फार वर्षांपूर्वी मंगळवेढा गावात दामाजीपंत नावाचे एक भाविक सद्गृहस्थ रहात होते. ते बिदरच्या सम्राटाच्या राजसभेत मोठ्या पदावर चाकरीला होते. सम्राटाची चाकरी प्रामाणिकपणे करण्याविषयी त्यांचा फार नावलौकिक होता. राजसभेचे कामकाज संपल्यानंतर उरलेला वेळ ते पांडुरंगाच्या भजन-पूजनात घालवत असत.
एकदा राज्यात मोठा दुष्काळ पडला. गुरेढोरे चारा-पाण्याविना तडफडून मरू लागली. गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली. हे पाहून दामाजीपंतांचे मन हेलावले. त्यांनी विचार केला की, सम्राटाची कोठारे धनधान्याने तुडुंब भरलेली असतांना प्रजेला भुकेने तडफडून मरू देणे योग्य नव्हे. म्हणून दामाजीपंतांनी आसपासच्या गावांत दवंडी पिटवून सांगितले की, सर्व लोकांनी सरकारी कोठारात येऊन आवश्यकतेपुरते धान्य न्यावे. लोकांनी दवंडी ऐकली. लोकांसाठी स्वत: दामाजीपंतांनी कोठाराचे द्वार खुले करून दिले. लोकांच्या झुंडी धान्याच्या कोठाराकडे जाऊ लागल्या. सम्राटाला न विचारता दामाजीपंतांनी कोठारातील धान्य लोकांना वाटले, ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. सम्राटाला हे समजताच त्याने आरक्षकांना आज्ञा दिली की, दामाजीपंतांना अटक करून राजसभेत आमच्यासमोर उपस्थित करा.
इकडे हा सर्व प्रकार सर्वज्ञानी पांडुरंगाने जाणला आणि भक्ताचे संकट निवारण्याकरिता त्याने एक युक्ती केली. पांडुरंगाने स्वत: महाराचे रूप घेतले. त्याने फाटकी वस्त्रे परिधान करून पाठीवर घोंगडे, हातात काठी, डोक्याला मुंडासे आणि त्यावर छोटी मोहरांची थैली, असा पेहराव केला अन् तो सम्राटाच्या राजसभेत उपस्थित झाला. त्यावर रूप पालटून आलेल्या पांडुरंगाला पाहून, ‘तुम कौन हो, कहाँसे आए हो, तुमने सिरपर क्या लाया है ?’, असे एकाच वेळी अनेक प्रश्न सम्राटाने विचारले. त्यावर पांडुरंग आपला परिचय करून देत म्हणाला, ”मी मंगळवेढ्याचा महार, विठू; दामाजीचा चाकर”, असे म्हणून त्याने डोक्यावरची थैली ओतायला प्रारंभ केला. पहाता पहाता सुवर्णमोहरांचा मोठा ढीग सम्राटाच्या समोर पडला. हा चमत्कार पाहून सम्राट आणि राजसभेतील इतर सरदार यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. इकडे आरक्षकांनी दामाजीपंतांना कैद करून सम्राटापुढे उपस्थित केले; परंतु सम्राटाने दामाजीपंतांच्या हातकड्या काढायला सांगून त्यांना मोकळे केले आणि घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. हा सर्व प्रकार ऐकून दामाजीपंतांच्या लगेचच सर्व लक्षात आले. आपले संकट टाळण्याकरिता पांडुरंगाला महार होऊन आपल्या चाकराचे काम करावे लागले, याचे त्यांना फार वाईट वाटले. त्यांचा कंठ दाटून आला.
मुलांनो, आपणही परमेश्वराची भक्ती करून, त्याच्यावर श्रद्धा ठेवून परोपकारी वृत्ती जोपासली, तर दामाजीपंतांप्रमाणे आपल्यावरही त्याची कृपा होऊ शकते.