नाभानेदिष्ठ

मनूला पुष्कळ मुलगे होते. त्यांत नाभानेदिष्ठ हा सर्वात धाकटा होता. वडील भाऊ गुरूच्या घरी राहून वेद शिकून आले होते. नाभानेदिष्ठही मोठा होताच गुरूपाशी शिकण्यास अरण्यात गेला.

बारा वर्षांनी परत आल्यावर त्याला दिसून आले, की आपल्या सर्व वडील भावांनी बाबांची मिळकत त्याच्या डोळ्यांदेखतच आपापसात वाटून घेतली आहे. नाभाला मात्र काहीच ठेविले नव्हते. नाभाला वडील भावांनी काही न देता धुडकावून लावले. नाभा चिडला व मनूला म्हणाला, `बाबा, माझा वाटा कुठे आहे?’

मनू शांतपणे म्हणाला, `बाळ, काही हरकत नाही. भांडू नकोस. घेऊ दे तुझ्या भावांना सारी मिळकत. मी तुला आणखी मिळवून देतो. इथून जवळच अंगिरस ऋषींनी यज्ञ चालविला आहे. त्यांना स्वर्गास जायचे आहे. पण त्यांच्या यज्ञात एक चूक होत आहे. यज्ञाच्या सहाव्या दिवशी कोणते मंत्र म्हणावे हेच त्यांना समजत नाही. म्हणून त्यांचा यज्ञ पुरा होत नाही व त्यांना स्वर्ग मिळत नाही. त्यांना कोणते मंत्र हवे आहेत ते मी तुला शिकवतो, तू जाऊन त्यांचा यज्ञपुरा कर. स्वर्गास जाताना त्यांनी आपले सर्व धन तुला द्यावे अशी अट तू त्यांना घाल.”

नंतर नाभा अंगिरस ऋषीकडे गेला व म्हणाला, `ऋषींनो, मला तुमच्या यज्ञात घ्या. तुम्हाला अडलेले मंत्र मी सांगतो; मात्र तुमच्या हजार गायी मला देऊन जा म्हणजे झाले.’ अंगिरसांना स्वर्गास गायी घेऊन जायचे नव्हते, म्हणून ते ताबडतोब तयार झाले.

यज्ञ पार पडून ऋषी स्वर्गाला गेले, तेव्हा त्यांच्या सांगण्याप्रमाणे नाभा त्यांच्या गायी गोळा करू लागला. इतक्यात तेथे काळी घोंगडी पांघरलेला एक आडदांड मनुष्य आला व त्याला म्हणाला, `काय रे पोरा, कोणाच्या गायी पळवतो आहेस? हे सर्व धन माझे आहे. यज्ञात शेवटी जे जे उरेल त्यावर माझा हक्क असतो.’

नाभा म्हणाला, `वा ! मला तर हे धन अंगिरसांनी बक्षीस दिले आहे.

तो म्हणजे रुद्र होता. रुद्र मोठा भयंकर दिसे. पण नाभा यत्किंचितही न भिता आपला हक्क बजावीत होता. रुद्र म्हणाला, `खोटे वाटत असेल तर तुझ्या बाबांना जाऊन विचार. त्यांना यज्ञासंबंधी सर्व कळते. ते सांगतील तेव्हा तुझी खात्री होईल.’

नाभा परत आल्यावर मनूने विचारले, `काय रे नाभा, गायी नाही मिळाल्या वाटते?’ नाभाने हिरमुसून सर्व हकिकत बाबांना सांगितली. मनू म्हणाला, `अरे हो ! यज्ञात उरलेल्या धनावर हक्क रुद्राचाच असतो, हे माझ्या लक्षातच नव्हते. काही हरकत नाही. भांडू नकोस. तू रुद्राला सांग की गायीवर हक्क तुझाच आहे.’

हाताशी आलेले धन गेले म्हणून नाभाचा फारच हिरमोड झाला. तरीपण त्याने परत जाऊन मनूचे म्हणणे त्याला सांगितले. नाभाच्या खरे बोलण्यामुळे आणि निर्लोभीपणाने रुद्र संतुष्ट झाला. एवढा क्रूर तो पण नाभाचा हिरमोड पाहून त्याचेही मन विरघळले. तो कौतुकाने म्हणाला, `बाळ, ज्या अर्थी तू खरे बोललास त्या अर्थी ह्या सर्व गायी तुला मी बक्षीस देतो. जा घेऊन आपले धन.’

रुद्राचा हा दयाळूपणा पाहून नाभाला फार नवल वाटले. त्या अचानक परत मिळालेल्या गायी मोठ्या आनंदाने पिटाळीत त्याने आपल्या घरी नेल्या व तो आपल्या सर्व वडील भावांहून श्रीमंत बनला. आपल्या हक्कासाठी न भांडणार्‍या व तरीही दुसर्‍याचे हक्क मानणार्‍या नाभाने आपले नाव वेदांत अमर करून ठेवले आहे.

(सत्य, शांतता व न्याय ह्यांचे महत्त्व सुचविणारी ही गोष्ट ऐतरेयब्राह्मण व तैत्तिरीय संहिता ह्यांवर आधारलेले आहे.)

Leave a Comment