रुद्रेश्वर मंदिर – हरवळे, गोवा
गोव्याच्या निसर्गरम्य परिसरात वसलेल्या अनेक देवस्थानांपैकी हरवळे येथील 'श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थान' हे प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. या देवस्थानची स्थापना झाल्यावर याठिकाणी श्रद्धेने केलेली पूजाअर्चा, उपासना आणि अनुष्ठानांचे फळ त्वरित मिळत असल्याची प्रचीती अनेक भक्तांना आली आणि देवस्थानाची कीर्ती चोहोकडे पसरली. यामुळे या ठिकाणी नारायण नागबळी यांसारखे अत्यंत पवित्र क्षेत्री करावयाचे विधीसुद्धा होऊ लागले आणि देवस्थानाच्या जागृततेविषयी लोकांत प्रसिद्धी झाली. त्यामुळे अंत्येष्टविधी करवून घेण्यासाठी संपूर्ण गोव्यातून लोक येथे येऊ लागले.
मंदिराची रचना
देवस्थानच्या मंदिराची उभारणी भक्कम अशा दहा स्तंभांवर हेमाडपंथी पद्धतीने करण्यात आली आहे. मंदिराच्या पश्चिमेकडे पांडवांच्या ओवर्या आहेत. येथे कोणत्याही महाजनास देवकृत्य करण्यास प्रतिबंध नाही.
महाशिवरात्री उत्सव
प्रतिवर्षी माघ अमावास्येला येथे मोठी जत्रा भरते, तसेच महाशिवरात्रीला मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करण्यात येतो. पहिल्या दिवशी नाटक सादर केले जाते. पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत अभिषेक चालू असतो. महाशिवरात्रीच्या रात्री पालखी निघते आणि पहाटे रथोत्सवाने उत्सवाची सांगता होते.
संकलक – श्री. श्रीपाद बाकरे, साखळी, गोवा.