पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य रहात होते. सर्व प्राणिमात्रात त्यांना परमेश्वर दिसे. ते प्रत्येकाला साष्टांग नमस्कार करत. त्यामुळे लोक त्यांना चेष्टेने 'दंडवतस्वामी' म्हणत असत.
एकदा ते मार्गाने चालले असतांना काही टवाळ विरोधक मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचे ठरवले. ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले. त्यांनी विचारले, ''काय हो दंडवतस्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे का ?'' ''त्याच्यातही परमेश्वर आहे'', असे म्हणून स्वामींनी त्या मृत गाढवाला नमस्कार केला. त्यामुळे ते मेलेले गाढव ताडकन उठले आणि धावू लागले.
गाढव जिवंत झाले, ही गोष्ट एकनाथ महाराजांच्या कानावर गेली. ते दंडवतस्वामींना म्हणाले, ''स्वामी तुम्ही गाढवाला प्राणदान दिलेत ही गोष्ट चांगली असली, तरी आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील, ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या.'' ''जशी गुरूंची आज्ञा !'' असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणांवर मस्तक ठेवून डोळे मिटले. एकनाथांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या मस्तकावर ठेवला. क्षणातच स्वामींनी देहत्याग केला.
एकनाथ महाराजांकडून ब्रह्महत्येचे भयंकर पाप घडले आहे. त्यासाठी त्यांनी प्रायश्चित घेतले, तरच शुद्ध होईल, असा तोडगा पैठणकरांनी सुचवला. त्यांनी एकनाथ महाराजांना सभेत बोलावले. एकनाथ महाराज प्रसन्न मुखाने सभेसमोर येऊन उभे राहिले. सभेने त्यांना ब्रह्महत्येविषयी प्रायश्चित घ्यावे लागेल, असे सुचवले. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, ''आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन.'' ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितलेली आहे; पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनीही देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास सिद्ध व्हावे, असे सुचवले. एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. '''हे देवा, तू आता हा गवताचा घास घे'', असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले. नंदीने जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत तोंडात घेतले. तो गवत चावून खावू लागला. पैठणचे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, ''देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी.'' तो पाषाणाचा नंदी ताडकन् उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले.
मुलांनो, एकनाथ महाराजांचे सामर्थ्य तुमच्या लक्षात आलेच असेल. ईश्वराची भक्ती केल्याने असे सामर्थ्य प्राप्त होते. प्रत्येकात ईश्वराचे रूप पहायला शिका.