आदिनाथें उपदेश पार्वतीस केला । मत्स्येंद्रें ऐकिला मच्छगर्भी ॥ १ ॥
शिवह्रदयींचा मंत्र पैं अगाध । जालासे प्रसिद्ध भक्तियोगें ॥ २ ॥
तेणें त्या गोरक्षा केलें कृपादान । तेथोनी प्रकट जाण गहिनीप्रती ॥ ३ ॥
गहिनीनें दया केली निवृत्तिनाथा । बाळक असतां योगरूप ॥ ४ ॥
तेथोनि ज्ञानेश पावले प्रसाद । जाले ते प्रसिद्ध सिद्धासनीं ॥ ५ ॥
‘सच्चिदानंद बाबा’ भक्तीचा आगरू । त्यासी अभयवरू ‘ज्ञाने’ केला ॥ ६ ॥
पुढें विश्वंभर शिवरूप सुंदर । तेणें राघवीं विचार ठेविलासे ॥ ७ ॥
केशव चैतन्य बाबाजी चैतन्य । झालेसे प्रसन्न ‘तुकोबासी’ ॥ ८ ॥
एकनिष्ठ भाव तुकोबा-चरणीं । म्हणोनी ‘बहिणी’ लाधलीसे ॥ ९ ॥