परदेशी नव्हेत, तर स्वदेशी खेळ खेळा !

१. परदेशी खेळांमुळे राष्ट्राभिमान घटणे

काही वर्षांपूर्वी ‘दूरदर्शन’वर दाखवले जाणारे हुतुतू (कबड्डी), खो-खो यांसारखे भारतीय खेळ मुले आवडीने पहायचे, तसेच खेळायचेही. सध्या दूरचित्रवाहिन्यांवर क्रिकेट, फूटबॉल यांसारखे परदेशी खेळ सातत्याने दाखवले जात असल्याने मुलांना तेच आवडू लागले आहेत. ते खेळायला लागल्यावर त्या खेळांविषयी नकळत अभिमान वाटायला लागतो. त्यामुळे नकळत राष्ट्राभिमान घटायला लागतो.

२. राष्ट्रभक्तांनी परदेशी खेळांचा ओळखलेला धोका !

अ. क्रिकेट

१. ‘आम्हास क्रिकेट खेळाची मोठी किळस वाटे. आपले १,००० खेळ एकीकडे सारून क्रिकेटच्या नादी लागलेली मुले आणि त्यांना उत्तेजन देणारे त्यांचे मास्तरलोक यांच्याविषयी आम्हाला फार द्वेष येऊ लागला. म्हणून आम्ही व्यवस्था केली ती अशी की, पाच-सहा मुलांची टोळी करून तिला क्रिकेट खेळ ज्या ठिकाणी चालला असेल तिकडे पाठवायचे आणि युक्तीप्रयुक्तीने त्यांचे क्रिकेटचे सामान लांबवायचे. असा क्रम चालला. त्यात कोठे मारामारी होत असे. कोठे मारामारी न करताच सामान हाती लागे.’ – हुतात्मा दामोदर हरि चापेकर

२. ‘क्रिकेट हा आता सभ्य लोकांचा खेळ नव्हे, तर निर्लज्जांचा खेळ झाला आहे. २६.११.२००८ या दिवशी पाकिस्तानने मुंबईवर आतंकवादी आक्रमण केले. त्यात १६० च्या वर नागरिक आणि २० पोलीस मारले गेले. ते विसरून डिसेंबर २०१२ मध्ये हिंदुस्थानात ‘भारत विरुद्ध पाक एकदिवसीय मालिका’ आयोजित करून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसाठी पायघड्या घालणे, हा देशद्रोह आहे !’ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (१८.७.२०१२)

आ. बॅडमिंटन

मंडालेहून कारावास भोगून लोकमान्य टिळक घरी आले. पहातात तर मुलांच्या खोलीत ‘बॅडमिंटन’चा संच ! तो परदेशी खेळ पाहून ते मुलांवर रागावले आणि त्यांनी तो संचच फेकून दिला !

३. काही परदेशी खेळ आणि त्यांचे दुष्परिणाम

अ. क्रिकेट

१. क्रिकेटमुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणे : क्रिकेटच्या वेडापायी अनेक मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होते. अभ्यास अल्प झाल्यामुळे त्यांना परीक्षेत अल्प गुण मिळतात. क्रिकेट पहाण्यात वा खेळण्यात वेळ वाया घालवला, या कारणासाठी आई-वडिलांची बोलणी आणि अभ्यास न केल्याने शिक्षकांचा मार खावा लागतो, तो वेगळाच !

२. देशाचे अब्जावधी मनुष्यघंटे वाया जाणे ! : व्यवसाय आणि नोकरी करणारे कोट्यवधी लोक सुटी काढून क्रिकेटचे सामने कित्येक घंटे (तास) पहातात. सध्या देशाची नैतिक, आर्थिक, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रांत दयनीय स्थिती असतांना देशाचे अब्जावधी मनुष्यघंटे वाया घालवण योग्य आहे का ? हाच वेळ देशाच्या विकासासाठी वापरला, तर देश लवकर प्रगतीपथावर जाईल !

आ. संगणकीय ‘गेम्स’

यांमधून बाहेर पडणाऱ्या त्रासदायक लहरींमुळे डोळे आणि डोके यांवर विपरीत परिणाम होतो. ते दुखू लागतात. तसेच त्रासदायक स्पंदनांचा मन आणि बुद्धी यांच्यावरही वाईट परिणाम होतो.

४. देशी खेळ आणि त्यांचे लाभ

कबड्डी, विटीदांडू, लंगडी, लगोरी, खो-खो, कुस्ती, हत्तीची सोंड, तळ्यात-मळ्यात, आबाधोबी, विषामृत (विषअमृत), बुद्धीबळ इत्यादी शेकडो देशी खेळ आहेत.

देशी खेळ खेळल्याने होणारे लाभ

१. विदेशी खेळांच्या तुलनेत देशी खेळ लवकर खेळून होतात.

२. देशी खेळांच्या साहित्यासाठी व्यय (खर्च) अल्प असतो.

३. देशी खेळांमुळे खिलाडूवृत्ती वाढीस लागते.

४. देशी खेळ खेळल्याने त्यांचे जतन आणि संवर्धन होते, तसेच देशाभिमान वाढतो.

मुलांनो, देश आणि धर्म यांची सध्याची दुःस्थिती पहाता येती काही वर्षे खेळण्यात फार वेळ गमावणे योग्य नाही. हा वेळ अभ्यास, व्यायाम, क्रांतीकारकांच्या चरित्रांचे वाचन, नामजप, तसेच राष्ट्रकार्य अन् धर्मकार्य यांसाठी वापरला, तर ते आधिक योग्य होईल, हे लक्षात घ्या !

५. स्वदेशीची अन्य क्षेत्रे

मुलांनो, केवळ भाषा, वस्तू आणि खेळ यांच्याविषयीच नव्हे, तर शिक्षण, तंत्रज्ञान, औषधोपचार आदी सर्वच क्षेत्रांत स्वदेशीचा पुरस्कार करा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

0 thoughts on “परदेशी नव्हेत, तर स्वदेशी खेळ खेळा !”

Leave a Comment