॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक विनवी सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी ।
विस्तारावें कृपेंसीं । म्हणोनि चरणीं लागला ॥१॥
आर्त झालों मी तृषेचा । घोट भरवीं गा अमृताचा ।
चरित्र सांगें श्रीगुरुचें । माझें मन निववीं वेगीं ॥२॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । तूं जें जें मज पुससी ।
संतोष होतो आम्हांसी । गुरुचरित्र आठवितां ॥३॥
तुजकरितां आम्हांसी । लाभ जोडे परियेसीं ।
आठवली कथा सुरसी । विचित्र एक झालें असे ॥४॥
मागें कथन सांगितलें । जें भक्तीं द्रव्य आणिलें ।
स्वामीं अंगीकार नाहीं केलें । समाराधना करावी म्हणोनि ॥५॥
नित्य समाराधना देख । करीत होते भक्त अनेक ।
कधीं नाहीं आराणूक । नाहीं ऐसा दिवस नाहीं ॥६॥
ऐसें होतां एके दिवशीं । दुर्बळ द्विज आला परियेसीं ।
असे काश्यप-गोत्रेंसीं । नाम तया 'भास्कर ' ॥७॥
अति सुक्षीण ब्राह्मण । आला आपण दर्शना म्हणोन ।
साष्टांगीं नमस्कारुन । भक्तिपूर्वक विनविलें ॥८॥
ते दिवसीं भक्तजन । करीत होते आराधन ।
उठवितात तया ब्राह्मणा । भोजन करीं म्हणोनियां ॥९॥
संकल्प करोनि तो ब्राह्मण । श्रीगुरुसी भिक्षा करवीन आपण ।
सवें सोपस्कार घेऊन । आला होता परियेसा ॥१०॥
त्रिवर्गाच्या पुरते देखा । सवें असे तंडुल-कणिक ।
वरकड पदार्थ त्या पूर्तिका । सोपस्कार असे त्यापाशीं ॥११॥
सर्व असे वस्त्रीं बांधिलें । नेऊनि मठांत ठेविलें ।
भक्तें आणिक त्यासी बोलाविलें । गेला तो ब्राह्मण भोजनासी ॥१२॥
भोजन करितां झाली निशी । आपण आला मठासी ।
गांठोडी ठेवी आपुले उशीं । मग निद्रा करी देखा ॥१३॥
नित्य घडे ऐसेंचि त्यासी । भक्त लोक येती आराधनेसी ।
आराणूक नव्हे त्यासी । नित्य जेवी समाराधनीं ॥१४॥
समस्त त्यास हांसती । पहा हो समाराधनेची आयती ।
घेऊनि आला असे भक्तीं । आपण जेवी नित्य समाराधनीं ॥१५॥
एकासी नव्हे पुरें अन्न । श्रीगुरुशिष्य बहु जन ।
केवीं करील हा ब्राह्मण । समाराधना करीन म्हणतो ॥१६॥
लाज नये त्यासी कैसी । समाराधना म्हणायासी ।
दे कां स्वयंपाक आम्हांसी । तूं करीं आजि माधुकरी ॥१७॥
ऐसें नाना प्रकारें त्यासी । विनोद करिती ब्राह्मण परियेसीं ।
ऐशा प्रकारें तीन मासी । क्रमिले त्या ब्राह्मणें तेथेंचि ॥१८॥
नित्य होतसे आराधन । त्यांचे घरीं जेवी आपण ।
गांठोडी उशाखालीं ठेवून । निद्रा करी प्रतिदिवसीं ॥१९॥
मास तीन क्रमिल्यावरी । समस्त मिळोनि द्विजवरीं ।
परिहास करिती अपारी । श्रीगुरुमूर्तिं ऐकिलें ॥२०॥
बोलाविती त्या ब्राह्मणासी । आजि भिक्षा करावी आम्हांसी ।
स्वयंपाक करीं वेगेंसी । म्हणती श्रीगुरु कृपासिंधु ॥२१॥
ऐकोनि श्रीगुरुच्या बोला । संतोष अपार द्विजा झाला ।
चरणावरी माथा ठेविला । हर्षे गेला आइतीसी ॥२२॥
आणिलें द्वय शेर घृत । शाका दोनी त्यापुरत ।
स्नान करुनि शुचिर्भूत । स्वयंपाक केला तये वेळीं ॥२३॥
समस्त ब्राह्मण तये वेळीं । मिळोन आले श्रीगुरुजवळी ।
म्हणती आजि आमुची पाळी । यावनाळ-अन्न घरीं ॥२४॥
नित्य होतें समाराधन । आम्ही जेवितों मिष्टान्न ।
कैंचा हा आला ब्राह्मण । आजि राहिली समाराधना ॥२५॥
श्रीगुरु म्हणती द्विजांसी । नका जाऊं घरांसी ।
शीघ्र जावें आंघोळीसी । येथेंचि जेवा तुम्ही आजि ॥२६॥
ब्राह्मण मनीं विचारिती । मठीं असे सामग्री आयती ।
स्वयंपाक आतां करविती । आम्हांसी निरोपिती याचिगुणें ॥२७॥
समस्त गेले स्नानासी । श्रीगुरु बोलाविती त्या ब्राह्मणासी ।
शीघ्र करीं गा होईल निशी । ब्राह्मण अपार सांगितले ॥२८॥
स्वयंपाक झाला तत्क्षण । सांगतसे श्रीगुरुसी ब्राह्मण ।
निरोप देती जा धांवोन । ब्राह्मण समस्त पाचारीं ॥२९॥
ब्राह्मण गेला गंगेसी । बोलावीतसे ब्राह्मणांसी ।
स्वामीनें बोलाविलें तुम्हांसी । शीघ्र यावें म्हणोनियां ॥३०॥
ब्राह्मण म्हणती तयासी । स्वयंपाक व्हावया होईल निशी ।
तुवां शीघ्र श्रीगुरुसी । भिक्षा करावी जाय वेगीं ॥३१॥
ऐसें ऐकोनि तो ब्राह्मण । गेला श्रीगुरुजवळी आपण ।
ब्राह्मण न येती ऐसें म्हणे । आपण जेवूं अपरात्रीं ॥३२॥
श्रीगुरु म्हणती तयासी । नेम असे आजि आम्हांसी ।
सहपंक्तीनें ब्राह्मणांसी । जेवूं आम्ही निर्धारीं ॥३३॥
ब्राह्मणांसहित आम्हांसी । जेवूं वाढीं गा तूं परियेसीं ।
जरी अंगीकार न करिसी । न जेवूं तुझे घरीं आम्ही ॥३४॥
ब्राह्मण म्हणे श्रीगुरुसी । जो निरोप द्याल आपणासी ।
तोचि निरोप माझे शिरसीं । ब्राह्मणांसहित जेवूं वाढीन ॥३५॥
ब्राह्मण मनीं विचारी । श्रीगुरु असती पुरुषावतारी ।
न कळे बोले कवणेंपरी । आपुलें वाक्य सत्य करील ॥३६॥
मग काय करी तो ब्राह्मण । विनवीतसे कर जोडून ।
मज न येती ब्राह्मण । विनोद करिती माझ्या बोला ॥३७॥
श्रीगुरु आणिक शिष्यासी । निरोपिती जा वेगेंसीं ।
बोलावूनि आणीं ब्राह्मणांसी । भोजन करा म्हणोनि ॥३८॥
शिष्य गेला धांवत । समस्त ब्राह्मणांतें बोलावीत ।
स्नानें करोनि आले त्वरित । श्रीगुरु-मठाजवळिक ॥३९॥
श्रीगुरु निरोपिती तयांसी । पत्रावळी करा वेगेंसीं ।
जेवा आजि सहकुटुंबेसीं । ब्राह्मण करितो आराधना ॥४०॥
चारी सहस्त्र पत्रावळी । कराव्या तुम्हीं तात्काळीं ।
उभा होता ब्राह्मण जवळी । त्यासी स्वामी निरोपिती ॥४१॥
या समस्त ब्राह्मणांसी । विनंति करावी तुवां ऐसी ।
तुम्हीं यावें सहकुटुंबेसीं । आपण करितों आराधना ॥४२॥
श्रीगुरुचा निरोप घेऊन । विनवीतसे तो ब्राह्मण ।
द्विज म्हणती त्यासी हांसोन । काय जेवा म्हणतोस आम्हां ॥४३॥
आम्हां इतुके ब्राह्मणांसी । एकेक शित न ये वांटयासी ।
आमंत्रण सांगावया न लाजसी । नमस्कारितोसि घडीघडी ॥४४॥
वृद्ध ब्राह्मण ऐसें म्हणती । निंदा न करा श्रीगुरु ऐकती ।
जैसें श्रीगुरु निरोपिती । तैसें बोलतो ब्राह्मण ॥४५॥
हो कां बरवें बरवें म्हणती । सकळ पत्रावळी करिती ।
ब्राह्मण श्रीगुरुपूजा त्वरिती । करिता झाला उपचारें ॥४६॥
त्रिकरणपूर्वक करी भक्ति । बरवी केली मंगळारती ।
तेणें श्रीगुरु संतोषती । ठाय घाला म्हणती वेगें ॥४७॥
स्वयंपाक आणूनि आपणाजवळी । ठेवीं म्हणती तये वेळीं ।
आणोनियां तात्काळीं । श्रीगुरुजवळी ठेविला ॥४८॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । आमुचें वस्त्र घेऊनि अन्नासी ।
झांकोनी ठेवीं आम्हांपाशीं । म्हणोनि वस्त्र देती तये वेळीं ॥४९॥
झांकिलें वस्त्र अन्नावरी । कमंडलुउदक घेऊनि करीं ।
श्रीगुरु प्रोक्षिती अन्नावरी । अभिमंत्रोनि तये वेळीं ॥५०॥
बोलावूनि म्हणती ब्राह्मणासी । उघडों नको अन्नासी ।
काढूनि नेऊनि समस्तांसी । वाढीं वेगीं म्हणोनियां ॥५१॥
तूप घालूनि घटांत । ओतूनि घे आणिकांत ।
वाढीं वेगीं ऐसें म्हणत । निरोप देती श्रीगुरु ॥५२॥
ठाय घातले समस्तांसी । वाढीतसे ब्राह्मण परियेसीं ।
लोक पहाती तटस्थेसीं । महदाश्चर्य म्हणताति ॥५३॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणांसी । वाढों लागा या द्विजासी ।
आणिक उठिले बहुतेसी । वाढूं लागले तये वेळीं ॥५४॥
भरोनि नेती जितुकें अन्न । पुनः मागुती परिपूर्ण ।
घृत भरलें असे पूर्ण । घट ओतूनि नेताति ॥५५॥
वाढिलें समस्त पंक्तीसी । सहपंक्तीं श्रीगुरुसी ।
जेवताति अतिहर्षी । द्विजवर पुसतसे ॥५६॥
जो जो मागाल तो पदार्थ । वाढूं वेगें ऐसें म्हणत ।
भागलेति क्षुधाक्रांत । क्षमा करणें म्हणतसे ॥५७॥
घृत असे आपुले करीं । वाढीतसे महापुरीं ।
विप्र म्हणती पुरे करीं । आकंठवरी जेविलों ॥५८॥
भक्ष्य परमान्न पत्रशाका । ब्राह्मण वाढिताति अनेका ।
शर्करा दधि लवणादिका । अनेक परी जेविले ॥५९॥
तृप्त जाहले ब्राह्मण देखा । हस्तप्रक्षालन करिती मुखा ।
उच्छिष्टें काढिती तात्काळिका । आश्चर्य म्हणती तये वेळीं ॥६०॥
तांबूलादि देती समस्तांसी । श्रीगुरु बोलावूनि तयांसी ।
बोलवा म्हणती आपुले कलत्रपुत्रांसी । समस्त येऊनि जेवितील ॥६१॥
आलें विप्रकुळ समस्त । जेवून गेलें पंचामृत ।
श्रीगुरु मागुती निरापित । शूद्रादि ग्रामलोक बोलावा ॥६२॥
त्यांचे स्त्रियापुत्रांसहित । बोलावीं शीघ्र ऐसें म्हणत ।
पाचारितां आले समस्त । जेवूनि गेले तये वेळीं ॥६३॥
श्रीगुरु पुसती ब्राह्मणांसी । आतां कोण राहिले ग्रामवासी ।
ते सांगती स्वामियासी । अत्यंज आहेति उरले ॥६४॥
बोलावा त्या समस्तांसी । अन्न द्यावें वाढून त्यांसी ।
जितुकें मागती तृप्तीसी । तितुकें द्यावें अन्न वेगीं ॥६५॥
तेही तृप्त झाले देखा । प्राणिमात्र नाहीं भुका ।;
सांगताति श्रीगुरुनायक । डांगोरा पिटा ग्रामांत ॥६६॥
कोणी असती क्षुधाक्रांत । त्यांसी बोलवावें त्वरित ।
ऐसें श्रीगुरु निरोपित । हिंडले ग्रामीं तये वेळीं ॥६७॥
प्राणिमात्र नाहीं उपवासी । सर्व जेवले परियेसीं ।
मग निरोपित त्या द्विजासी । भोजन तुवां करावें ॥६८॥
श्रीगुरुनिरोपें भोजन केलें । मागुति जाऊनि अन्न पाहिलें ।
आपण जितुकें होतें केलें । तितुकें उरलें असे अन्न ॥६९॥
श्रीगुरु म्हणती तयासी । घेऊनि जावें अन्न त्वरितेसीं ।
घालावें जळांत जळचरांसी । तृप्त होती तेही जीव ॥७०॥
ऐसें तया दिवसीं विचारिती । सहस्त्र चारी झाली मिति ।
भूमीवरी झाली ख्याति । लोक म्हणती आश्चर्य ॥७१॥
इतुकें झालियावरी । श्रीगुरु त्या द्विजातें पाचारी ।
वर देती दरिद्र दुरी । पुत्रपौत्र होती तुज ॥७२॥
समस्त जाहले तटस्थ । देखिलें अति कौतुक म्हणत ।
अन्न केलें होतें किंचित । चारी सहस्त्र केवीं जेविले ॥७३॥
एक म्हणती श्रीगुरुकरणी । स्मरली असेल अन्नपूर्णी ।
अवतारपुरुष असे धणी । श्रीनृसिंहसरस्वती ॥७४॥
एक म्हणती अपूर्व देखिलें । पूर्वीं कथानक होतें ऐकिलें ।
पांडवाघरीं दुर्वास गेले । ऋषीश्वरांसमवेत ॥७५॥
सत्त्वभंग होईल म्हणोन । श्रीकृष्ण आला ठाकून ।
तेणें केलें अन्न पूर्ण । दुसरें आजि देखिलें ॥७६॥
नर दिसतो दंडधारी । सत्य त्रैमूर्ति-अवतारी ।
न कळे महिमा असे अपारी । म्हणती लोक अनेक ॥७७॥
यातें नर जे म्हणती । ते जाती अधोगतीं ।
वर्णावया नाहीं मति । म्हणती हाचि परब्रह्म ॥७८॥
नव्हे हा जरी ईश्वर । केवीं केलें अन्नपूर ।
होतें तीन अडीच शेर । चारी सहस्त्र जेविले केवीं ॥७९॥
आणिक एक नवल झालें । आम्हीं समस्तीं देखिलें ।
प्रेतातें जीव आणिलें । शुष्क काष्ठासी पल्लव ॥८०॥
आणिक ऐका याची महिमा । कोणासी देऊं आतां साम्या ।
कुमसीं होता त्रिविक्रमा । त्यासी दाखविलें विश्वरुप ॥८१॥
ग्रामांत होती वांझ महिषी । क्षीर काढविलें आपुले भिक्षेसी ।
वेद म्हणविले पतितामुखेंसी । अभिमंत्रितां श्रीगुरुमूर्तीं ॥८२॥
आणिक जाहलें एक नवल । कुष्ठी आला विप्र केवळ ।
दर्शनमात्रें झाला निर्मळ । आम्हीं देखिलें दृष्टीनें ॥८३॥
विणकरी होता एक भक्त । त्यासी दाखविला श्रीपर्वत ।
काशीक्षेत्र क्षण न लागत । एका भक्तासी दाखविलें ॥८४॥
आणिक अपार चरित्रता । अमित असे हो सांगतां ।
क्षितीवरी समस्त दैवतें । तयांचें नव्हे सामर्थ्य ॥८५॥
समस्त देवांतें आराधितां । आलास्यें होय मनकाम्यता ।
दर्शनमात्रें श्रीगुरुनाथा । सकळाभीष्टें होताति ॥८६॥
ऐसें म्हणती विप्रलोक । अपूर्व जाहलें कवतुक ।
ख्याति ऐकती समस्त देख । श्रीगुरुचें चरित्र ॥८७॥
सिद्ध म्हणे नामधारकासी । श्रीगुरुचरित्र ऐसें परियेसीं ।
याचि निमित्य बहुवसीं । शिष्य जाहले श्रीगुरुचे ॥८८॥
नाना राष्ट्रींचे भक्त येती । श्रीगुरुची सेवा करिती ।
अंतःकरणीं एकचित्तीं । भजणारांसी प्रसन्न ॥८९॥
गंगाधराचा नंदन । सरस्वती विनवी नमून ।
ऐका तुम्ही समस्त जन । भजा भजा हो श्रीगुरुसी ॥९०॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे अन्नपूर्तिकद्विजचतुः-सहस्त्रभोजनं नाम
अष्टात्रिंशत्तमोऽध्यायः ॥३८॥
॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ ( ओंवीसंख्या ९०)