बरीच मुले त्यांच्या मनाप्रमाणे घडले नाही किंवा आई-वडिलांनी त्यांचे ऐकले नाही, तर चिडतात, रुसतात किंवा निराश होतात. अशा मुलांना स्वतःला आणि त्यांच्यामुळे इतरांनाही त्रास होतो. राग येणे, उद्धटपणे बोलणे, खोटेपणा आदी दोष हे वाईट स्वभावाचे, तर प्रेमळपणा, इतरांना साहाय्य करणे, संयम आदी गुण हे चांगल्या स्वभावाचे निर्देशक आहेत. गुणी बालक सर्वांनाच आवडतो ना ! जो आवडतो सर्वांना, तोची आवडे देवाला! स्वतःतील दोष घालवणे, ही समाधानी अन् आनंदी बनण्याची सोपी युक्ती आहे !
सध्याच्या स्पर्धात्मक युगात यशस्वी भवितव्य (करीयर) घडवण्यासाठी बौद्धिक क्षमतेसह मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास झालेला असणेही आवश्यक आहे. न्यूनगंड, भीती, काळजी, नैराश्य यांसारख्या स्वभावदोषांमुळे मन दुर्बल होते. स्वार्थीपणा, मत्सर, चिडचिडेपणा यांसारख्या दोषांमुळे सर्व सोयीसुविधा उपलब्ध असतांनाही सुखी-समाधानी होता येत नाही. जीवनात सतत आनंदी रहाता येण्याकरता आपल्यातील स्वभावदोष दूर करण्यासाठी सातत्याने आणि तळमळीने प्रयत्न करणे आवश्यक असते. स्वभावदोष जाऊन मुलांमधे आंतरिक सुधारणा झाली की, ‘खर्या अर्थाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला’, असे म्हणता येईल.
पालकांना नम्र विनंती !
‘स्वभावदोष-निर्मूलन प्रक्रिया’ ही एक मानसिक उपचारपद्धत आहे. या विषयाची मुलांना सवय नसते. बहुतांशी मुलांना एखादी गोष्ट चिकाटीने करण्याचीही सवय नसते. तसेच ‘दोष-निर्मूलन प्रक्रिया’ राबवतांना मनाशी सतत संघर्ष करावा लागत असल्याने मुलांना ही प्रक्रिया आरंभी कठीणही वाटते. वस्तूतः ही प्रक्रिया कठीण नाही, तर आनंददायी आहे. पालकांनो, तुमचा आधार, तुमचे साहाय्य मुलांमध्ये या प्रक्रियेविषयी आत्मविश्वास निर्माण करण्यात लाखमोलाचे ठरेल.