी ।

रिघतां निघतां येरझारी । मध्यरात्री पैं झाली ॥९९॥

सरली पुरुषाची वेळ । रात्र झाली जी प्रबळ ।

निद्रा व्यापिले लोक सकळ । पिंगला विव्हळ ते काळीं ॥२००॥

तस्या वित्ताशया शुष्यद् वक्त्राया दीनचेतसः ।

निर्वेदः परमो जज्ञे चिन्ताहेतुः सुखावहः ॥ २७ ॥

तुटला आशेचा जिव्हाळा । सुकले वोंठ वाळला गळा ।

कळा उतरली मुखकमळा । खेदु आगळा चिंतेचा ॥१॥

वित्त न येचि हाता । तेणें ते झाली दीनचित्ता ।

वैराग्यें परम वाटली चिंता । सुखस्वार्था ते हेतु ॥२॥

तस्या निर्विण्णचित्ताया गीतं श्रृणु यथा मम ।

निर्वेद आशापाशानां पुरुषस्य यथा ह्यसिः ॥ २८ ॥

न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति ।

यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥ २९ ॥

कैसें वैराग्य उपजलें तिसी । जे चिंतीत होती विषयासी ।

त्या विटली विषयसुखासी । छेदक आशेसी वैराग्य ॥३॥

तेणें वैराग्यें विवेकयुक्त । पिंगलेनें गाइलें गीत ।

तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त होऊनि ॥४॥

ऐक राया विवेकनिधी । वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं ।

त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी । प्रतिपदीं बाधकु ॥५॥

अनुतापु नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं ।

तो संसाराची आंदणी दासी । आशापाशीं बांधिजे ॥६॥

त्यासी मोहममतेची गाढी । घालिजे देहबुद्धीची बेडी ।

अहोरात्र विषय भरडी । अर्ध घडी न राहे ॥७॥

जराजर्जरित वाकळे । माजीं पडले अखंड लोळे ।

फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥८॥

त्यासी अव्हासव्हा जातां । अंधकूपीं पडे दुश्चिता ।

तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥९॥

तेथ काया-मनें-वाचें । निघणें नाहीं जी साचें ।

तंव फणकाविला लोभविंचें । चढणें त्याचें अनिवार ॥२१०॥

तेथ निंदेचिया तिडका । आंत बाहेर निघती देखा ।

वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥११॥

अभिमानाचे आळेपिळे । मोह‍उमासे येती बळें ।

तरी विषयदळणें आगळें । दुःखें लोळे गेहसेजे ॥१२॥

ऐशीं अवैराग्यें बापुडीं । पडलीं देहाचे बांदवडीं ।

भोगितां दुःखकोडी । सबुडबुडीं बुडालीं ॥१३॥

पहा पां नीच सर्व वर्णांसी । निंद्य कर्में निंदिती कैशीं ।

वैराग्य उपजलें वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥१४॥

देहबंध छेदी त्या उक्ती । वेश्या बोलिली नाना युक्ती ।

झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥१५॥

पिङ्गलोवाच ।

अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः ।

या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥ ३० ॥

मिथ्या मोहाचा विस्तार । म्यां वाढविला साचार ।

माझ्या मूर्खपणाचा पार । पाहतां विचार पांगुळे ॥१६॥

नाहीं अंतःकरणासी नेम । अपार वाढविला भ्रम ।

असंतपुरुषांचा काम । मनोरम मानितां ॥१७॥

जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे । तरी जवळील पुरुष न लाहिजे ।

हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे असंतां ॥१८॥

सन्तं समीपे रमणं रतिप्रदं

वित्तप्रदं नित्यमिमं विहाय ।

अकामदं दुःखभयाधिशोक

मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥ ३१ ॥

संतपुरुषाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती ।

ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ती तत्काळ ॥१९॥

काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्यसुख ।

चित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥

सकळ ऐश्वर्य निजपदेंसीं । संतोषोनि दे रतीसी ।

रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२१॥

सांडोनि ऐशिया कांतासी । माझी मूढता पहा कैशी ।

नित्य अकामदा पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें ॥२२॥

आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवीं करिती निष्काम ।

त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२३॥

त्यांचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते ।

भय-शोक-आधि-व्याधींतें । त्यांचेनि सांगातें पावलें ॥२४॥

अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा

साङ्केत्यवृत्त्यातिविगर्ह्यवार्तया ।

स्त्रैणान्नराद् यार्थतृषोऽनुशोच्यात्

क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥ ३२ ॥

जारपुरुषापासोनि सुख । इच्छितें ते मी केवळ मूर्ख ।

वृथा परितापु केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥२५॥

स्त्रैण पुरुष ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम ।

त्यांत कृपणु तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छीं ॥२६॥

जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतळतां त्या भीती ।

योनिद्वारें जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारु ॥२७॥

अल्प द्रव्य जेणें देणें । त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें ।

याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२८॥

जया पुरुषासी देह विकणें । तें अत्यंत हीनदीनपणें ।

काय सांगों त्याची लक्षणें । सर्वगुणें अपूर्ण ॥२९॥

वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता ।

प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुती तो नेदी ॥२३०॥

ऐशियापासाव सुख । वांछितां वाढे परम दुःख ।

जळो त्याचें न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥३१॥

एवं जारपुरुषाची स्थिती । आठवितां चिळसी येती ।

पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति वीटली ॥३२॥

यदस्थिभिर्निर्मितवंशवंश्य

स्थूणं त्वचा रोमनखैः पिनद्धम् ।

क्षरन्नवद्वारमगारमेतद्

विण्मूत्रपूर्णं मदुपैति कान्या ॥ ३३ ॥

नरशरीर गृह सांकडें । आढीं पाखाड्या नुसधीं हाडें ।

अस्थींच्या मेढी दोंहीकडे । वोलेनि कातडें मढियेलें ॥३३॥

त्यासी सर्वांगीं सगळे । दिधले रोमावळिचे खिळे ।

घालूनि नखाचे खोबळे । अग्रीं आंगवळे बूजिले ॥३४॥

अस्थि-मांस-चर्मबांधा । सर्वांगीं आवळूनि दिधला सांदा ।

रंगीत चर्मरसना स्वादा । पुढिले बांधा बांधिली ॥३५॥

वायुप्रसरणपरिचारें । केलीं प्राणापानरंध्रें ।

वरिले डळमळीत शिखरें । बालांकुरें लाविलीं ॥३६॥

बुजूनि भीतरील सवडी । बांधाटिलें नवनाडीं ।

विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥३७॥

भीतरिले अवकाशीं । दुर्गंधि ऊठली कैशी ।

तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥३८॥

अखंड पर्‍हावे वाहती मळें । देखोनि ज्याचें तो कांटाळे ।

अहर्निशीं धुतां जळें । कदा निर्मळे ते नव्हती ॥३९॥

सांगतांचि हे गोष्टी । ओकारी येतसे पोटीं ।

ऐशियास मी भुलल्यें करंटी । विवेक दृष्टीं न पाहें ॥२४०॥

अस्थिमांसाचा कोथळा । विष्ठामूत्राचा गोळा ।

म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येचि ॥४१॥

विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः ।

यान्यमिच्छन्त्यसत्यस्माद् आत्मदात् काममच्युतात् ॥ ३४ ॥

ये विदेहाचे नगरीं । मूर्ख मीचि एक देहधारी ।

हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां नरीं व्यभिचारु ॥४२॥

असंत पुरुष नेणों किती । म्यां भोगिले अहोरातीं ।

सुख न पवेंची निश्चितीं । रति भगवंतीं जंव नाहीं ॥४३॥

जो निकटवर्ती हृदयस्थु । पुरुषीं पुरुषोत्तम अच्युतु ।

वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोषें देतु निजात्मना ॥४४॥

अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें । ते सुख च्यवेना कांहीं केलें ।

ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक भुललें अकामदा ॥४५॥

अकामद ते नाशवंत । त्यांसी संग केलिया दुःखचि देत ।

कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥४६॥

त्या आसक्तीची झाली तडातोडी । लागली अच्युतसुखाची गोडी ।

ज्याचें सुख भोगितां चढोवढी । घडियाघडी वाढतें ॥४७॥

सुहृत् प्रेष्ठतमो नाथ आत्मा चायं शरीरिणाम् ।

तं विक्रीयात्मनैवाहं रमेऽनेन यथा रमा ॥ ३५ ॥

जो सोयरा माझा हृदयस्थु । सुख प्रीति प्रिय अच्युतु ।

तोचि अंतरात्मा सर्वगतु । नाथ कांतु तो माझा ॥४८॥

त्यासीच आपुले संवसाटी । विकत घेईन उठाउठी ।

परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी सांडोनी ॥४९॥

रमा झाली पायांची दासी । मी भोगीन अनारिसी ।

सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसीं सर्वस्वें ॥२५०॥

कियत् प्रियं ते व्यभजन् कामा ये कामदा नराः ।

आद्यन्तवन्तो भार्याया देवा वा कालविद्रुताः ॥ ३६ ॥

सांडूनि हृदयस्था अच्युतातें । वरावें वरां निर्दैवांतें ।

तंव तो द्वैतभये भयचकिते । काळग्रस्ते सर्वदा ॥५१॥

जे निजभयें सर्वदा दुःखी । ते भार्येसी काय करिती सुखी ।

अवघीं पडलीं काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥५२॥

असो नराची ऐशी गती । वरूं अमरांमाजीं अमरपती ।

विळांत ते चौदा निमती । पदच्युति अमरेंद्रा ॥५३॥

एवं सुर नर लोक लोकीं । आत्ममरणें सदा दुःखी ।

ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें मूर्खीं ते ठायीं ॥५४॥

धन्य माझी भाग्यप्राप्ती । येचि क्षणीं येचि रातीं ।

झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति तुष्टला ॥५५॥

नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा ।

निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥ ३७ ॥

ये जन्मींचें माझें कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म ।

मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥५६॥

मज कैंचे पूर्वजन्मीं साधन । ज्याचें नाम 'पतितपावन' ।

कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेन हें घडलें ॥५७॥

दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालवीं संसारु ।

तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥५८॥

जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हतें मी आपण ।

योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एकी ॥५९॥

यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ ।

तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥

तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटलें दुःख ।

मज झालें परम सुख । निजसंतोख पावलें ॥६१॥

दुःख आदळतां अंगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी ।

भगवंतें कृपा केली कैशी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥६२॥

मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः ।

येनानुबन्धं निर्हृत्य पुरुषः शममृच्छति ॥ ३८ ॥

अंगीं आदळतां दुःखद्वंद्व । अभाग्यासी ये सबळ क्रोध ।

थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥६३॥

दुःख देखतांचि दृष्टी । ज्यासी वैराग्य विवेकेंसी उठी ।

तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी । पावे उठाउठी निजसुख ॥६४॥

पुरुषांसी परमनिधान । विवेकयुक्त वैराग्य जाण ।

तेणें होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥६५॥

मी पूर्वी परम अभाग्य । महापुरुषांचे जें निजभाग्य ।

तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य तिहीं लोकीं ॥६६॥

तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्यसङ्गताः ।

त्यक्त्वा दुराशाः शरणं व्रजामि तमधीश्वरम् ॥ ३९ ॥

कृपा करोनि भगवंते । निजवैराग्य दिधलें मातें ।

तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥६७॥

तो उपकार मानूनियां माथां । त्यासी मी शरण जाईन आतां ।

जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥६८॥

सन्तुष्टा श्रद्दधत्येतद् यथालाभेन जीवती ।

विहराम्यमुनैवाहं आत्मना रमणेन वै ॥ ४० ॥

शरण गेलियापाठीं । सहज संतुष्ट मी ये सृष्टीं ।

स्वभावें सत्‌श्रध्दा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ॥६९॥

मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा ।

जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभु ॥२७०॥

ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चितीं ।

भगवद्‍भजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी ॥७१॥

मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी ।

तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥७२॥

संसारकूपे पतितं विषयैर्मुषितेक्षणम् ।

ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥ ४१ ॥

संसारलक्षण कूप अंध । तेथ विषयदृष्टीं विषयांध ।

पडोनि गेले अंधांध । बुद्धिमंद उपायीं ॥७३॥

ते कल्पनाजळीं बुडाले । वासनाकल्लोळीं कवळले ।

दंभमदादि जळचरीं तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं ॥७४॥

दुःखाच्या खडकीं आदळले । स्वर्गपायरीसी अडकले ।

तेथूनिही एक पडले । निर्बुजले भवदळें ॥७५॥

नास्तिकें गेलीं सबुडबुडीं । कर्मठीं धरिल्या कर्मदरडी ।

वेदबाह्य तीं बापुडीं । पडलीं देव्हडीतळवटीं ॥७६॥

निंदेचे शूळ कांटे । फुटोनि निघाले उफराटे ।

द्वेषाचे पाथर मोठे । हृदय फुटे लागतां ॥७७॥

कामाची उकळी प्रबळ । भीतरूनि बाहेरी ये सबळ ।

तेणें डहुळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥७८॥

सुटले क्रोधाचे चिरे । वरी पडिल्या उरी नुरे ।

वनितामगरीं नेलें पुरें । विवरद्वारें आंतौतें ॥७९॥

तेथ अवघियांसी एकसरें । गिळिलें काळें काळ‍अजगरें ।

विखें घेरिलें थोरें घोरें । ज्ञान पाठिमोरें सर्वांसी ॥२८०॥

सर्प चढलिया माणुसा । गूळ कडू लागे कैसा ।

निंब खाये घसघसां । गोड गूळसा म्हणौनि ॥८१॥

केवळ विषप्राय विषयो कडू । तो प्रपंचिया जाला गोडु ।

अमृतप्राय परमार्थ गोडु । तो जाहला कडू विषयिकां ॥८२॥

कूपाबाहेर वासु ज्यांसी । ते न देखती कूपाआंतुलांसी ।

कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥८३॥

ऐसिया पीडतयां जीवांसी । काढावया धिंवसा नव्हे कोण्हासी ।

तुजवांचोनि हृषीकेशी । पाव वेगेंसीं कृपाळुवा ॥८४॥

एवं दुःखकूपपतितां । हृदयस्थु भगवंतुचि त्राता ।

धांव पाव कृष्णनाथा । भवव्यथा निवारीं ॥८५॥

ऐसें जाणोनि तत्त्वतां । त्याच्या चरणा शरण आतां ।

शरण गेलिया सर्वथा । सहज भवव्यथा निवारे ॥८६॥

आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् ।

अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥ ४२ ॥

ऐसें कळलें जी तत्त्वतां । येथ आपणचि आपणिया त्राता ।

सर्व पदार्थीं सर्वथा । निर्वेदता दृढ जाहल्या ॥८७॥

दृढ वैराग्यता ते ऐशी । विषयो टेंकल्या अंगासी ।

चेतना नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥८८॥

अथवा वमिलिया अन्ना । जेवीं वांछीना रसना ।

तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥८९॥

तें वैराग्य कैसेनि जोडे । तरी सावधान पाहतां रोकडें ।

जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळें पडे तें नाहीं ॥२९०॥

पिता-पितामह काळें नेले । पुत्रपौत्रां काळें गिळिलें ।

वैराग्य नुपजे येणें बोलें । तरी नागवले नरदेहा ॥९१॥

मृत्युलोक याचें नांव । अनित्य स्वर्गाची काइसी हांव ।

वैराग्येंवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥९२॥

श्रीब्राह्मण उवाच ।

एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् ।

छित्त्वोपशममास्थाय शय्यामुपविवेश सा ॥ ४३ ॥

अवधूत म्हणे यदूसी । धन्य भाग्य तये वेश्येसी ।

वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम ॥९३॥

एवं विवंचूनि निजबुद्धी । परपुरुषदुराशा छेदी ।

ज्याचेनि संगें आधिव्याधी । बहु उपाधी बाधक ॥९४॥

जे उपाधीचेनि कोडें । जन्ममृत्यूचा पुरु चढे ।

दुःखभोगाचें सांकडें । पाडी रोकडें जीवासी ॥९५॥

येणें वैराग्यविवेकबळें । छेदूनि दुराशेचीं मूळें ।

उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥९६॥

नित्यसिद्धसुखदाता । तो हृदयस्थ कांत आश्रितां ।

विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मीनली ॥९७॥

त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं । ऐक्यभावें घातली मिठी ।

निजसुख पावली गोरटी । उठाउठीं तत्काळ ॥९८॥

बोलु घेऊनि गेला बोली । लाज लाजोनियां गेली ।

दृष्य-द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥९९॥

सुखें सुखावलें मानस । तें सुखरूप जालें निःशेष ।

संकल्पविकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥

नाबद पडलिया उदकांत । विरोनि तया गोड करित ।

तेवीं निराशीं पावोनि भगवंत । समरसत स्वानंदे ॥१॥

तेथ हेतूसी नाहीं ठावो । निमाला भावाभावो ।

वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहा हो अनिवार ॥२॥

सांडूनि मीतूंपणासी । खेंव दिधलें समरसीं ।

मग समाधीचिये सेजेशी । निजकांतेंसी पहुडली ॥३॥

झणें मायेची लागे दिठी । यालागीं स्फूर्तीचिया कोटी ।

निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥४॥

ऐसी समाधिशेजेशीं । पिंगला रिघे निजसुखेंसीं ।

अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥५॥

वैराग्ये छेदिले आशापाश । पिंगला जाहली गा निराश ।

निराशासी असमसाहस । सुखसंतोष सर्वदा ॥६॥

आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् ।

यथा सञ्छिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिङ्गला ॥ ४४ ॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥

आशा तेथ लोलुप्यता । आशेपाशीं असे दीनता ।

आशा तेथ ममता । असे सर्वथा नाचती ॥७॥

आशेपाशीं महाशोक । आशा करवी महादोख ।

आशेपाशीं पाप अशेख । असे देख तिष्ठत ॥८॥

आशेपाशीं अधर्म सकळ । आशा मानीना विटाळ ।

आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी ॥९॥

आशा अंत्यजातें उपासी । नीचसेवन आशेपाशीं ।

आशा न सांडी मेल्यासी । प्रेतापाशीं नेतसे ॥३१०॥

आशा उपजली अनंतासी । नीच वामनत्व आलें त्यासी ।

आशें दीन केलें देवांसी । कथा कायसी इतरांची ॥११॥

जगाचा जो नित्य दाता । तो आशेनें केला भिकेसवता ।

वैर्‍याचे द्वारीं झाला मागता । द्वारपाळता तेणें त्यासी ॥१२॥

आशा तेथ नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख ।

आशा सर्वांसी बाधक । मुख्य दोष ते आशा ॥१३॥

ज्याची आशा निःशेष जाये । तोचि परम सुख लाहे ।

ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धि राहे दासीत्वें ॥१४॥

निराशांचा शुद्ध भावो । निराशांपाशीं तिष्ठे देवो ।

निराशांचें वचन पाहा हो । रावो देवो नुल्लंघी ॥१५॥

निराश तोचि सद्‍बुद्धि । निराश तोचि विवेकनिधी ।

चारी मुक्ती पदोपदीं । नैराश्य आधीं वंदिती ॥१६॥

निराशा तीर्थांचें तीर्थ । निराशा मुमुक्षूचा अर्थ ।

निराशेपाशीं परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥१७॥

जाण नैराश्यतेपाशीं । वैराग्य होऊन असे दासी ।

निराश पहावया अहर्निशीं । हृषीकेशी चिंतितु ॥१८॥

निराश देखोनि पळे दुःख । निराशेमाजीं नित्यसुख ।

निराशेपाशीं संतोख । यथासुखें क्रीडतु ॥१९॥

नैराश्याचे भेटीसी पाहाहो । धांवे वैकुंठीचा रावो ।

नैराश्याचा सहज स्वभावो । महादेवो उपासी ॥३२०॥

निराशेपाशीं न ये आधी । निराशेपाशीं सकळ विधी ।

सच्चिदानंदपदीं । मिरवे त्रिशुद्धी निराशु ॥२१॥

ऐकोनि निराशेच्या नांवा । थोरला देवो घेतसे धांवा ।

त्या देवोनियां खेंवा । रूपनांवा विसरला ॥२२॥

ते निराशेचा जिव्हाळा । पावोनि वेश्या पिंगला ।

जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥२३॥

जें आशापाशांचें छेदन । तेंचि समाधीचें निजस्थान ।

ते निज समाधी पावोन । पिंगला जाण पहुडली ॥२४॥

सर्व वर्णामाजीं वोखटी । कर्म पाहतां निंद्य दृष्टीं ।

ते वेश्या पावन झाली सृष्टीं । माझे वाक्पुटीं कथा तिची ॥२५॥

यालागीं वैराग्यापरतें । आन साधन नाहीं येथें ।

कृष्ण थापटी उद्धवातें । आल्हादचित्तें प्रबोधी ॥२६॥

अवधूत सांगे यदूसी । प्रत्यक्ष वेदबाह्यता वेश्येसी ।

निराश होतां मानसीं । निजसुखासी पावली ॥२७॥

यालागीं कायावाचाचित्तें । उपासावें निराशेतें ।

यापरतें परमार्थातें । साधन येथें दिसेना ॥२८॥

इतर जितुकीं साधनें । तितुकीं आशा-निराशेकारणें ।

ते निराशा साधिली जेणें । परमार्थ तेणें लुटिला ॥२९॥

कृपा जाकळिलें अवधूतासी । यदूसी धरोनियां पोटासी ।

निराशता हे जे ऐसी । अवश्यतेसीं साधावी ॥३३०॥

एका जनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण ।

तोचि आशापाश छेदून । समाधान पाववी ॥३३१॥

इति श्रीमद्‍भागवते महापुराणे एकादशस्कंधे

यदु-अवधूतसंवादे एकाकारटीकायां अष्टमोऽध्यायः ॥८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४४॥ ओव्या ॥३३१

Leave a Comment