नामाचा महिमा

विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस आपल्या भक्तमंडळींशी बोलतांना अगदी साधेसुधे दिसणाऱ्या, व्यवहारात, संसारात राहून साधना करणाऱ्या अनन्यनिष्ठ भक्तासंबंधी बोलत असत. तसेच त्यांनी पाहिलेल्या साधूंचे वर्णनही ते करत असत. त्यात ‘दिव्योन्माद’ झालेले, ‘ज्ञानोन्माद’ झालेले, ‘आनंदलाभ’ झालेले, उच्च परमहंस अवस्थेस पोहोचलेले असे विविधावस्थेतले साधूपुरुष यांच्याविषयीसुद्धा ते सांगत असत. असेच एकदा रामकृष्ण परमहंस यांनी आपल्या भक्तगणांशी बोलतांना एक घटना विशद केली.

एका गावात एक साधू आला. त्याच्याजवळ एक लोटा आणि एक पोथी यांव्यतिरिक्त दुसरी काहीच सामुग्री नव्हती. त्याच्याजवळ असलेल्या त्या पोथीवर त्याची फार भक्ती होती. तो प्रतिदिन त्या पोथीची गंध, फूल वाहून पूजा करत असे. ईश्वराच्या नामावर त्याची श्रद्धा होती. त्यामुळे राहिलेल्या वेळेत तो नामस्मरण करण्यातच मग्न असे. दिवसभरात अधूनमधून ती पोथी उघडून बघत असे. त्या साधूची थोडीफार ओळख झाल्यावर एक दिवस मी त्याची पोथी बघण्यासाठी मागितली. माझ्या फारच आग्रहास्तव त्याने ती मला दिली. मोठ्या उत्कंठतेने मी ती उघडून पाहिली, तर त्या पोथीत केवळ ‘ॐ राम:’ हीच अक्षरे अथपासून इतिपर्यंत लिहिलेली मला दिसली. याचा अर्थ काय, असे मी त्या साधूला विचारल्यावर तो म्हणाला, ”उगीच इतर ग्रंथ वाचून काय करायचे ? एका भगवंतापासूनच तर वेद, पुराणे उत्पन्न झाली आणि तो भगवंत आणि त्याचे नाम, हे तर एकच आहे; म्हणून चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांमध्ये जे काही आहे, ते सारे त्याच्या नामात आहेच ! म्हणून मी त्याच्या नामालाच धरून बसलो आहे.” या प्रकारे त्या साधूचा नामावरच पूर्ण विश्वास होता.

या तऱ्हेने रामकृष्ण परमहंस यांनी नामाचा महिमा साधूच्या उदाहरणावरून आपल्या भक्तगणांना पटवून दिला.

मुलांनो, नामाचा महिमा साधूच्या उदाहरणावरून आपल्या लक्षात आलाच असेल. प्रत्येक कृती करतांना मनातल्यामनात नामजप केल्यास आपण अखंड ईश्वराच्या सान्निध्यात रहातो.

Leave a Comment