श्री मंगेश देवस्थान, गोवा
गोव्यातील पणजी-फोंडा महामार्गावर फोंड्यापासून ७ कि.मी. अंतरावर मंगेशी हे गाव आहे. गोव्यातील एक प्रमुख देवस्थान आणि पर्यटनस्थळ म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे.
गोव्यातील प्रमुख देवस्थानांमध्ये प्रसिद्ध असे श्री मंगेश देवस्थान हे प्रियोळ गावातील मंगेशी येथे आहे.स्कंद पुराणात सह्याद्री खंडात वर्णिल्याप्रमाणे कैलासाधिपती श्री शंकर, श्री मंगेश या नावाने गोमंतकाच्या दक्षिणेला अघनाशिनी नदीच्या पवित्र तिरावर कुशस्थळी (आताचे कुठ्ठाळी) या नगरामध्ये प्रकट झाला. या प्रकटीकरणाची कथाही फारच सुंदर आहे. कुशस्थळी नगरीमध्ये लोमेश नावाचा रुद्राध्याय संपन्न ब्राह्मण होता. एकदा तो रात्री ग्रहणाच्या वेळी अघनाशिनी नदीच्या संगमावर स्नानास गेला. संगमावर स्नान करतांना पाण्यातील एका महाकाय मगरीने त्याचा पाय पकडला आणि ती त्याला पाण्यामध्ये ओढू लागली. भयभीत लोमेशाने श्री शंकराची प्रार्थना केली. ब्राह्मणाचा धावा ऐकून पाण्यात एक धनुर्धारी विप्र प्रकट झाला. त्याच्या हातात त्रिशूळ आणि परशू होता. विप्राने मगरीस त्रिशुळाने ठार मारले आणि लोमेशाला मुक्त केले, त्या वेळी लोमेशाला भगवंताचे दर्शन झाले. लोमेशाने भगवंताला विनंती केली की, ‘तुझ्या चरणकमली माझी भक्ती दृढ असावी आणि भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण येथेच वास करावा’.
श्री शंकर म्हणाले, ‘‘ या अघनाशिनी नदीत माझे स्थान आहे. विघ्नांनी गांजलेले जे लोक माझे स्मरण करतील, त्यांची सर्व दुःखे मी नष्ट करीन’’. असे बोलून श्री शंकर अंतर्धान पावले. त्यावेळेपासून श्री मांगिरीशकुशस्थळी आहेत.
२७ फेब्रुवारी १५१० या दिवशी पोर्तुगीज सेनापती आफोंस द आल्बुकर्व यांनी ‘धार्मिक क्षेत्रांत ढवळाढवळ करणार नाही’, असे दिलेले आश्वासन नंतरच्या काळात पाळले नाही. पोर्तुगालच्या राणीने हिंदु मंदिरांची नासधूस करावी, धार्मिक कृत्ये घरात अगर बाहेर करू नयेत आणि ब्राह्मण, हरिदास आणि पुराणिक यांनी या राज्याच्या हद्दीत राहू नये, असा आदेश दिला होता. या वेळी तातडीने निर्णय घेतला पाहिजे, असे ओळखून श्री मंगेशाच्या येथील कुळाव्यांनी देवालयात गुप्त बैठक घेतली आणि देवालाच मार्ग दाखव, अशी प्रार्थना केली.
त्याच रात्री त्यांना दृष्टांत झाला की, माझे वास्तव्य सर्वत्र आहे. शिवलिंग श्री मंगेश प्रतिकाचे संरक्षण करण्यासाठी ते उचलून ज्या मार्गाने जावेसे वाटते, त्या मार्गाने जाऊन लिंगास जडपणा येऊन ते पुढे नेणे अशक्य होईल, तेथे ते खाली ठेवून त्याची पुनःप्रतिष्ठापना करा. लगेच प्रमुख महाजन जमा झाले आणि त्यांनी त्याच रात्री श्री मंगेश शिवलिंग पालखीवजा झोळीत ठेवले आणि अत्यावश्यक परिवार देवतांच्या मूर्ती बरोबर घेऊन रात्रीच्या गडद अंधारात मडकई जवळच्या तिरावर आजच्या मंगेशी या वाड्यावर आणून ठेवल्या. त्यानंतर मंगेशी येथे श्री मंगेशाचे मंदिर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात बांधले गेले असावे. मंदिराच्या गर्भागारावरील घुमटावर श्री गौडपादाचार्य स्वामींच्या हस्ते सुवर्णकलश बसविण्यात आला. श्री मंगेश देवस्थानात इतरही अनेक देवता आहेत. मंदिरात कौलप्रसादही होतो.
मंदिरात कौलप्रसाद लावून देवाला प्रश्न विचारून आपल्या समस्या सोडवण्याकरिता चौकावरील श्री देवशर्मा या ग्रामपुरुषाच्या मूर्तीला तांबड्या रंगाच्या पीटकळीच्या (एक वनस्पती) कळ्या आणि फुलांच्या पाकळ्या पाण्यात बुडवून लावतात. जी कळी किंवा पाकळी पडेल त्याची परिभाषा जाणून घेऊन पुजारी समस्येवर उत्तर मिळवतो. कुठ्ठाळी गावचा एखादा खिस्ती इसम प्रसाद घेण्यासाठी आला, तर त्याचा प्रसाद अग्रक्रमाने लावण्याची वहिवाट आहे.
मंदिरातील काही प्रमुख उत्सव आणि जत्रोत्सव
श्री मंगेश मंदिरात नित्यनेमाने अभिषेक, लघुरुद्र, वगैरे धार्मिक कृत्ये चालतात. याशिवाय प्रमुख उत्सव म्हणजे रामनवमी, विजयादशमी, दहीकालोत्सव, शिवरात्रोत्सव आणि जन्मोत्सव.
मंदिराचा जत्रोत्सव माघ शु. सप्तमीला चालू होतो. द्वादशीला रात्री देवाची मूर्ती नौकेत बसवून तलावामध्ये नौकारोहणाचा कार्यक्रम असतो. जत्रेच्या वेळी देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा जाहीर लिलाव केला जातो. या जत्रेसाठी गोव्यातून तसेच गोव्याबाहेरून भक्तगण हजारोंच्या संख्येने येतात.
संकलक : श्री. नारायण नाडकर्णी, फोंडा, गोवा.