वसुदेव देवकिचिये उदरीं । कृष्ण जन्मले मथुरेभितरीं ।
कंसाचिये बंदिशाळे माझारीं । श्रावन कृष्णाष्टमीं मध्यरात्री ॥१॥
अयोनिसंभव चतुर्भुज । शंख चक्र गदांबुज ।
चहुं करीं आयुधें सुतेज । मुगुट कुंडलें वनमाळा ॥२॥
कासे पीतांबर कसिला । कंठीं कौस्तुभ तेजागळा ।
श्रीवत्सलांछन शोभला । माजीं मेखळा जडिताची ॥३॥
मस्तकीं मुगुट रत्नखेवणी । रत्नमय कुंडलें उभय कर्णी ।
देखोनियां देवकी नयनीं । म्हणे या कैसेनि आच्छादूं ॥४॥
देखतां वसुदेवहि विस्मित । म्हणे बाळ नव्हे हा जगन्नाथ ।
सायुधें भूषणें घवघवित । तेजःपुंज निजात्मा ॥५॥
देवकी लागोनियां पायांशीं । म्हणे गोकुलां नेऊनि लपवा यासी ।
विदित झालिया रायासी । नेदी वांचो य बाळका ॥६॥
निळा म्हणे ऐसी चिंता । आकुळनी ठेला तया उभयतां ।
हें देखोनिया कृष्णनाथा । कळों सरलें हृद्गत ॥७॥