नव्हे चेटकी चाळकू द्रव्यभोंदु।
नव्हे निंदकू मत्सरू भक्तिमंदू॥
नव्हे उन्मतू वेसनी संगबाधू।
जनी ज्ञानिया तोचि साधु अगाधू ॥१८१॥
नव्हे वाउगी चाहुटी काम पोटी।
क्रियेवीण वाचाळता तेचि मोठी॥
मुखे बोलिल्यासारिखे चालताहे।
मना सद्गुरु तोचि शोधुनि पाहे ॥१८२॥
जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी।
कृपाळु मनस्वी क्षमावंत योगी॥
प्रभु दक्ष व्युत्पन्न चातुर्य जाणे।
तयाचेनि योगे समाधान बाणे ॥१८३॥
नव्हे तोचि जाले नसे तेचि आले।
कळो लागले सज्जनाचेनि बोले॥
अनिर्वाच्य ते वाच्य वाचे वदावे।
मना संत आनंत शोधीत जावे ॥१८४॥
लपावे अति आदरे रामरुपी।
भयातीत निश्चीत ये स्वस्वरुपी॥
कदा तो जनी पाहतांही दिसेना।
सदा ऐक्य तो भिन्नभावे वसेना ॥१८५॥
सदा सर्वदा राम सन्नीध आहे।
मना सज्जना सत्य शोधुन पाहे॥
अखंडीत भेटी रघूराजयोगू।
मना सांडीं रे मीपणाचा वियोगू ॥१८६॥
भुते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे।
परी सर्वही स्वस्वरुपी न साहे॥
मना भासले सर्व काही पहावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥१८७॥
देहेभान हे ज्ञानशस्त्रे खुडावे।
विदेहीपणे भक्तिमार्गेचि जावे॥
विरक्तीबळे निंद्य सर्वै त्यजावे।
परी संग सोडुनि सुखी रहावे ॥१८८॥
मही निर्मिली देव तो ओळखावा।
जया पाहतां मोक्ष तत्काळ जीवा॥
तया निर्गुणालागी गूणी पहावे।
परी संग सोडुनि सुखे रहावे ॥१८९॥
नव्हे कार्यकर्ता नव्हे सृष्टिभर्ता।
पुरेहून पर्ता न लिंपे विवर्ता॥
तया निर्विकल्पासि कल्पित जावे।
परि संग सोडुनि सुखे रहावे ॥१९०॥
देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना।
तया ज्ञान कल्पांतकाळी कळेना॥
परब्रह्म तें मीपणे आकळेना।
मनी शून्य अज्ञान हे मावळेना ॥१९१॥
मना ना कळे ना ढळे रुप ज्याचे।
दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचे॥
तया खुण ते हीन दृष्टांत पाहे।
तेथे संग निःसंग दोन्ही न साहे ॥१९२॥
नव्हे जाणता नेणता देवराणा।
न ये वर्णिता वेदशास्त्रा पुराणा॥
नव्हे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा।
श्रुती नेणती नेणती अंत त्याचा ॥१९३॥
वसे हृदयी देव तो कोण कैसा।
पुसे आदरे साधकू प्रश्न ऐसा॥
देहे टाकिता देव कोठे पहातो ।
परि मागुता ठाव कोठे रहातो ॥१९४॥
बसे हृदयी देव तो जाण ऐसा।
नभाचेपरी व्यापकू जाण तैसा॥
सदा संचला येत ना जात कांही।
तयावीण कोठे रिता ठाव नाही ॥१९५॥
नभी वावरे जा अणुरेणु काही।
रिता ठाव या राघवेवीण नाही॥
तया पाहता पाहता तोचि जाले।
तेथे लक्ष आलक्ष सर्वे बुडाले ॥१९६॥
नभासारिखे रुप या राघवाचे।
मनी चिंतिता मूळ तुटे भवाचे॥
तया पाहता देहबुद्धी उरेना।
सदा सर्वदा आर्त पोटी पुरेना ॥१९७॥
नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे।
रघूनायका ऊपमा ते न साहे॥
दुजेवीण जो तोचि तो हा स्वभावे।
तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे ॥१९८॥
अती जीर्ण विस्तीर्ण ते रुप आहे।
तेथे तर्कसंपर्क तोही न साहे॥
अती गुढ ते दृश्य तत्काळ सोपे।
दुजेवीण जे खुण स्वामिप्रतापे ॥१९९॥
कळे आकळे रुप ते ज्ञान होता।
तेथे आटली सर्वसाक्षी अवस्था॥
मना उन्मनी शब्द कुंठीत राहे।
तो रे तोचि तो राम सर्वत्र पाहे ॥२००॥
कदा ओळखीमाजि दूजे दिसेना।
मनी मानसी द्वैत काही वसेना॥
बहूता दिसा आपली भेट जाली।
विदेहीपणे सर्व काया निवाली ॥२०१॥
मना गुज रे तूज हे प्राप्त झाले।
परी अंतरी पाहिजे यत्न केले॥
सदा श्रवणे पाविजे निश्चयासी।
धरी सज्जनसंगती धन्य होसी ॥२०२॥
मना सर्वही संग सोडूनि द्यावा।
अती आदरे सज्जनाचा धरावा॥
जयाचेनि संगे महादुःख भंगे।
जनी साधनेवीण सन्मार्ग लागे ॥२०३॥
मना संग हा सर्वसंगास तोडी।
मना संग हा मोक्ष तात्काळ जोडी॥
मना संग हा साधना शीघ्र सोडी।
मना संग हा द्वैत निःशेष मोडी ॥२०४॥
मनाची शते ऐकता दोष जाती।
मतीमंद ते साधना योग्य होती॥
चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्य अंगी।
म्हणे दास विश्वासत मुक्ति भोगी ॥२०५॥