सप्तशृंगगड (वणी)

saptashrung_mata

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी’ स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.

सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. अशीही एक घटना या स्थानास जोडलेली आहे. नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्र्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात. देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.

Leave a Comment