॥ श्रीगणेशाय नमः ॥
जय जयाजी राघवा रामा । जय जयाजी मेघःश्यामा ।
संतजनांच्या विश्रामा । सीतापते दाशरथे ॥१॥
तुझ्या कृपेनें वानर । बलिष्ठ झाले भूमीवर ।
ज्यांनीं रावणाचा चक्काचूर । केला देवा लंकेवरी ॥२॥
तुझी कृपा झाल्या पाही । तो सर्वदा होतो विजयी ।
जें जें इच्छील तें तें नेई । काम आपलें तडीला ॥३॥
भूपतीचा वशीला । ज्यातें देवा ! लाधला ।
तो वंद्य होतो दिवाणाला । नीच कितीही असला जरी ॥४॥
ऐशा अमोघ कृपेला । होईन कां मी योग्य भला ।
याचा जों मीं विचार केला । तों ऐसें आलें कळोन ॥५॥
नाहीं ज्ञान नाहीं भक्ति । खरीखुरी हे श्रीपती ।
ऐसी आहे माझी स्थिति । शोचनीय पांडुरंगा ॥६॥
मन सदा आशाळभूत । तें ना कदा स्थिर होत ।
नाना विकल्प मनांत । येऊं लागती वरच्यावरी ॥७॥
मग ऐशा पातक्याला । केवि लाधावा वशीला ।
तुझा सांग जगत्पाला । हें व्यावहारिक म्हणणें असे ॥८॥
तुला आवडी पातक्याची । मनापासून आहे साची ।
ऐसी साक्ष पुराणाची । आहे कीं दीनबंधो ॥९॥
पुण्यवानाचें तारण । केल्या न कांहीं नवल जाण ।
जो पातक्यालागून । उद्धरीतसे तोच मोठा ॥१०॥
या जगतीं तुझ्याहून । मोठा नाहीं कोणी आन ।
देवा मम पातकालागून । किमपि आतां पाहूं नको ॥११॥
रक्षी आपला मोठेपणा । मज सांभाळी नारायणा ।
दासगणू शरण चरणा । आतां उपेक्षा करुं नका ॥१२॥
हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव ।
याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१३॥
हें पाटीलघराणें जाण । आहे अति पुरातन ।
घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥१४॥
पूर्वीपासून यांच्या घरीं । संत-सेवा होती खरी ।
आली भाग्यें जमेदारी । मग काय विचारितां ? ॥१५॥
महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस ।
थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥१६॥
कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका ।
गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥१७॥
पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहाजण ।
कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हता त्याचे कुशीं ॥१८॥
कडताजी पावतां मरण । साही मुलांचें संगोपन ।
कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥१९॥
कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत ।
अष्टसिद्धि सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥२०॥
पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार ।
याच्या पुढें साचार । कांहीं न चाले कोणाचें ॥२१॥
या खंडू पाटलाप्रती । पांच बंधु निश्चिती ।
गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥२२॥
आधींच पाटील जमेदार । सत्ता हातीं साचार ।
पैशाचा तो निघे धूर । जयाचिया सदनामध्यें ॥२३॥
बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती ।
कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥२४॥
उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा ।
म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥२५॥
नेहमीं कटकटी मारामार्या । शेगांवांत होती खर्या ।
पाटील एक्या मापीं सार्या । लोकांप्रती मोजितसे ॥२६॥
हा सज्जन साधुसंत । हें न ज्यांच्या मनीं येत ।
वाटेल त्या बोलती सत्य । अद्वातद्वा यथामती ॥२७॥
असो पाटीलबंधूंनीं । राउळांत येऊनी ।
महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरुं केलें ॥२८॥
कोणी म्हणावें पिश्यागण्या । खातोस का ताककण्या ? ।
ऐशा गोष्टी अति उण्या । त्यांनीं कराव्या समर्थासी ॥२९॥
कोणी म्हणावें खेळ कुस्ती । आम्हांसवें निश्चिती ।
तुला लोक बोलती । योगयोगेश्वर म्हणोन ॥३०॥
त्याचें दाव प्रत्यंतर । ना तरी आम्ही देऊं मार ।
याचा करी विचार । बर्या बोलानें येधवां ॥३१॥
त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें ।
अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित् ॥३२॥
ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर ।
म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥३३॥
नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं ।
हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥३४॥
हे शक्तीनें माजलें । लक्ष्मीनें धुंद झाले ।
सत्तेपुढें कांहीं न चाले । येथें यांची पाटीलकी ॥३५॥
गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी ।
ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परम भक्त ॥३६॥
मात्र विनयाप्रती थारा । यांच्यापाशीं नाहीं जरा ।
शोधुनि पहा अंतरा । त्यांच्या म्हणजे कळेल तुज ॥३७॥
हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेंकरें आहेत साचीं ।
कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥३८॥
जमेदारा उर्मटपण । हेंच आहे भूषण ।
काय वाघाचें तें वजन । असावें सांग गाईपरी ? ॥३९॥
तलवारीला मऊपणा । मुळीं उपयोगी नाहीं जाणा ।
अग्नीनें तो थंडपणा । सांग धरावा कवण्या रीती ? ॥४०॥
गेल्यावरी कांहीं काळ । हा उर्मटपणा जाईल ।
पावसाळ्याचें गढूळ जल । हिंवाळ्यांत निवळ होई ॥४१॥
एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरीं ।
महाराजाला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥४२॥
तुला कुस्तींत करीन चीत । चाल जाऊं तालमींत ।
उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥४३॥
तुझें प्रस्थ माजलें बहु । तें खरें खोटें आज पाहूं ।
मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥४४॥
तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्यें गेले ।
समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥४५॥
खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून ।
असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥४६॥
हरी पाटील उठवावया । लागला यत्न करावया ।
परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥४७॥
घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली ।
पेच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥४८॥
हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? ।
अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥४९॥
हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी ।
खोडया आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥५०॥
त्याचें हेंच कारण । हा गजापरी बलवान ।
आम्ही जंबुकासमान । म्हणून नाहीं रागावला ॥५१॥
जंबुकाच्या चेष्टेला । गजपती न मानी भला ।
श्वानाचिया भुंकण्याला । व्याघ्र दे ना किंमत ॥५२॥
कांहीं असो याच्या पायीं । आतां ठेवणें आली डोई ।
आजपर्यंत मी नाहीं । कवणासीही नमन केलें ॥५३॥
समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला ।
ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥५४॥
कुस्ती हा मर्दानी । षोक श्रेष्ठ सर्वांहुनी ।
कृष्ण बलरामें बालपणीं । ऐशाच कुस्त्या केल्या रे ! ॥५५॥
मुष्टिक आणि चाणूर । मल्लविद्येनें परमेश्वर ।
वधिता झाला साचार । जे देहरक्षक कंसाचे॥५६॥
पहिली संपत्ति शरीर । दुअरें तें घरदार ।
तिसरीचा तो प्रकार । आहे धनमानाचा ॥५७॥
तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातीरीं ।
गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥५८॥
तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें ।
ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥५९॥
हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज ।
येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥६०॥
हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास ।
शेगांवच्या लेंकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥६१॥
ऐसें धूर्तपणाचें बोलणें । केलें पाटील हरीनें ।
जे मुळांत असती शहाणे । त्यांना शाळा नको कीं ॥६२॥
असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून ।
अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥६३॥
ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती ।
हरी तूं त्या जोगडयाप्रति । कां भितोसी कळेना ॥६४॥
आपण पाटलाचे कुमार । या गांवींचे जमेदार ।
तें तूंच कां रे ठेविशी शिर । पदीं त्या नागव्याच्या ॥६५॥
त्या पिशाचें थोतांड । गांवीं माजलें उदंड ।
त्याचा पाहिजे काढिला दांड । लोकां सावध करावया ॥६६॥
ऐसें न जरी आपण केलें । तरी लोक अवघे होतील खुळे ।
पाटलाचें कर्तव्य भलें । गांवा हुशार करण्याचें ॥६७॥
मैंद साधूचे वेष घेती । वेडयावांकडया कृत्या करिती ।
बाया बापडया भोंदिती । याचा करी विचार ॥६८॥
सोन्या कस लाविल्याविना । न कळे रे सोनेपणा ।
तुकारामाचा शांतपणा । कळून आला उंसानें ॥६९॥
ज्ञानेश तेव्हां साधु कळला । जेव्हां रेडा बोलला ।
परीक्षेविण कवणाला । अस्थानीं मान देऊं नये ॥७०॥
चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची ।
मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥७१॥
हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला ।
अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥७२॥
जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची ।
तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥७३॥
आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर ।
त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥७४॥
ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले ।
लेंकरांचे बालिश चाळे । मनीं न आणी सुज्ञ कदा ॥७५॥
मारुती म्हणाला त्यावर । अरे हा भ्याला साचार ।
ऊंसाचा तो खाण्या मार । हा कांहीं तयार नसे ॥७६॥
मग म्हणाला गणपती । अरे मौन हीच संमती ।
त्यानें दिधली आपणाप्रति । आतां काय पहातां ? ॥७७॥
तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले ।
समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥७८॥
तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर ।
ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥७९॥
भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी ।
या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥८०॥
तुमचा पाटील-कुळांत । जन्म झाला आहे सत्य ।
तुमचें असावें दयाभूत । अंतःकरण दीनांविषयीं ॥८१॥
हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसीं ।
तरी हीन दीन लेखून यासी । द्यावें सोडून हेंच बरें ॥८२॥
अरे शूर जे का शिकारी । ते चाल करिती वाघावरी ।
उगीच बंदूक घेऊनि करीं । न मारिती नाकतोडा ॥८३॥
मारुतीनें जाळिली । रावणाची लंका भली ।
उगीच नाहीं चाल केली । झोंपडया पाहून दुबळ्यांच्या ॥८४॥
यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिलें सारें ।
गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥८५॥
म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग ।
यांत न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥८६॥
ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत ।
जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥८७॥
परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले ।
कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥८८॥
तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं ।
म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥८९॥
महाराज म्हणती पोरांला । मुलांनो ! तुमच्या करांला ।
असेल अती त्रास झाला । मारण्यानें मजलागीं ॥९०॥
त्या श्रमाचा करण्या नास । काढून देतों इक्षुरस ।
तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥९१॥
ऐसें म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला ।
हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥९२॥
त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनीं पहा पिळिली ।
आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥९३॥
श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस ।
तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥९४॥
लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती ।
योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥९५॥
पौष्टिक पदार्थें शक्ति येते । परी न ऐशी कायम टिकते ।
सशक्त आपुल्या राष्ट्रातें । करणें असल्या योग शिका ॥९६॥
हेंच तत्त्व सुचवावयासी । त्या पाटील अर्भकांशीं ।
करें काढून रसाशीं । दाविते झाले श्रोते हो ॥९७॥
समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून ।
खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥९८॥
दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात् ।
त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥९९॥
ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी ।
ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥१००॥
मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला ।
परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित् ॥१॥
गण्या, गजा ऐसें म्हणे । पाटील समर्थाकारणें ।
अरे तुरे हें बोलणें । होतें दोन ठिकाणीं ॥२॥
प्रेम आत्यंतिक जें काई । तेथें ऐसें घडून येई ।
आई लेंकरांमाजी होई । भाषण अरेतुरेचें ॥३॥
हा एक प्रकार झाला । आतां दुसरा राहिला ।
तोही सांगतों ऐका भला । सावधान चित्तानें ॥४॥
नोकर चाकर हीन दीन । यांच्या सवें जें भाषण ।
करिती संभावित जन । तेंही एकेरी स्वरुपाचें ॥५॥
अरे तुरे म्हणण्याची । संवय पाटला पडे साची ।
कां कीं रयत गांवचीं । लेकरें त्याचीं निःसंशय ॥६॥
श्रोते याच संवयीनें । खंडू पाटील गण्या म्हणे ।
श्रीसमर्थांकारणें । कांहीं न दुसरें कारण ॥७॥
गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणीं ।
पहा नारळालागुनी । वर करवंटीं खोबरें आंत ॥८॥
याच न्यायें तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा ।
वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥९॥
कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं ।
तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥११०॥
सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी ।
मग का रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्याच्या पुढें ॥११॥
तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृधापकाळ ।
नातवंडाचे बोल खेळ । पाहूं दे मज डोळ्यानें ॥१२॥
आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना ।
म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादें द्या मज ॥१३॥
तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ ।
आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥१४॥
साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं ।
संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥१५॥
तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणें केलें ।
मारुतीच्या मंदिरीं भलें । तें ऐका येणें रितीं ॥१६॥
अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां ।
इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥१७॥
तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती ।
इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥१८॥
त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर ।
तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥१९॥
ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्याशीं बोलले ।
आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥१२०॥
सत्ता धन तुझ्या हातीं । तूं प्रयत्नवादी असशी निगुती ।
मग विनंती आम्हांप्रति । कां करितोस कळेना ? ॥२१॥
धन आणि बलापुढें । अवघेंच म्हणशी बापुडें ।
मग कां रे हें न घडे । साह्यें धनबालच्या ॥२२॥
तुझी भव्य आहे शेती । गिरण्या दुकानें पेढया अती ।
तुझें न कोणी मोडती । जन शब्द या वर्हाडांत ॥२३॥
मग त्या ब्रह्मदेवाला । कां न आज्ञा करिशी भला ? ।
आपणां पुत्र द्यावयाला । हेंच कोडें पडलें मज ॥२४॥
खंडू करी भाषण । ही गोष्ट ना यत्नाधीन ।
पिकें पाण्यापासून । येती जरी जगामध्यें ॥२५॥
तरी पाडणें पाणी । मानवाच्या न करी जाणी ।
दुष्काळांत जमिनी । पडती उताण्या ख्यात हें ॥२६॥
मात्र पाणी पडल्यावर । कर्तृत्व आपुलें चालवी नर ।
तैसाच हाही प्रकार । तेथें न गती मानवाची ॥२७॥
खंडू पाडील ऐसें बोलतां । हंसूं आलें समर्था ।
तूं केलीस याचना आतां । मजकारणें पोराची ॥२८॥
याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख ।
तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥२९॥
पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी ।
परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठीं परमेश्वरा ॥१३०॥
तो ऐकेल माझी भीड । त्याला न हें कांहीं जड ।
तूं घरचा आहेस धड । रस आंब्याचा द्विजां घाली ॥३१॥
हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण ।
आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥३२॥
हें खंडुनें ऐकिलें । घरीं येऊन सांगितलें ।
कुकाजीसी निवेदिलें । मंदिरींचें वर्तमान ॥३३॥
हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस ।
तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥३४॥
कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची ।
गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥३५॥
तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला ।
कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥३६॥
त्यानें दह्र्म केला बहू । गरीबां दिले गूळ गहूं ।
पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥३७॥
थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें ।
पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदूपरी ॥३८॥
आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण ।
तो सांप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥३९॥
पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी ।
पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥१४०॥
हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा ।
शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥४१॥
एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची ।
अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥४२॥
प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात ।
सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥४३॥
शास्त्री दोन मंत्री दोन । शस्त्री दोन तंत्री दोन ।
एकमेकांपुढें श्वान । येतां गुरगुर रोकडी ॥४४॥
तैसें झालें शेगांवांत । पाटील आणि देशमुखांत ।
छत्तिसाचा आंकडा सत्य । झाला न होईल त्रेसष्टाचा ॥४५॥
पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी ।
पाहूनिया नातवंडासी । भीमातटीं पंढरींत ॥४६॥
तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन ।
तो म्हणे छत्र पूर्ण । माझें आज ढासळलें ॥४७॥
ज्या चुलत्याच्या जिवावरी । मी निर्भय होतों भूमिवरी ।
तो आधार माझा श्रीहरी । कां रे नेलास काढून ? ॥४८॥
ऐशी संधि पाहून । बालंट आणायाकारण ।
पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥४९॥
तो वृत्तान्त अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत ।
ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥१५०॥
हा दासगणूविरचित । गजाननविजयनामें ग्रंथ ।
परिसा श्रोते सावचित्त । कुतर्कातें सोडोनिया ॥१५१॥
शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥