टिळक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. त्यांची स्मरणशक्ती चांगलीच दांडगी होती. वडील गंगाधरपंत यांच्याकडून त्यांनी संस्कृतचे धडे घेतले. संस्कृतमधील एक श्लोक पाठ केल्यामुळे त्यांना एक पै मिळत असे. त्यांनी अशा किमान २०० पाया मिळवल्या. शाळेत जायला प्रारंभ होण्यापूर्वीच अनेक गोष्टी त्यांच्या तोंडपाठ असायच्या. त्यांचे पाठांतर पाहून त्यांच्या गुरुजींनाही फारच नवल वाटत असे.
एके दिवशी वर्गात गुरुजींनी शुद्धलेखन घातले. त्यात ‘संत‘ हा शद्ब एकापेक्षा अधिक वेळा आला होता. टिळकांनी तो तीन वेगवेगळया पद्धतीने लिहिला. संत, सन्त आणि सनत. गुरुजींनी पहिला शब्द योग्य ठरवला आणि बाकी दोन चूक दिले. आपण लिहिलेले तीनही शब्द योग्य आहेत, असे त्यांनी गुरुजींना सांगितले. एवढेच नव्हे, तर ठामपणे आपले म्हणणे योग्य कसे आहे, ते उदाहरणासहित पटवून दिले. तेव्हा शिक्षकांनी त्यांचे म्हणणे योग्य असल्याचे सांगितले.
टिळकांनी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षाला असतांना एक वर्ष परीक्षेला न बसता केवळ व्यायामाचा सराव करून आपली शरीरयष्टी बळकट केली. ते उत्तम मल्ल आणि पट्टीचे पोहणारेही होते. शाळेत जात असल्यापासून आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आहे, आपले नव्हे, याची टिळकांना जाणीव होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी त्यांनी प्रभावी प्रयत्न चालू केले. बालपणापासून त्यांच्या अंगी असलेले सारे गुण त्यांना इंग्रजांच्या विरोधात लढा देतांना उपयोगी पडले. सुदृढ शरीरस्वास्थ्यामुळे पुढे कारागृहातील हालाखीच्या आणि राजकीय धकाधकीच्या आयुष्यातील कष्ट ते सोसू शकले. मंडालेच्या कारागृहात ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे लेखन केले.
आपली सत्य बाजू पटवून देण्याच्या त्यांच्या विद्यार्थीदशेपासूनच्या बाणेदार वृत्तीमुळे ते हिंदुस्तानवर अन्याय करणाऱ्या इंग्रजांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारू शकले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे भारताचे एक आदर्श सुपुत्र म्हणून ओळखले गेले.
मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला टिळकांचा बाणेदारपणा दिसून येतो. तसेच कुठचेही कार्य करायचे म्हटले की, शरीरयष्टी चांगली हवी. त्यासाठी प्रतिदिन व्यायाम करायला पाहिजे. शरीर बलवान असेल, तरच आपण कुठलीही क्रांती करू शकतो. सध्या अपले राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती चांगली नाही. तेव्हा इतरांशी लढा द्यायचा असेल, तर शारीरिक आणि त्यासह आध्यात्मिक बळही हवे. तेव्हा नामजप, प्रार्थना, कृतज्ञता यांसह लढा द्यायला सिद्ध होऊया !