अजंठा-सातमाळा ही सह्याद्रीची एक उपरांग पुर्वपश्चिम अशी पसरली आहे. या पूर्वपश्चिम पसरलेल्या रांगेमधे अनेक दुर्ग ठाण मांडून बसले आहेत. या गिरीदुर्गाच्या मालिकेमधे नामवंत दुर्गांबरोबरच काही अपरिचित दुर्गही सामावलेले आहेत.
अजंठा-सातमाळा रांगेची सुरवात होते. अचला नावाच्या किल्ल्यापासून. रांगेच्या सर्वात पश्चिमेकडे असणार्या अचला किल्ल्याला नाशिक मधून राज्य परिवहनच्या बसेसची सोय आहे. नाशिक ते सापुतारा अशा बसेस धावतात. सापुतारा हे पर्यटन स्थळ म्हणून विकसीत झाले असून, थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. सापुतार्याच्या रस्त्यावर वणी हे प्रसिध्द गाव असून ते सप्तश्रृंगगडाच्या दक्षिण पायथ्याला आहे.
वणीच्या पुढे पिंपरी अचला या गावाचा फाटा लागतो. या फाट्यावर उतरुन आपल्याला पिंपरी अचला हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव गाठावे लागते. गावच्या उत्तरेलाच समुद्र सपाटीपासून १२५० मीटर उंचीचा अचलाचा किल्ला दिसतो. किल्ल्याच्या पश्चिम अंगाला त्रिकोणी आकाराचा तवल्या डोंगर आपले लक्ष वेधून घेतो.
पूर्वपश्चिम पसरलेला अचला किल्ल्याच्या पूर्वेकडे एक लहानशी खिंड दिसते. या खिंडीमधून अचलावर जाण्याचा सोयीचा मार्ग आहे. गडावर पोहोचेपर्यंत वाटेत पाणी नाही. म्हणून गावातूनच पाणी सोबत नेणे सोयीचे आहे. गावातून अर्ध्या पाऊण तासात आपण खिंडीत पोहोचतो. खिंडीतून डावीकडे (पश्चिमेकडे) जाणार्या वाटेने चढाई सुरु केल्यावर आपण अचलाच्या कड्याजवळ पोहोचतो. अचलाचा माथा डावीकडे ठेवून आपण त्याच्या उत्तरअंगाला येतो. अचलाच्या उत्तरअंगाला येवून पश्चिमेकडे चालत गेल्यावर एका घळीतून माथ्यावर जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाशिवाय अन्य बाजूने अचलागडावर जाण्यासाठी मार्ग नाही. अचला गडाच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत साधारण दोन तास तरी लागतात.
अचलागडाचा डोंगर चारही बाजुने ताशीव असल्यामुळे गडाला संरक्षणाच्या दृष्टीने फारश्या तटबंदीची आवश्यकता नाही. गडाचा हा उत्तर भाग बंदिस्त केल्यास गडाचे संरक्षण होवू शकते. गडावर गडपणाच्या तुरळक खाणाखुणा आपल्याला पहायला मिळतात.
अचलागडापासून तवत्या उत्तम दिसतो. सापुतारा व हातगड उत्तरेकडे दिसतात. दूरवर साल्हेर सालोरा तसेच कंडाण्याचे दर्शन होते. पुर्वेला सातमाळा रांगेतील अहिवंत, सप्तश्रृंगी धोपड इत्यादी किल्ले तसेच रामसेज देहेर ही दिसतात.
गडदर्शनासाठी अर्धातास पुरतो. पुन्हा आल्यावाटेनेच खाली उतरुन खिंड गाठावी लागते. या खिंडीतून अहिवंतगडाला जाता येते अथवा पुन्हा पिंपरीअचला गाठून परतीच्या मार्गाला लागता येते.