ही कथा श्री वसिष्ठांनी श्रीरामांना योगवसिष्ठातील उपशम प्रकरणात सांगितली आहे. उपासनेच्या योगाने देवाची कृपा होऊन ज्ञानसंपन्नता कशी येते, तसेच आत्मज्ञान होण्याला स्वप्रयत्नांची व विचाराची आवश्यकता आहे, असे यावरून स्पष्ट होते. ती कथा अशी- पाताळाचा राजा हिरण्यकश्यपू फार उद्दाम झाला, तेव्हा नृसिंहावतार घेऊन विष्णूंनी त्याला मारले. इतर दैत्य घाबरून गेले. भगवान विष्णू परत गेल्यावर प्रल्हादाने दैत्यांचे सांत्वन करून त्यांना बोध दिला. नंतर त्याने विचार केला,"देव अतुल पराक्रमी आहेत. त्यांनी माझा पिता व बलाढ्य असुर यांना धुळीस मिळवले. त्यांच्यावर आक्रमण करून गेलेले वैभव मिळवणे अशक्य आहे. मग आता भक्तीने त्यांना वश केले पाहिजे." ’नमो नारायणाय’ असा जप करून त्याने तपाला सुरवात केली. हे पाहून सर्व देव आश्चर्यचकित झाले. यात दैत्यांचे काहीतरी गुप्त कारस्थान आहे, असा संशय त्यांनी विष्णूकडे व्यक्त केला. त्यावर विष्णूंनी त्यांना समजावले,"बलाढ्य राक्षस माझी भक्ती करून जास्त बलाढ्य होतात हे खरे; पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे घाबरू नये. त्याचा हा अखेरचा जन्म असून, तो मोक्षार्थी आहे."
प्रल्हादाच्या भक्तीमुळे त्याच्या मनात विवेक, वैराग्य, आनंद या गुणांचा विकास झाला. भोगांबद्दलची आसक्ती संपली. भगवान विष्णू प्रसन्न होऊन ’तू परमपदाला पोचशील’ असा वर दिला. ईश्वरदर्शनाने प्रल्हादाचा अहंकार गळाला. तो शांत, सुखी, समाधीस्थित झाला. अशा स्थितीत पुष्कळ काळ लोटला. त्या वेळी दानवांनी त्याला जागृत करण्याचा प्रयत्न केला. दानवांना कोणी शासक राहिला नाही. देवांना असुरांची भीती राहिली नाही. शेषशय्येवर निजलेला श्रीविष्णू जागा झाला तेव्हा मनाने त्याने तिन्ही लोकांची स्थिती अवलोकन केली. दैत्यांचे सामर्थ्य कमी झाले असून, देव शांत झाले आहेत, त्यांनी दैत्य व मनुष्यांचा द्वेष करणे सोडले आहे. अशा स्थितीत पृथ्वीवरील यज्ञयागादी क्रिया बंद पडतील. भूलोक राहणार नाही, हे त्रिभुवन कल्पांतापर्यंत राहावे या संकल्पाला बाधा येईल. म्हणून दानवांचे राज्य राहिले पाहिजे. त्यासाठी प्रल्हादाला सावध केले पाहिजे. मग श्रीहरी पाताळात जाऊन पोचले. त्यांनी प्रल्हादाला त्याचे राज्य व देह याचे स्मरण दिले. विष्णूच्या आज्ञेनुसार प्रल्हादाने राज्याभिषेक करवून घेतला. भय, क्रोध, कर्मफळ यापासून विमुक्त होऊन त्याने राज्य केले व शेवटी परमपदाला पोचला. अशा रीतीने स्वप्रयत्नाने त्याने सर्व काही प्राप्त करून घेतले.