चंद्रगड

सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रा बाहेरही परिचित आहे. काही वर्षापूर्वी उन्हाळ्यात महाबळेश्वर येथे येणारे पर्यटक सध्या वर्षभर येथील निसर्गाच्या सानिध्यात येवू लागले आहेत.

महाबळेश्वरमधील निसर्ग, जंगल तसेच डोंगरदर्‍या या पर्यटकांना नेहेमीची भुरळ घालीत असतात. या भटकंती दरम्यान क्षेत्र महाबळेश्वर आणि ऑर्थर सीट या स्थळांना पर्यटक आवर्जुन भेट देतात.

महाबळेश्वर सातारा, पुणे तसेच मुंबईशी गाडी मार्गाने चांगलेच जोडले गेले आहे. एस.टी.बसेसचीही सेवा नियमित आहे. महाबळेश्वर एस.टी. स्थानकापासून ऑर्थर सीट साधारण ११ कि.मी. अंतरावर आहे. ऑर्थर सीट कडे जाणार्‍या गाडी रस्त्यावर दुतर्फा असणार्‍या घनदाट जंगलामुळे हा प्रवास नेहेमीच आनंददायी असतो. याच वाटेवर क्षेत्र महाबळेश्वर ही आहे.

महाबळेश्वर ते ऑर्थर सीट हा प्रवास खाजगी वाहनाने स्थानिक टॅक्सीने अथवा पायी सददा करता येतो. ऑर्थर सीट चा भाग पुर्वी मढीमहल या नावाने परिचित होता. ऑर्थर सीट च्या टोकावर उभे राहील्यास सह्याद्रीचे रौद्रभिषण कातळकडे नेत्रांना सुखावित असले तरी उरात धडकी भरवतात.

ऑर्थर सीट च्या टोकावरुन विस्तृत प्रदेश न्याहाळायला मिळतो. प्रतापगड, रायगड, तोरणा हे किल्लेही येथून दिसतात. याच बरोबर खालच्या दरीत दबा धरुन बसलेला चंद्रगड उर्फ ढवळगडाचा किल्लाही आपले लक्षवेधून घेतो. ढवळीनदीच्या खोर्‍यात हा चंद्रगड पुर्वी जावळीच्या मोर्‍यांच्या अखत्यारीत होता.

जावळीच्या मोर्‍यांना चंद्रराव हा किताब होता. हा चंद्रराव वारल्यावर या गादीसाठी मोर्‍यांमधे तंटा उभा राहीला. शिवाजीराजांनी मध्यस्ती करुन तो मिटवला आणि येथील यशवंतराव मोरे हा चंद्रराव झाला. शिवाजीराजांनी केलेली मदत विसरुन या चंद्ररावाने त्यांच्याच विरुद्ध जावून आदिलशाहीशी सलोखा वाढवला. महाराजांच्या लोकांनाच त्रास देवू लागला. शिवाजीराजांनी चंद्ररावाला सामोपचाराने समजावून सांगितले पण मोरे शत्रुत्वानेच वागू लागले. महाराजांच्या राज्यात गुन्हे करुन शिक्षेच्या भितीने काही गुन्हेगार पळून या मोर्‍यांच्या आश्रयाला गेले त्यांना उघडपणे मोर्‍यांनी पाठीशी घातले. हे गुन्हेगार महाराजांच्या ताब्यात न देता उलटच निरोप महाराजांना पाठविला. उद्या येणार असाल तर आजच या. जावळीस येणार असाल तर दारु गोळा मौजूद आहे.

जावळी प्रांत वाईच्या सुभ्यात मोडत होता. वाईची सुभेदारी अफझलखानाकडे होती. त्यामुळे जावळीवर हल्ला केला तर अफझलखान नक्की येणार हे महाराजांना माहीत होते. त्यामुळे महाराज संधीची वाट पहात होते. इ.स.१६५५ -५६ मधे अफझलखान दक्षिण भारतात युद्धात गुंतलेला होता ती वेळ साधून महाराजांनी जावळीवर हल्ला चढवला. मोर्‍यांना नेस्तनाबूत केले आणि जावळी स्वराज्यात दाखल झाली. त्या बरोबर ढवळगड ही स्वराज्यात दाखल झाला. त्याचे नाव बदलून महाराजांनी चंद्रगड ठेवले.

ऑर्थर सीट जवळून एक पायवाट खाली चंद्रगडाकडे जाते. ही वाट ढवळ्याघाट या नावाने ओळखली जाते. जंगल घसारा, ओढेनाले यामधून जाणारी ही धाटवाट अनेकांना गुंगारा देते. त्यामुळे गरजेची साधन सामुग्री म्हणजे अन्न, पाणी आणि सोबत माहीतगार वाटाडय़ा घेवूनच या मार्गावर चालू लागावे. चंद्रगडापर्यंत पोहचण्यात साडेतीन ते चार तास लागतात. वाटेत बिबटय़ा तसेच वन्यप्राण्यांचेही दर्शन होवू शकते हे लक्षात ठेवावे. नवख्यानी मात्र हा मार्ग चोखाळू नये.

चंद्रगडाचे दर्शन जरी महाबळेश्वरच्या ऑर्थरसीट कडून होत असले तरी चंद्रगड हा रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर तालुक्यामधे आहे.

मुंबई-पणजी महामार्गावर पोलादपूर गाव आहे. येथून चंद्रगडाच्या पायथ्याच्या ढवळे गावात जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. ठरावीक वेळेवर एस.टी.बसेसचीही सोय आहे. या गाडीमार्गावर ढवळे गावाच्या अलिकडे सहा कि.मी. वर उमरठ या गावी नरवीर तानाजी मालूसरे आणि शेलार मामा यांची स्मारके आहेत. ती पाहून पुढे जाता येईल.

उमरठ अथवा ढवळे येथे मुक्कामी राहून सकाळी चंद्रगडाला गेल्यास सोयीचे ठरते. ढवळे गावातून सोबतीला वाटाडय़ा अवश्य घ्यावा. पाणी व खाद्यपदार्थ घेवून सकाळी लवकर निघावे. ढवळेगावापुढे पाच मिनिटांच्या चालीवर लहानशी वस्ती आहे. येथून वाट जंगलात घुसते. तासाभराच्या वाटचालीत आपण खिंडीत पोहोचतो या खिंडीला म्हसोबाची खिंड म्हणतात. येथून पुढे चंद्रगडाची वाट काहीशी अवघड होते. लहान कातळ कडे तसेच खेबणीच्या आधाराने माथा गाठता येतो.

गडाचा माथा लहानसा आहे. घराचे चौथरे आणि पाण्याच्या टाक्या पहायला मिळतात. येथे आकाशाखाली उघडय़ावर शंकराची पिंड आहे. त्याला ढवळेश्वर महादेव महादेव म्हणतात. उंचवटय़ावर वाडय़ाचे भग्नावशेष दिसतात. उत्तर अंगाला पाण्याची टाकी आहेत.

चंद्रगडावरुन रायरेश्वर, कोळेश्वर आणि महाबळेश्वरची पठारे समोर दिसतात. याचे उत्तुंग कातळ कडे पहाण्याची मैज काही न्यारीच आहे. चंद्रगडावरुन ढवळ्याघाटाची वाट दिसते. घाटाच्या माथ्यावरची खिंड आणि त्याच्या वर महाबळेश्वरचे ऑर्थर सीट नुसते पाहूनच थरार वाटतो. निसर्गाची लयलूट आणि सह्यद्री रौद्रभिषण दर्शनाने चंद्रगडाची सफर सार्थर झाल्याचे समाधान मिळते.

हे समाधान मनात घेवूनच आपण चंद्रगडाला निरोप देवून खाली उतरु लागतो. परतीच्या प्रवासात ऑर्थर सीटला जाण्याचे ठरविल्यास किमान सहा तासांचा पुरेसा अवधी असणे आवश्यक आहे.

Leave a Comment