॥ श्रीगणेशाय नमः ॥
सिद्ध म्हणे नामधारका । अपूर्व वर्तले आणिक ऐका ।
वृक्ष होता काष्ठ शुष्का । विचित्र कथा ऐक पा ॥१॥
गाणगापुरी असता श्रीगुरु । आला एक कुष्ठी द्विजवरु ।
आपस्तंब भार्गवगोत्रु । नाम तयाचे नरहरि ॥२॥
येवोनिया श्रीगुरुमूर्तीसी । नमन करी भक्तीसी ।
करी स्तोत्र बहुवसी । करसंपुट जोडोनिया ॥३॥
जय जयाजी गुरुमुर्ति । ऐकोनि आलो तुझी कीर्ति ।
भक्तवत्सला परंज्योती । परमपुरुषा जगद्गुरु ॥४॥
आपण जन्मोनि संसारी । वृथा झालो दगडापरी ।
निंदा करिताती द्विजवरी । कुष्ठी म्हणोनि स्वामिया ॥५॥
वाचिला वेद यजुःशाखा । निंदा करिताती माझी लोका ।
ब्राह्मणार्थी न सांगती देखा । अंगहीन म्हणोनिया ॥६॥
प्रातःकाळी उठोनि लोक । आफती माझे मुख ।
तेणे होते मनात दुःख । जन्म पुरे आता मज ॥७॥
पाप केले आपण बहुत । जन्मांतरी असंख्यात ।
तेणे हा भोग भोगित । आता न साहे स्वामिया ॥८॥
नाना तीर्थ नाना व्रत । हिंडोनि आलो आचरत ।
म्या पूजिले देव समस्त । माझी व्याधि न वचेची ॥९॥
आता धरोनि निर्धारु । आलो स्वामीजवळी जगद्गुरु ।
तुझा न होता कृपावरु । प्राण आपुला त्यजीन ॥१०॥
म्हणोनिया निर्वाणेसी । विनवीतसे श्रीगुरूसी ।
एकभावे भक्तीसी । करुणा भाकी द्विजवर ॥११॥
म्हणोनि मागुती नमस्कारी । नानापरी स्तुति करी ।
लोहपरिसा भेटीपरी । तुझ्या दर्शनमात्रेसी ॥१२॥
करुणावचनी ऐकोनि । भक्तवत्सल श्रीगुरु मुनि ।
निरोप देती कृपा करोनि । ऐक शिष्या नामधारका ॥१३॥
श्रीगुरु म्हणती द्विजासी । पूर्वजन्मी महादोषासी ।
तुवा केले बहुवसी । म्हणोनि कुष्ठी झालास ॥१४॥
आता सांगेन ते करी । तुझी पापे जाती दुरी ।
होशील दिव्यशरीरी । एकभावे आचरावे ॥१५॥
इतुकिया अवसरी । काष्ठ एक औदुंबरी ।
शुष्क होते वर्षे चारी । घेवोनि आले सर्पणासी ॥१६॥
ते देखिले श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
एकभावे करोनि चित्ती । घेई काष्ठ झडकरी ॥१७॥
काष्ठ घेवोनि संगमासी । त्वरित जाय भावेसी ।
संगमनाथपूर्वभागेसी । भीमातीरी रोवी पा ॥१८॥
तुवा जावोनिया संगमात । स्नान करोनिया त्वरित ।
पूजा करोनि अश्वत्थ । पुनरपि जाय स्नानासी ॥१९॥
हाती धरोनिया कलश दोनी । आणी उदक तत्क्षणी ।
शुष्क काष्ठा वेळ तिन्ही । स्नपन करी मनोभावे ॥२०॥
ज्या दिवसी काष्ठासी । पर्णै येतील संजिवेसी ।
दोष गेले तुझे परियेसी । अंग तुझे होय बरवे ॥२१॥
येणेपरी श्रीगुरुमूर्ति । तया विप्रासी निरोप देती ।
विश्वास झाला त्याचे चित्ती । धावत गेला काष्ठाजवळी ॥२२॥
काष्ठ उचलोनि डोईवरी । घेवोनि आला भीमातीरी ।
संगमेश्वरासमोरी । रोविता झाला द्विजवर ॥२३॥
जेणे रीती श्रीगुरुमूर्ति । तया विप्रा निरोप देती ।
आचरतसे एकचित्ती । भावभक्ति करोनिया ॥२४॥
येणेपरी सात दिवस । द्विजे केले उपवास ।
तया काष्ठा दोनी कलश । भरोनि घाली वेळोवेळी ॥२५॥
देखोनि म्हणती सकळजन । तया विप्रा बोलावोन ।
सांगताती विवंचून । गुरुनिरोपलक्षण ॥२६॥
म्हणती तूते काय झाले । शुष काष्ठ का रोविले ।
याचे तुवा संजीवन योजिले । मग तूते काय होय ॥२७॥
याते तू सजीव करिसी । मागुती काय येतीपल्लव यासी ।
ऐसे पाहिले नाही भूमिसी । श्रीगुरूची इच्छा कळेना ॥२८॥
श्रीगुरुमूर्ति क्रुपासिंधु । भक्तजना असे वरदु ।
त्याची कृपा असे अगाधु । समस्ताते कृपा करी ॥२९॥
नसेल निष्कृति तुझिया पापा । म्हणोनि दिधले काष्ठ बापा ।
वाया कष्ट करिसी का पा । तूते श्रीगुरूंनी निरोपिले ॥३०॥
ऐकोनि तयांचे वचन । विप्रवर करी नमन ।
गुरुवाक्य मज कामधेनु । अन्यथा केवी होईल ॥३१॥
सत्यसंकल्प श्रीगुरुनाथ । त्याचे वाक्य न होय मिथ्य ।
माझे मनी निर्धार सत्य । होईल काष्ठ वृक्ष जाणा ॥३२॥
माझ्या मनी निर्धारु । असत्य न होय वाक्यगुरु ।
प्राण वेचीन साचारु । गुरुवाक्य कारण आपणा ॥३३॥
येणेपरी समस्तांसी । विप्र सांगे परियेसी ।
सेवा करितो भक्तीसी । तया शुष्क काष्ठासी ॥३४॥
एके दिवशी गुरुमूर्तीसी । शिष्य सांगती परियेसी ।
स्वामींनी निरोपिले द्विजासी । शुष्क काष्ठा भजे म्हणोनि ॥३५॥
सात दिवस उपवासी । सेवा करितो काष्ठासी ।
एकभावे भक्तीसी । निर्धार केला गुरुवचनी ॥३६॥
किती रीती आम्ही त्यासी । सांगितले सर्व हितासी ।
वाया का गा कष्ट करिसी । मूर्खपणे म्हणोनि ॥३७॥
विप्र आम्हाते ऐसे म्हणे । चाड नाही काष्ठाविणे ।
गुरुवाक्य मजकारणे । करील आपुले बोल साच ॥३८॥
निर्धार धरोनि मानसी । सेवा करितो काष्ठासी ।
सात दिवस उपवासी । उदक मुखी घेत नाही ॥३९॥
ऐकोनि शिष्यांचे वचन । निरोप देती श्रीगुरु आपण ।
जैसा असे भाव अंतःकरण । तैसी सिद्धि पावेल ॥४०॥
गुरुवाक्य शिष्यासी कारण । सर्वथा न होय निर्वाण ।
जैसे भक्ताचे अंतःकरण । तैशी सिद्धि पावेल ॥४१॥
याकारणे तुम्हांसी । सांगेन कथा इतिहासी ।
सांगे सूत ऋषीश्वरांसी । स्कंदपुराणी परियेसा ॥४२॥
गुरुभक्तीचा प्रकार । पुसती सूतासी ऋषीश्वर ।
सांगे सूत सविस्तर । तेचि कथा सांगतसे ॥४३॥
सूत म्हणे ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति असे विशेषी ।
तारावया संसारासी । आणिक नाही उपाय ॥४४॥
अयोग्य अथवा ज्ञानवंत । म्हणोनि न पाहिजे अंत ।
गुरुमूर्ति मनी ध्यात । सेवा करणे भक्तिभावे ॥४५॥
दृढ भक्ति असे जयापासी । सर्व धर्म साधती त्यासी ।
संदेह न धरावा मानसी । एकचित्ते भजावे ॥४६॥
श्रीगुरु नर ऐसा न म्हणावा । त्रैमूर्ति तोचि जाणावा ।
गुणदोष न विचारावा । म्हणावा तोचि ईश्वर ॥४७॥
येणेपरी धरोनि मनी । जे जे भजती श्रीगुरुचरणी ।
प्रसन्न होय शूलपाणि । तात्काळिक परियेसा ॥४८॥
श्लोक ॥ मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवेज्ञे भेषजे गुरौ ।
यादृशी भावनां कुर्यात् सिद्धिर्भवति तादृशी ॥४९॥
टीका ॥ मंत्रतीर्थद्विजस्थानी । देवभक्ती औषधगुणी ।
गुरूसी पाहे शिवसमानी । भाविल्यासारखे फल होय ॥५०॥
म्हणे सूत ऋषीश्वरांसी । गुरुभक्ति म्हणिजे आहे कैसी ।
सांगेन साक्ष तुम्हांसी । अपूर्व एक वर्तलेसे ॥५१॥
पूर्वी पांचाल नगरात । होता राजा सिंहकेत ।
तयासी होता एक सुत । नाम तयाचे धनंजय ॥५२॥
एके दिवसी राजसुत । गेला पारधीसी अरण्यात ।
तेथे नसती मनुष्यमात्र । उदकवर्जित स्थळांसी ॥५३॥
राजकुमार तृषाक्रांत । हिंडतसे अरण्यात ।
संगे होत शबरसुत । श्रमले बहुत अवधारा ॥५४॥
तेथे एक शबरसुत । हिंडत होता वनात ।
देखता झाला अवचित । जीर्ण एक शिवालय ॥५५॥
भिन्नलिंग तया स्थानी । पडिले होते मेदिनी ।
शबरे घेतले उचलोनि । म्हणे लिंग बरवे असे ॥५६॥
हाती घेवोनि लिंगासी । पहात होता शबर हर्षी ।
राजसुत तया संधीसी । आला तया जवळिक ॥५७॥
राजकुमार म्हणे तयासी । भिन्न लिंग काय करिसी ।
पडिली असती भुमीसी । लिंगाकार अनेक ॥५८॥
शबर म्हणे राजसुताते । माझ्या मनी ऐसे येते ।
लिंगपूजा करावयाते । म्हणोन घेतले परियेसा ॥५९॥
ऐकोनि तयाचे वचन । राजपुत्र सुहास्यवदन ।
म्हणे पूजी एकमने । लिंग बरवे असे सत्य ॥६०॥
ऐसे म्हणता राजकुमार । तयासी करी नमस्कार ।
कोण विधि पूजाप्रकार । निरोपावे म्हणतसे ॥६१॥
तुवा व्हावे माते गुरु । मी तव असे शबरु ।
नेणे पूजेचा प्रकारु । विस्तारावे म्हणतसे ॥६२॥
राजपुत्रे म्हणे तयासी । न्यावा पाषाण घरासी ।
पूजा करावी भक्तीसी । पत्रपुष्पे अर्चोनिया ॥६३॥
दंपत्ये दोघेजण । पूजा करणे मने पूर्ण ।
हेचि लिंग गिरिजारमण । म्हणोनि मनी निर्धारी पा ॥६४॥
नानापरी पुष्पजाती । आणाव्या तुवा शिवाप्रती ।
धूप दीप नैवेद्य आरती । नैवेद्यासी भस्म जाण ॥६५॥
भस्म असेल जे स्मशानी । आणावे तुवा प्रतिदिनी ।
द्यावा नैवेद्य सुमनी । प्रसाद आपण भक्षावा ॥६६॥
आणिक जे जे जेवी आपण । तोही द्यावा नैवेद्य जाण ।
ऐसे आहे पूजाविधान । म्हणोनि सांगे राजकुमारु ॥६७॥
येणेपरी राजकुमारु । तया शबरा झाला गुरु ।
विश्वासे केला निर्धारु । शबरे आपुले मनात ॥६८॥
संतोषोनि शबर देखा । नेले लिंग गृहांतिका ।
स्त्रियेसी सांगे कौतुका । म्हणे लिंग प्रसन्न झाले ॥६९॥
गुरुनिरोप जेणे रीती । पूजा करीन एकचित्ती ।
चिताभस्म अतिप्रीती । आणोनि नैवेद्या देतसे ॥७०॥
क्वचित्काळ येणेपरी । पूजा करी शबरशबरी ।
एके दिवशी तया नगरी । चिताभस्म न मिळेचि ॥७१॥
हिंडोनि पाहे गावोगावी । चिताभस्म न मिळे काही ।
येणेपरी सात गावी । हिंडोनि आला घरासी ॥७२॥
चिंता लागली शबरासी । पुसता झाला स्त्रियेसी ।
काय करू म्हणे तिसी । प्राण आपुला त्यजीन म्हणे ॥७३॥
पूजा राहिली लिंगासी । भस्म न मिळे नैवेद्यासी ।
हिंडोनि आलो दाही दिशी । चिताभस्म न मिळेचि ॥७४॥
जैसे गुरूंनी आज्ञापिले । त्या विधीने पाहिजे अर्चिले ।
नाही तरी वृथा गेले । शिवपूजन परियेसा ॥७५॥
गुरूचे वाक्य जो न करी । तो पडेल रौरवघोरी ।
तयाते पाप नाही दूरी । सदा दरिद्री होय नर ॥७६॥
त्यासी होय अधोगति । अखंड नरकी तया वस्ती ।
जो करी गुरूची भक्ति । तोचि तरेल भवार्णवी ॥७७॥
सकळ शास्त्रे येणेपरी । बोलताती वेद चारी ।
याचि कारणे ऐक हो शबरी । प्राण आपुला त्यजीन ॥७८॥
ऐकोनि पतीचे वचन । बोले शबरी हासोन ।
चिंता करिता किंकारण । चिताभस्म देईन मी ॥७९॥
मज घालोनि गृहांत । अग्नि लावा तुम्ही त्वरित ।
काष्ठे असती बहुत । दहन करा आपणासी ॥८०॥
तेचि भस्म ईश्वरासी । उपहारावे तुम्ही हर्षी ।
व्रतभंग न करावा भरवसी । संतोषरूपे बोलतसे ॥८१॥
कधी तरी शरीरासी । नाश असे परियेसी ।
ऐसे कार्यकारणासी । देह आपुला समर्पीन ॥८२॥
ऐकोनि स्त्रियेचे वचन । शबर झाला मनी खिन्न ।
प्राणेश्वरी तुझा प्राण । केवी घ्यावा म्हणतसे ॥८३॥
रूपे दिससी रतीसरसी । अद्यापि तू पुर्ववयासी ।
पुत्रअपत्य न देखिलेसी । या संसारासी येउनी ॥८४॥
मन नाही तुझे धाले । संसारसुख नाही देखिले ।
तुझे मातापित्याने मज निरविले । प्राणप्रिया रक्ष म्हणोनि ॥८५॥
चंद्रसूर्यसाक्षीसी । तुज वरिले म्या संतोषी ।
प्राण रक्षीन म्हणोनी हर्षी । घेवोनि आलो मंदिरात ॥८६॥
आता दहन करिता तूते । घडती पापे असंख्याते ।
स्त्रीहत्या महादोषाते। केवी करू म्हणतसे ॥८७॥
तू माझी प्राणेश्वरी । तूते मारू कवणेपरी ।
कैसा तुष्टेल त्रिपुरारि । पुण्य जावोनि पाप घडे ॥८८॥
दुःखे तुझी मातापिता । माते म्हणती स्त्रीघाता ।
अजूनि तुझी लावण्यता । दिसतसे प्राणप्रिये ॥८९॥
नाना व्रते नाना भक्ति । या शरीरालागी करिती ।
दहन करू कवणे रीती । पापे माते घडतील ॥९०॥
ऐकोनि पतीचे वचन । विनवीतसे सती आपण ।
कैसे असे तुम्हा अज्ञान । मिथ्या बोल बोलतसा ॥९१॥
शरीर म्हणे स्वप्नापरी । जैसा फेण गंगेवरी ।
स्थिर न राहे क्षणभरी । मरणे सत्य परियेसा ॥९२॥
आमुचे मायबापे जाण । तुम्हा दिधले माते दान ।
तुमची अर्धांगी मी पूर्ण । भिन्नभावना कोठे दिसे ॥९३॥
मी म्हणजे तुमचा देहे । विचार करोनि मनी पाहे ।
आपुले अर्ध शरीर आहे । काय दोष दहन करिता ॥९४॥
जे जे उपजे भूमीवरी । ते ते नाश पावे निर्धारी ।
माझे देहसाफल्य करी । ईश्वराप्रती पावेल ॥९५॥
संदेह सोडोनि आपणासी । दहन करी वो वेगेसी ।
आपण होवोनि संतोषी । निरोप देते परियेसा ॥९६॥
नानापरी पतीसी । बोधी शबरी परियेसी ।
घरात जावोनि पतीसी । म्हणे अग्नि लावी आता ॥९७॥
संतोषोनि तो शबर । बांधिता झाला गृहाचे द्वार ।
अग्नि लाविता थोर । ज्वाळा व्यापिती गगनासी ॥९८॥
दहन झाले शबरीसी । भस्म घेतले परियेसी ।
पूजा करोनि शिवासी । नैवेद्य दिधला अवधारा ॥९९॥
पूजा करिता ईश्वरासी । आनंद झाला बहुवसी ।
स्त्री दिधली हुताशी । स्मरण ऐसे त्यास नाही ॥१००॥
ऐसी भक्तिभावेसी । पूजा केली महेश्वरासी ।
प्रसाद घेवोनि हस्तेसी । पाचारिले स्त्रियेते ॥१॥
जैसी पूजा नित्य करोन । प्रसाद हाती घेऊन ।
आपुले स्त्रियेते बोलावून । देत असे तो शबर ॥२॥
तया दिवसी त्याचपरी । आपल्या स्त्रियेते पाचारी ।
कृपासागरी त्रिपुरारि । प्रसन्न झाला परियेसा ॥३॥
तेचि शबरी येवोनि । उभी ठेली सुहास्यवदनी ।
घेतला प्रसाद मागोनि । घेवोनि गेली घरात ॥४॥
जैसे तैसेचि घर दिसे । शबर विस्मय करीतसे ।
म्हणे दग्ध केले स्त्रियेसरिसे । घर कैसे दिसताहे ॥५॥
बोलावोनि स्त्रियेसी । शबर पुसतसे तियेसी ।
दहन केले मी तुजसी । पुनरपि कैसी आलीस ॥६॥
शबरी सांगे पतीसी । आपणास आठवण आहे ऐसी ।
अग्नि लाविता घरासी । निद्रिस्थ झाल्ये परियेसा ॥७॥
महाशीते पीडित । आपण होत्ये निद्रिस्थ ।
तुमचे बोल ऐकोन सत्य । उठोनि आल्ये परिय्सा ॥८॥
हे होईल देवकरणी । प्रसन्न झाला शूलपाणि ।
ऐसे म्हणता तत्क्षणी । निजस्वरूपी उभा ठाकला ॥९॥
नमन करिती लोटांगणी । धावोनि लागती दोघे चरणी ।
प्रसन्न झाला शूलपाणि । मागा वर म्हणतसे ॥११०॥
होईल सुख संसारी । राज्य दिधले धुरंधरी ।
गति होईल त्यानंतरी । कल्पकोटि स्वर्गवास ॥११॥
येणेपरी ऋषीश्वरांसी । सूत सांगे विस्तारेसी ।
गुरुचरणी विश्वास असे ज्यासी । तैसे फळ होय जाणा ॥१२॥
म्हणोनि श्रीगुरु शिष्यासी । सांगते झाले परियेसी ।
विश्वासे करोनि द्विज हर्षी । शुष्क काष्ठ सेवितसे ॥१३॥
जैसा भाव तैसी सिद्धि । होईल सत्य हे त्रिशुद्धि ।
श्रीगुरुनाथ कृपानिधि । सहज निघाले संगमासी ॥१४॥
जावोनि करिती अनुष्ठान । पहावया येती ते ब्राह्मण ।
देखोनि त्याचे अंतःकरण । प्रसन्न झाले तत्क्षणी ॥१५॥
होता कमंडलु करकमळी । भरला सदा गंगाजळी ।
उचलोनिया हस्तकमळी । घालिती उदक काष्ठासी ॥१६॥
तेचि क्षणी काष्ठासी । पल्लव आले परियेसी ।
औंदुबर वृक्ष जनासी । दिसतसे समस्ता ॥१७॥
जैसा चिंतामणिस्पर्श । सुवर्ण करी लोहास ।
तैसा श्रीगुरु सुधारस । काष्ठ झाला औदुंबर ॥१८॥
काष्ठ दिसे औदुंबर । सुदेही झाला तो विप्र ।
दिसे सुवर्णकांति नर । गेले कुष्ठ तात्काळी ॥१९॥
संतोषोनि द्विजवर । करी साष्टांग नमस्कार ।
करिता झाला महास्तोत्र । श्रीगुरूचे तये वेळी ॥१२०॥
श्लोक ॥ इंदुकोटितेज-करुणासिंधु-भक्तवत्सलम् ।
नंदनात्रिसूनुदत्त, इंदिराक्ष-श्रीगुरुम् ।
गंधमाल्यअक्षतादिवृंददेववंदितम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२१॥
मोहपाशअंधकारछायदूरभास्करम् ।
आयताक्ष, पाहि श्रियावल्लभेशनायकम् ।
सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२२॥
चित्तजादिवर्गषट्कमत्तवारणांकुशम् ।
तत्त्वसारशोभितात्मदत्त-श्रियावल्लभम् ।
उत्तमावतार-भूतकर्तृ-भक्तवत्सलम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२३॥
व्योमवायुतेज-आपभूमिकर्तृमीश्वरम् ।
कामक्रोधमोहरहितसोमसूर्यलोचनम् ।
कामितार्थदातृभक्तकामधेनु-श्रीगुरुम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२४॥
पुंडरीक-आयताक्ष, कुंडलेंदुतेजसम् ।
चंडुदुरितखंडनार्थ – दंडधारि-श्रीगुरुम् ।
मंडलीकमौलि-मार्तंडभासिताननं ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२५॥
वेदशास्त्रस्तुत्यपाद, आदिमूर्तिश्रीगुरुम् ।
नादबिंदुकलातीत-कल्पपादसेव्ययम् ।
सेव्यभक्तवृंदवरद, भूयो भूयो नमाम्यहम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२६॥
अष्टयोगतत्त्वनिष्ठ, तुष्टज्ञानवारिधिम ।
कृष्णावेणितीरवासपंचनदीसंगमम् ।
कष्टदैन्यदूरिभक्ततुष्टकाम्यदायकम् ।
वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि माम् ॥२७॥
नारसिंहसरस्वती-नामअष्टमौक्तिकम् ।
हारकृत्यशारदेन गंगाधर आत्मजम् ।
धारणीकदेवदीक्षगुरुमूर्तितोषितम् ।
परमात्मानंदश्रियापुत्रपौत्रदायकम् ॥२८॥
नारसिंहसरस्वतीय-अष्टकं च यः पठेत् ।
घोरसंसारसिंधुतारणाख्यसाधनम् ।
सारज्ञानदीर्घआयुरारोग्यादिसंपदम् ।
चारुवर्गकाम्यलाभ, वारंवारं यज्जपेत ॥२९॥
स्तोत्र केले येणेपरी । आणिक विनवी परोपरी ।
म्हणे देवा श्रीहरी । कृपा केली स्वामिया ॥१३०॥
म्हणोनि मागुती नमस्कारी । श्रीगुरुनाथ अभयकरी ।
उठविता झाला अवधारी । ज्ञानराशि म्हणोनिया ॥३१॥
समस्त लोक विस्मय करिती । श्रीगुरूते नमस्कारिती ।
नानापरी स्तोत्रे करिती । भक्तिभावेकरोनिया ॥३२॥
मग निघाले मठासी । समस्त शिष्यादि द्विजांसरसी ।
ग्रामलोक आनंदेसी । घेऊनि येती आरत्या ॥३३॥
जावोनि बैसती मठात । शिष्यांसहित श्रीगुरुनाथ ।
समाराधना असंख्यात । झाली ऐका ते दिनी ॥३४॥
तया विप्रा बोलावोनि । सद्गुरु म्हणती संतोषोनि ।
कन्यापुत्रगोधनी । तुझी संतति वाढेल ॥३५॥
तुझे नाम योगेश्वर । आम्ही ठेविले निर्धार ।
समस्त शिष्यांमाजी थोर । तूचि आमुचा भक्त जाण ॥३६॥
वेदशास्त्री संपन्न । तुझ्या वंशोवंशी जाण ।
होतील पुरुष निर्माण । म्हणोनि देती निरोप ॥३७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । जावोनि आणि कलत्रासी ।
तुम्ही रहावे आम्हापासी । येचि ग्रामी नांदत ॥३८॥
म्हणोनि तया द्विजासी । श्रीगुरु मंत्र उपदेशी ।
विद्यासरस्वती या मंत्रासी । उपदेशिले परियेसा ॥३९॥
तूते होतील तिघे सुत । एकाचे नाव योगी विख्यात ।
आमुची सेवा करील बहुत । वंशोवंशी माझे दास ॥१४०॥
जैसे श्रीगुरूंनी निरोपिले । तयापरी त्यासी झाले ।
म्हणोनि सिद्धे सांगितले । नामधारकशिष्यासी ॥४१॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे श्रीगुरुचरित्रविस्तार ।
उतरावया पैल पार । कथा ऐका एकचित्ते ॥४२॥
इति श्रीगुरुचरित्रामृत । कुष्ठी उद्धरिला भक्त ।
गुरुमहिमा अत्यद्भुत । प्रकट झाला येणेपरी ॥१४३॥
इति श्रीगुरुचरित्रपरमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारकसंवादे शुष्ककाष्ठसंजीवन नाम चत्वारिंशत्तमोऽध्यायः ॥४०॥
॥ओवीसंख्या ॥१४३॥
॥श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु॥