म्हणे दास सायास त्याचे करावे।
जनीं जाणता पाय त्याचे धरावे॥
गुरू अंजनेवीण तें आकळेना।
जुने ठेवणे मीपणे ते कळेना॥१४१॥
कळेना कळेना कळेना कळेना।
ढळे नाढळे संशयोही ढळेना॥
गळेना गळेना अहंता गळेना।
बळें आकळेना मिळेना मिळेना॥१४२॥
अविद्यागुणे मानवा उमजेना।
भ्रमे चुकले हीत ते आकळेना॥
परीक्षेविणे बांधले दृढ नाणें।
परी सत्य मिथ्या असें कोण जाणें॥१४३॥
जगी पाहतां साच ते काय आहे।
अती आदरे सत्य शोधुन पाहे॥
पुढे पाहतां पाहतां देव जोडे।
भ्रम भ्रांति अज्ञान हें सर्व मोडे॥१४४॥
सदा वीषयो चिंतितां जीव जाला।
अहंभाव अज्ञान जन्मास आला॥
विवेके सदा स्वस्वरुपी भरावे।
जिवा ऊगमी जन्म नाही स्वभावें॥१४५॥
दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी।
अकस्मात आकारले काळ मोडी॥
पुढे सर्व जाईल कांही न राहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४६॥
फुटेना तुटेना चळेना ढळेना।
सदा संचले मीपणे ते कळेना॥
तया एकरूपासि दूजे न साहे।
मना संत आनंत शोधुनि पाहें॥१४७॥
निराकार आधार ब्रह्मादिकांचा।
जया सांगतां शीणली वेदवाचा॥
विवेके तदाकार होऊनि राहें।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४८॥
जगी पाहतां चर्मलक्षी न लक्षे।
जगी पाहता ज्ञानचक्षी निरक्षे॥
जनीं पाहता पाहणे जात आहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१४९॥
नसे पीत ना श्वेत ना श्याम कांही।
नसे व्यक्त अव्यक्त ना नीळ नाहीं॥
म्हणे दास विश्वासतां मुक्ति लाहे।
मना संत आनंत शोधुनि पाहे॥१५०॥
खरें शोधितां शोधितां शोधिताहे।
मना बोधिता बोधिता बोधिताहे॥
परी सर्वही सज्जनाचेनि योगे।
बरा निश्चयो पाविजे सानुरागे॥१५१॥
बहूतांपरी कूसरी तत्त्वझाडा।
परी अंतरी पाहिजे तो निवाडा॥
मना सार साचार ते वेगळे रे।
समस्तांमधे एक ते आगळे रे॥१५२॥
नव्हे पिंडज्ञाने नव्हे तत्त्वज्ञाने ।
समाधान कांही नव्हे तानमाने॥
नव्हे योगयागें नव्हे भोगत्यागें।
समाधान ते सज्जनाचेनि योगे॥१५३॥
महावाक्य तत्त्वादिके पंचकर्णे।
खुणे पाविजे संतसंगे विवर्णे॥
द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो।
तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो॥१५४॥
दिसेना जनी तेचि शोधुनि पाहे।
बरे पाहता गूज तेथेचि आहे॥
करी घेउ जाता कदा आढळेना।
जनी सर्व कोंदाटले ते कळेना॥१५५॥
म्हणे जाणता तो जनी मूर्ख पाहे।
अतर्कासि तर्की असा कोण आहे॥
जनीं मीपणे पाहता पाहवेना।
तया लक्षितां वेगळे राहवेना॥१५६॥
बहू शास्त्र धुंडाळता वाड आहे।
जया निश्चयो येक तोही न साहे॥
मती भांडती शास्त्रबोधे विरोधें।
गती खुंटती ज्ञानबोधे प्रबोधे॥१५७॥
श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे।
स्मृती वेद वेदान्तवाक्ये विचित्रे॥
स्वये शेष मौनावला स्थीर पाहे।
मना सर्व जाणीव सांडून राहे॥१५८॥
जेणे मक्षिका भक्षिली जाणिवेची।
तया भोजनाची रुची प्राप्त कैची॥
अहंभाव ज्या मानसीचा विरेना।
तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना॥१५९॥
नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नानाविकारी॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
अहंभाव जो राहिला तूजपासी॥१६०॥