गोवर्धन पर्वत

        भगवान श्रीकृष्ण सर्वांना ठाऊक आहे ना ? तो गोकुळात रहायचा. तेथे गोवर्धन नावाचा मोठा पर्वत होता. गोकुळात श्रीकृष्णासमवेत सगळे गोप-गोपी आनंदाने रहात होते. प्रतिवर्षी ते पाऊस पडावा; म्हणून इंद्रदेवाची पूजा करायचे. एकदा इंद्राला गर्व झाला की, मी पाऊस पाडत असल्यामुळे सगळे चालले आहे. हे श्रीकृष्णाने ओळखले. कारण श्रीकृष्णाला `प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे’, ते सगळेच समजते. श्रीकृष्ण गोपगोपींना म्हणाला, “अरे, या गोवर्धन पर्वतामुळेच आपल्याला पाऊस मिळतो. तेव्हा आपण इंद्राची नको, गोवर्धन पर्वताचीच पूजा करूया. तेव्हापासून गोपी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले.


हे पाहून इंद्राला राग आला. त्याने जोराने मुसळधार पाऊस पाडायला प्रारंभ केला. त्यामुळे नदीचे पाणी वाढू लागले. सगळेजण घाबरले आणि श्रीकृष्णाजवळ गेले. श्रीकृष्ण म्हणाला, “अरे, ज्या पर्वताची तू पूजा केली, तोच वाचवेल आपल्याला! आपण सगळे संघटित होऊया.” मग गोपगोपी आपापल्या काठ्या घेऊन एकत्र आले. त्या वेळी श्रीकृष्णाने काय केले ठाऊक आहे का ? गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या एका करंगळीवर उचलला. त्या वेळी मोठा आवाज झाला. मग गोपगोपींनीही आपापल्या काठ्या त्या पर्वताला लावल्या. सर्वांना पर्वताखाली आश्रय मिळाला. इकडे इंद्राकडचे ढग संपले.

अशा प्रकारे श्रीकृष्णाने मुसळधार पावसापासून सर्व गोपगोपींचे रक्षण केले आणि गोपगोपी यांनीही काठ्या लावून त्याच्या कार्यात साहाय्य केल्यामुळे श्रीकृष्ण त्यांच्यावर प्रसन्न झाला. सेवा केल्यामुळे गोपगोपी मोक्षाला गेले.

        मुलांनो, `गर्वाचे घर खाली’ ही म्हण तुम्हाला ठाऊकच असेल. वर्गात जर आपण हुशार असलो, तर त्याचा आपल्याला गर्व होतो. त्यामुळे इतरांना आपण तुच्छ लेखू लागतो; पण ईश्वराने प्रत्येकात काही ना काही गुण दिलेले असतात. कोणी अभ्यासात हुशार, कोणी चित्रकलेत, कोणी गाण्यात हुशार असतो. कोणी मनमिळाऊ असतो, कोण इतरांना साहाय्य करतो. त्यामुळे कुणालाही तुच्छ लेखू नये.

        मुलांनो, आपण यातून काय बोध घेतला पाहिजे ? देवाची भक्ती करत आपण सर्वांनी देवाच्या कार्याला हातभार लावला पाहिजे. तरच आपल्या जन्माचे सार्थक होईल. आपणही मोक्षाला जाऊ शकतो.

Leave a Comment