देवगिरी

महाराष्ट्रात जे काही भुईकोट किल्ले आहेत त्यापैकी हा एक. युद्धपद्धती आणि युद्धकलेतील गरजांच्या फेरबदलांना अनुसरुन या किल्ल्याची रचना आणि बांधणीही वेळोवेळी होत गेली असावी. याचसाठी दौलताबादचा किल्ला सैन्यवास्तुकलेतील प्रगतीचे प्रतीक म्हणून गणला जातो.

ह्या किल्ल्याचा नकाशा, भिंती आणि प्रवेशद्वाराची रचना अशी योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेली आहे की, शत्रूच्या हल्ल्यापासून किल्ला सुरक्षित राखता येईल असे वळणा-वळणाचे अरुंद रस्ते शत्रुसैन्याच्या सहज प्रवेशाला थोपवून धरतात. तर उंच,उंच भिंती किल्लेबंदी करणा-या उरतात. संपूर्ण किल्ला चहूकडून जलमय कालव्यांनी वेढलेला आहे. किल्ल्याची उंची गाठण्यासाठी डोंगर पोखरुन तयार करण्यात आलेल्या दूर्गम, अतिसुरक्षित असे अंधारे बोगदे ओलांडावे लागतात. किल्ल्याच्या या रचनेमुळे लक्षात येते की, शत्रुची दिशाभुल करण्यासाठी आणि त्याला फसवण्यासाठी अशी रचना केलेली असावी.

किल्ल्याच्या एका बाजूला दहा कि,मी. भिंत पसरलेली आहे. किल्ल्यात प्रवेश करतांना एक महादरवाजा आहे, या दरवाजावर हत्तींचा हल्ला थोपवण्यासाठी टोकदार खिळे ठोकण्यात आलेली आहेत. यातून प्रवेश केल्यावर प्रत्येक गल्लीत पहारेक-यांच्या कोठड्या बांधण्यात आलेल्या आहेत. या कोठड्यामधे काही जूनी वापरण्याजोगी अवजारे ठेवण्यात आली. किल्ल्यामधे प्रवेश करतांना अनेक मोठे दरवाजे पार करावे लागतात.

या डोंगरावर किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी, आणि शत्रुची दिशाभुल करण्यासाठी जागोजागी इथे वाटा आहेत. भुयारी मार्ग आहेत. इथे पुल ओलांडला की, काही अंधारे रस्ते ओलांडावे लागतात. इथे माणूस हरवल्यासारखा अनुभव येतो प्रत्येकाला हा किल्ला ओलांडून जाण्यासाठी या अंधा-या पाय-या ओलांडाव्याच लागतात. आणि यालाच समांतर असा एक पर्यायी रस्ता इथे आहे, ज्याच्यातुन इथे मार्गदर्शन करणारे, किल्ला अजिक्य कसा राहिला. शत्रुवर उकळते तेल टाकण्याच्या जागा कोणत्या, शत्रुने प्रवेश केल्यावर तो जर चुकीच्या मार्गाने गेला तर सरळ दरीतच कसा जाईल. गुप्त कोठड्या, धुर सोडून शत्रुला अडवण्याची पद्धत, भुयारातुन लहान-सहान चाके सरकवून त्याचा फासासारखा वापर हे सर्व अद्भुत आहे, ते मात्र मार्गदर्शकाकडूनच पाहिले आणि ऐकले पाहिजे. हेच या किल्ल्यात पाहण्यासारखे वाटते. अजूनही इथे धोकादायक रस्ते, या अंधा-या गुहेत आहेत. मार्गदर्शकाशिवाय या रस्त्याने प्रवेश करु नये. किंवा मार्गदर्शकाचा उपयोग घ्यायचा नसेल तर सोप्या मार्गाने जावे, तो पार करतांनाही अंधा-या रस्त्याचा वापर करावा लागतो. भिंतीचा आधार घेत-घेत हा रस्ता विना-मार्गदर्शकाशिवाय अनेक पर्यटक हा रस्ता सहज पार करतात.

इतिहास :
यादवांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात किल्ला नाही. महम्मद तुघलकने या देवगिरीचे दौलताबाद नाव केले. १५२६ पर्यंत इथे बहामनी सत्ता होती. त्यानंतर औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत (१७०७) हा किल्ला मुघलांकडे होता. सुमारे २०० मी. उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याला ७ वेशी असून २ कि.मी. लांबीचा अभेद्य तट आहे. किल्ल्यावर एक उंच स्तंभ आहे, त्याचबरोबर हत्ती हौद, भारतमातेचे मंदिर, चिनी महाल, मीठ अंधेरी मार्ग, खंदक इ अनेक ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यात आहेत. दिल्लीच्या कुतुबमिनारची आठवण करून देणारा निरीक्षणासाठीचा मनोरा हे एक वैशिष्ट्य येथे बघता येते. संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या वर्षात कोणाही स्वारी करणार्या राजाला तो लढून जिंकता आला नाही.

जाण्याची सोय : संभाजीनगर या औरंगाबामधील मध्यवर्ती ठिकाणाहून बसेसची सोय आहे येथून दौलताबादचे अंतर साधारण २५ किलोमीटर आहे बस किल्याच्या पायथ्यापर्यंत जाते

Leave a Comment