‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण असून धर्माचरण करा !

‘धर्म’ हा राष्ट्राचा प्राण आहे. राष्ट्राला धर्माचे अधिष्ठान असेल, राजा अन् प्रजा दोघेही धर्मपालक असतील, तरच ते राष्ट्र सर्व संकटांतून मुक्त अन् सुखी होते. धर्माविषयी प्रेम वाटायला लागले की, धर्माविषयी अभिमान निर्माण होतो. धर्माविषयी अभिमान निर्माण झाला की, धर्मरक्षण करण्याचे बळ आपल्या अंगी येते !

रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधतांना वडील आठवण करून देतात, ‘‘बहिणीचे रक्षण करणे, हा भावाचा धर्म आहे.’’ शाळेत आलेले पाहुणे त्यांच्या भाषणात सांगतात, ‘‘अभ्यास करणे, हा विद्यार्थ्यांचा धर्म आहे.’’ अशा प्रकारे ‘धर्म’ हा शब्द तुमच्या कानावर अनेकदा पडलेला असतो. त्यामुळे ‘धर्म म्हणजे नेमके काय’, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल ना ?

‘धर्म’ म्हणजे मनुष्यासह सर्व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी ईश्वराने घालून दिलेले नियम !

१. धर्माचे महत्त्व

अ. धर्मामुळेच आनंद मिळतो !

सुखस्य मूलं धर्मः । – चाणक्यसूत्रे, अध्याय १, सूत्र १ ते ९
अर्थ : सुखाचे मूळ धर्म (धर्माचरण करण्यात) आहे.

भावार्थ : येथे ‘सुख’ हा शब्द ‘आनंद’ या अर्थी घ्यायचा आहे. मुलांनो, ‘आईस्क्रीम’ खाल्ले वा तुमच्या आवडीचा चित्रपट पाहिला की, तुम्हाला सुख मिळते. हे सुख किती काळ टिकते ? थोड्या वेळाने हे सुख विरून जाते. अशा सुखाच्या कित्येक पट सुख, म्हणजेच ‘आनंद’ आणि तोही सतत मिळवून देणारी गोष्ट कोणती, तर ती म्हणजे ‘धर्म’. यासाठी अर्थातच धर्माचरण करावे लागते. तरच तो आनंद आपल्याला मिळतो.

आ. राष्ट्रासाठीही धर्म महत्त्वाचा !

१. धर्मामुळे निसर्ग अनुकूल होतो.

२. धर्माचे अधिष्ठान असलेले राष्ट्र आणि तेथील प्रजा सर्व दृष्टीने सुखी होते.

२. धर्मशिक्षणाची आवश्यकता

मुलांनो, धर्माचे महत्त्व समजून घेतल्यावर धर्माविषयी प्रेम वाटते आणि प्रत्यक्ष धर्माचरण केल्यावर ते प्रेम वाढते. धर्माचरण करता येण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता असते.

अ. आजची पिढी धर्मशिक्षणापासून वंचित होण्याचे कारण

इंग्रजांनी लादलेल्या मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीमुळे हिंदूंच्या काही पिढ्या धर्मशिक्षणापासून दूर गेल्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही तीच शिक्षणपद्धत राबवली गेल्याने सर्वसाधारणपणे मुले आज धर्मशिक्षणापासून वंचित झाली आहेत.

आ. हिंदू मुलांना धर्मशिक्षणाची आवश्यकता असल्याचे दर्शवणारा प्रसंग आणि उदाहरणे

अ. हिंदू मुलांना वर्गात एकही धार्मिक कृती करून दाखवता न येणे : ‘सातवी इयत्तेच्या इतिहासद्रोही पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पणजी (गोवा) येथे घेण्यात आलेल्या बैठकीत उपास्थित असलेल्या एका शिक्षकाने धर्मशिक्षणाची हिंदूंना किती आवश्यकता आहे, ते दर्शवणारे उदाहरण सांगितले. त्यांच्याच शब्दांत ते पाहूया.

‘मी माझ्या वर्गातील काही मुसलमान मुलांना विचारले, ‘‘तुमच्या पंथाप्रमाणे शिकवलेली एखादी कृती तुम्ही करून दाखवाल का ?’’ लगेचच चार मुले खाली नमाज पढण्याच्या स्थितीत बसली. चौघांनी एकाच वेळी माना खाली घातल्या, हात पुढे केले आणि ‘या अल्ला…’ असे म्हटले. त्यानंतर मी काही हिंदू मुलांना हिंदु धर्मातील एखादी धार्मिक कृती करायला सांगितली; परंतु त्या मुलांना प्रश्न पडला ! मी त्यांना ‘निदान एक आरती तरी म्हणून दाखवा’, असे सांगितले; परंतु त्या मुलांना काहीच जमेना !’ – श्री गोविंद चोडणकर, अस्नोडा, गोवा.

आ. देवतांच्या विडंबनावर हसणारी मुले ! : शाळेत सादर होणाऱ्या नाटिकांमध्ये देवतांवर केल्या जाणाऱ्या विनोदांना काही मुले टाळ्या वाजवून दाद देतात किंवा देवता झालेल्या पात्रांच्या तोंडचे अश्लील संवाद ऐकून हसतात. देवतांच्या संदर्भात केल्या जाणाऱ्या अशा कृती, हे देवतांचे विडंबन असून त्यामुळे पाप लागते. तसेच अशा विडंबनाचे समर्थन केल्यामुळे आपणही त्या पापाचे भागीदार होतो, हेही त्या मुलांना कळत नाही. अशा चुकीच्या कृती धर्मशिक्षणाच्या अभावी मुलांकडून घडतात. त्यांना धर्मशिक्षण दिले, तर ती मुले धर्माचरण करतील अन् त्यांना अनुभूतीही येतील.

३. धर्माचरण करा !

मुलांनो, धर्माचरण केल्यामुळे धर्माविषयीचे प्रेम वाढते आणि त्यामुळे धर्माविषयी अभिमान निर्माण होतो. धर्माचरणामुळे ईश्वराचा आशीर्वाद मिळतो आणि संकटात तो आपले रक्षणही करतो.

मुलांनो, मुसलमान मुले नमाजाची वेळ झाल्यावर न लाजता मार्गात (रस्त्यात), आगगाडीत अशा प्रकारे कोठेही सर्वांसमोर नमाज पढतात. यातून त्यांची धर्माचरणाची तळमळ दिसून येते. तुम्हीही घरी आणि अन्यत्र धर्माचरण करायला लाजू नका.

अ. धर्माचरणाच्या काही दैनंदिन कृती

अ. प्रतिदिन स्नान झाल्यावर देवपूजा करा !

आ. मुलांनी कपाळावर उभा टिळा लावून आणि मुलींनी गोल कुंकू लावून शाळेत जावे !

इ. पाश्चात्त्य पद्धतीनुसार आसंदीवर (खुर्चीवर) बसून जेवू नका, तर आसनावर / पाटावर मांडी घालून जेवायला बसा !

ई. घरी, उपाहारगृहात (हॉटेलमध्ये), प्रवासात किंवा अन्य कोठेही भोजनापूर्वी देवाला हात जोडून प्रार्थना करा !

उ. दिवेलागणीच्या वेळी, म्हणजे सायंकाळी स्तोत्रपठण करा !

आ. देवालयासंबंधित काही कृती

अ. देवालयाच्या परिसरात पादत्राणे घालून फिरणे, तेथे मोठ्याने वा अनावश्यक बोलणे, ‘मोबाईल’वर चित्रपटगीते ऐकणे, खेळणे आदी कृती करू नका आणि देवालयाचे पावित्र्य राखा !

आ. देवतेकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य ग्रहण होण्यासाठी सतत प्रार्थना अन् नामजप करा !

इ. देवालयातील दानपेटीत काही धन अर्पण करा !

ई. प्रसादाच्या पुडीची वेष्टने, केळींची साले, नारळाच्या करवंट्या इत्यादी कचरा देवालयाच्या परिसरात न टाकता कचराकुंडीत टाका !

धर्माचरणाच्या काही अन्य कृती

अ. देवतांची चित्रे किंवा ‘ॐ’ आदी धर्मचिन्हे असलेले कपडे वापरू नये !

आ. वाढदिवसाच्या शुभेच्छा रात्री १२ वाजता नव्हे, तर सूर्योदयानंतर द्या !

इ. वाढदिवस इंग्रजी दिनांकानुसार नव्हे, तर तिथीनुसार साजरा करा !

ई. वास्तूचे उद्घाटन ‘फीत’ कापून नव्हे, तर श्रीफळ (नारळ) वाढवून करा !

उ. दीपप्रज्वलन मेणबत्तीने नव्हे, तर तेलाच्या दिव्याने (कयपंजीने) करा !

ऊ. मान्यवरांचा सत्कार करतांना पुष्पगुच्छ (बुके) नव्हे, तर फूल द्यावे किंवा हार घाला !

ए. कुलदेवतेचा नामजप प्रतिदिन न्यूनतम (कमीतकमी) १ घंटा (तास) आणि जास्तीतजास्त सतत करा !

संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘राष्ट्र आणि धर्म प्रेमी व्हा !

Leave a Comment