सातारा जिल्ह्यातील वाई तालुका हा कृष्णा नदीच्या खोर्यात वसलेला आहे. कृष्णा नदीच्या उत्तरबाजूस रायरेश्वरापासून निघणारी महादेव रांग आहे. सह्याद्रीच्या या उपरांगेतील एका शृंगावर पांडवगड नावाचा किल्ला बांधलेला आहे.
समुद्रसपाटीपासून १२७३ मीटरची उंची असलेल्या पांडवगडाला जाण्यासाठी आपल्याला वाईमध्ये दाखल व्हावे लागते. वाई हे पुणे-बंगळूरु या महामार्गाच्या पश्चिमेला असून पुणे तसेच सातारा येथून गाडीमार्गाने उत्तमपैकी जोडलेले आहे. तसेच एस. टी. बसेसची ही सोय चांगली आहे.
पांडवगडाला जाण्यासाठी दोन मार्ग सध्या प्रचलित आहेत. दक्षिणेकडील म्हणजे मेणवली मार्गे असलेला मार्ग खड्या चढाईचा असून दमछाक करणारा आहे. तर उत्तरेकडील मार्ग तुलनेत सोपा आहे. त्यामुळे एकीकडून चढून दुसरीकडे उतरणे सोयीचे पडते.
वाईमधून मांढरदेवला जाण्यासाठी गाडी रस्ता आहे. या मार्गावर धावडी नावाचे गाव आहे. धावडीतून पांडवगडावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. धावडी गावाजवळ कोरीव अशा लेणी आहेत. या उपेक्षीत लेणीही पहाण्यासाठी तासाभराचा अवधी पुरेसा आहे. लेणी पाहून आपण पुन्हा धावडी गावात येवून पांडवगडाची चढाई सुरु करतो. तासभर चढाई केल्यावर आपण पांडवगडाच्या कातळमाथ्याच्या पश्चिम अंगाला असलेल्या पठारावर पोहोचतो. या पठारावर एक बंगला आहे. तो खाजगी असून वाडीया नावाच्या माणसाचा आहे. त्याने हा किल्ला सरकारकडून विकत घेतला असल्याचे सांगतो. तो किंवा त्याचे नोकर येणार्या किल्लेप्रेमींना दिशाभुल करण्याचा प्रयत्न करतात.
येथून कातळमाथा उजवीकडे ठेवून आपण पांडवगडाच्या उत्तरअंगाला असलेल्या भग्न दरवाजाने गडामध्ये प्रवेश करतो. वाटेमध्ये पाण्याची दोन टाकी आहेत. गडामध्ये हनुमंताचे मंदिर आहे. मंदिर बांधलेले नसल्यामुळे मुर्ती उघड्यावर आहे. गडावर गडाची देवी पांडवजाईचे मंदिर आहे. गावकर्यांचे कुलदैवत असल्यामुळे हा परिसर गावकर्यांनी स्वच्छ ठेवलेला आहे. गडाच्या चारही बाजुना नैसर्गिक कातळकडे असल्यामुळे गडावर फारशी तटबंदी बांधलेली नाही. गडाचे गडपण दाखविणारी घरांची जोती तसेच कोरडी पडलेली पाण्याची टाकी आढळतात.
गडावरुन धोम धरणाचा जलाशय सुरेख दिसतो. जलाशयामागे कमलगडाचा माथा उंचावलेला दिसतो. त्यामागे महाबळेश्वराचे तसेच पाचगणीचे पठार ओळखू येते. पांडवगडाच्या माथ्यावरुन खाली वाई तसेच कृष्णा नदी ही दिसते. केंजळगड, मांढरदेव, चंदन वंदन किल्ले तसेच वैराटगड ही पहाता येतो.
परतीच्या वाटेवर निघाल्यावर आल्यावाटेने न उतरता दक्षिण अंगणाला येवून मेणवलीच्या वाटेने उतरल्यास मेणवलीतील नाना फडणीस यांचा वाडा ही पहाता येतो तसेच मेणवली मधील सुबक बांधणीचा कृष्णा नदीवरील घाटही पाहून येथील पोर्तृगिजांकडून आणलेली घंटाही पहायला मिळते. नाना फडणीस यांच्या वाड्याच्या दारात असलेला एक दुर्मीळ वृक्षही पहायला मिळेल. भलामोठा घेर असलेला हा गोरख चिंचेचा वृक्ष आहे.
मेणवलीपासून जवळ असलेल्या धोम गावातील नृसिंह मंदिर पाहून आपण पुन्हा वाईला येतो. वाईचा घाट आणि ढोल्या गणपतीचे दर्शन घेवून आपल्या भटकंतीची सांगता करता येईल.