श्री शांतादुर्गादेवी


श्री शांतादुर्गा मंदिर, कवळे, गोवा

श्री शांतादुर्गा मंदिर, कवळे, गोवा


श्री क्षेत्र कैवल्यपूर (कवळे) हे गोमंतकातील अंत्रूज महालात, म्हणजे सध्याच्या फोंडा तालुक्यात एका निसर्गरम्य स्थळी वसलेले आहे. या पुण्यक्षेत्रात श्री शांतादुर्गा देवालयाची सुंदर आणि भव्य इमारत एका प्रेक्षणीय स्थळी, पूर्वाभिमुख असून तिच्या उत्तर, पश्चिम आणि दक्षिण या तीन बाजूस हल्लीच नव्याने बांधलेल्या भव्य व सर्व सुखसोयींनी युक्त अशा अग्रशाळा, समोर दीपस्तंभ व पुढे प्राकाराच्या खालच्या बाजूस सुंदर तळी आहे. प्राकारात प्रवेश करण्याच्या महाद्वारावर चौघडा वाजवण्यासाठी नगारखाना असून, तेथे रोज त्रिकाळ चौघडा वाजत असल्यामुळे तेथील वातावरण मन प्रसन्न करणारे आहे.

श्री शांतादुर्गा देवालयाचा घूड जो गर्भागाराच्या वरील घुमटावर दिसतो, तो घूड गोमंतकातील इतर कोणत्याही देवस्थानातील देवालयाच्या घुडापेक्षा उंच आणि उत्तम असल्याची ख्याती आहे आणि म्हणूनच श्री मंगेश देवालयाचा खांब (दीपस्तंभ), श्री शांतादुर्गा देवालयाचा घूड, श्री महालसादेवीचे स्थळ आणि श्री नागेश देवालयाचा तलाव, ही सर्व गोमंतकातील प्रमुख देवस्थानांची वैशिष्ट्ये किंवा उत्तम भाग म्हणून प्रसिद्ध आहेत.

हे देवालय बांधण्याची प्रेरणा श्री शांतादुर्गादेवीने नारोराम मंत्री यांना दिली. सरदार नारोराम शेणवी रेगे, कौशिक गोत्री, हे मूळ कोचरे गावचे. यांना शाहू छत्रपतींच्या दरबारी सातारा येथे इ.स. १७१३ मध्ये मंत्रीपद लाभले. आपणास श्री देवीने एवढे ऐश्वर्य, मानमरातब, धन व संपत्ती दिली, अशी त्यांची दृढ श्रद्धा असल्यामुळे श्री देवीचे भव्य देवालय बांधले पाहिजे, याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी इ.स. १९३० च्या सुमारास स्वखर्चाने नवीन देवालयाची पायाभरणी करून बांधकामास आरंभ केला व इतर महाजनांच्या सहकार्याने सध्याचे श्री शांतादुर्गादेवीचे भव्य आणि सुंदर मंदिर उभारले.

श्री शांतादुर्गादेवीच्या मंदिराच्या लगतच डावीकडे श्री नारायणदेवाचे मंदिर असून त्या मंदिरात मुख्यासनावर श्री नारायणदेव (पाषाण मूर्ती) व तेथेच श्री गणपति (पाषाण मूर्ती) आहेत. या मंदिराच्या डावीकडे पारिजाताचा वृक्ष असून त्या पारावर बारा वीर भगवतीची लहान मूर्ती आणि जवळच दोन पादुका आहेत. या पादुका एका अज्ञात संन्याशाच्या आहेत, असे सांगतात.

श्री शांतादुर्गादेवीच्या देवालयासमोर महाद्वाराच्या पायर्‍या आणि दीपस्तंभ यांमध्ये श्री क्षेत्रपालाची शिला आहे. तसेच देवालयाच्या पाठीमागच्या डाव्या बाजूस एक मोठी शिला आहे. तिला म्हारवाची शिला म्हणतात. तिथेच त्याचा शेज आहे आणि डोंगराच्या बाजूस म्हारवाचे पेड(पार) आहे.

देवालयाच्या प्राकारात प्रवेश करण्याचे जे महाद्वार नगारखान्याखाली आहे, त्या महाद्वाराच्या डाव्या बाजूस म्हणजे प्राकारात प्रवेश करणार्‍यांच्या उजव्या बाजूस खाली, प्रमुख डांबरी रस्त्याच्या पातळीवर एक लहान टुमदार देवालय असून, त्या देवालयात मूळपुरुष कौशिक गोत्री लोमशर्माची पाषाणी मूर्ती स्थापन केलेली आहे. त्या मूर्तीची दररोज पूजा-अर्चा चालते. ज्या कौशिक गोत्री ब्राह्मणास श्री परशुराम कर्दलीपूर म्हणजे केळोशी हा गाव अग्रहार मिळाला, तेथे त्यांनी आपली कुलदेवी श्री शांतादुर्गा या दैवताची स्थापना केली होती, तोच कौशिक गोत्री ब्राह्मण लोमशर्मा मूळपुरुष होय.

जत्रोत्सव

माघ महिन्यात होणारा जत्रोत्सव माघ शुक्ल प्रतिपदा रोजी सुरू होऊन शुक्ल षष्ठीस त्याची सांगता होते. या प्रसंगी मोठी यात्रा जमते. या उत्सवास केळशीकरांच्या प्रत्येक कुटुंबातून निदान एकतरी माणूस हजर असतोच. माघ शुद्ध पंचमीचा महापर्वणीचा दिवस होय. माघ शुक्ल षष्ठी रोजी पहाटेस महारथातून श्री शांतादुर्गादेवीची मिरवणूक निघते व हा महापर्वणीचा महत्त्वाचा उत्सव पूर्ण होतो. ही मिरवणूक निघण्यापूर्वी रथात आरूढ झालेल्या श्री देवीची पूजा करून रथावर देवस्थानाचा नारळ फोडला जातो. नारळ फोडण्याचा पहिला मान श्रीगौडपादाचार्य संस्थान वैâवल्यपूर मठाधिशांचा आहे. मठाधिशांच्या गैरहजेरीत त्या मठस्थ ब्राह्मणाकडून अथवा त्या मठाच्या कमाविसदाराकडून नारळ फोडण्यात येतो. या देवस्थानात दर महिन्यातील शुक्ल आणि वद्य या दोन्ही पक्षांतील पंचमी हा दिवस नित्योत्सवाचा आहे. या दिवशी रात्री पुराण-कीर्तनादि कार्यक्रम झाल्यावर श्री देवीची पालखीतून मिरवणूक निघते. कोणताही महाजन त्या देवस्थानात पंचमी रोजी आला असता, त्या दिवशीचा उत्सव पूर्ण केल्याशिवाय त्याला देवस्थानातून बाहेर जाता येणार नाही, असा निर्बंध आहे. निरुपायाची अडचण असली, तरच श्री देवीकडे नारळ ठेवून निरुपायाबद्दल विनंती प्रार्थना करून मग जावे लागते.

Leave a Comment