कोल्हापूर ( श्री महालक्ष्मी​देवी )


१. श्री महालक्ष्मीदेवीच्या स्थानाचा इतिहास

एका कथेनुसार करवीर क्षेत्रातील कोल्हासुर नावाचा दैत्यराजा प्रजेला आणि देवांना पुष्कळ त्रास देत असे. श्री महालक्ष्मीदेवीने त्याचा वध केला. कोल्हासुराच्या अंतिम समयीच्या विनंतीनुसार या क्षेत्राचे नाव ‘कोल्हापूर’ करण्याचे आणि याच ठिकाणी वास्तव्य करण्याचे श्री महालक्ष्मीदेवीने मान्य केले.

२. स्थानमाहात्म्य : साडेतीन शक्तीपिठांपैकी एक

कोलापुरं महास्थानं यत्र लक्ष्मी सदा स्थिता ।
मातुःपुरं द्वितीयं च रेणुकाधिष्ठितं परम् ।
तुलजापुरं तृतीयं स्यात् सप्तशृंगं तथैव च ।।

– देवीभागवत, स्कन्ध ७, अध्याय ३८, श्लोक ५

अर्थ : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी पहिले पीठ कोलापूर (कोल्हापूर) हे असून येथे श्री महालक्ष्मी-देवीचा सदैव वास असतो. भगवान परशुरामांची आई रेणुकामातेचे अधिष्ठान असलेले मातापूर (माहूरगड) हे दुसरे शक्तीपीठ आहे. तुळजापूर हे तिसरे पीठ असून सप्तशृंग (वणी) हे अर्धपीठ आहे.

देवीभागवताप्रमाणेच पद्मपुराण, स्कंदपुराण आदी पुराणांतही करवीर शक्तीपिठाचा उल्लेख आढळतो. पद्मपुराणात ‘श्री करवीर माहात्म्य’ असून त्यात नैमिषारण्यात अनेक ऋषींनी सूतांना विचारलेल्या प्रश्नोत्तरांचा सारांश दिला आहे. करवीर नावाचे हे क्षेत्र १०८ कल्पांचे (४,३२,००,००,००० मानवी वर्षे म्हणजे १ कल्प) असून त्याला ‘महामातृक' असे म्हणतात. येथे श्रीविष्णु श्री महालक्ष्मीदेवीच्या रूपाने वास करतात. या करवीर नगरीला ‘दक्षिण काशी’ असेही म्हटले जाते.

३. देवळाची रचना

विविध शीलालेख, कागदपत्रे आणि ऐतिहासिक पुरावे यांच्या आधारे श्री महालक्ष्मीदेवीचे देऊळ अती प्राचीन आहे, हे सिद्ध होते. सध्याच्या देवळाचा मुख्य भाग हा सहाव्या-सातव्या शतकातील असल्याचा पुरावा मिळतो. नवव्या शतकात राजा गंडवादिक्ष याने या देवळाचा विस्तार केला. वर्ष १२१८ मध्ये यादव राजा तोलम याने महाद्वार बांधले. हे देऊळ हेमाडपंथी बांधणीचे आहे. देवळाला ५ शिखरे असून देवळाच्या आवारात ७ दीपमाळा आणि ५ प्रमुख देवळे आहेत. देवळाला जोडून एक सभामंडप असून त्याला ‘गरुडमंडप’ असे संबोधले जाते.

देवळाच्या रचनेचे एक अनोखे वैशिष्ट्य

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती पश्चिमाभिमुख आहे. देवालयाच्या रचनेचे वैशिष्ट्य म्हणजे पश्चिमेच्या दिशेने असलेल्या गवाक्षातून (खिडकीतून) प्रत्येक वर्षी दोनदा अस्ताचलास जाणार्‍या सूर्यदेवाचे किरण देवीच्या मूर्तीवर पडतात. या अपूर्व सोहळ्याला ‘किरणोत्सव' म्हणतात. हा सोहळा तीन दिवस असतो. प्रत्येक वर्षी ठराविक दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीवर पडणे, हा हिंदु स्थापत्यकलेचा हा एक अनोखा आविष्कार आहे.

४. मूर्ती

श्री महालक्ष्मीदेवीची मूर्ती वालुकामय हिरकखंडमिश्रित रत्नशीलेची बनवलेली आहे. मस्तकी मुकुट धारण केलेल्या देवीच्या मूर्तीची उंची ३ फूट असून तिचे वजन ४० किलोग्रॅम आहे. मूर्तीच्या पाठीमागे समोर तोंड करून सिंह उभा आहे, तर मूर्तीवर शेषनागाने छाया धरली आहे. मूर्ती चतुर्भुज असून देवीने वरील हातांत गदा आणि खेटक (ढाल), तसेच खालच्या उजव्या हातात मातुलिंग (म्हाळुंग), तर डाव्या हातात भवरोगहारक ज्ञानामृताने भरलेले पानपात्र धारण केले आहे.

५. देवीच्या देवळात करावयाच्या काही नेहमीच्या धार्मिक कृती

अ. कुंकुमार्चन : देवीचा नामजप करत एक-एक चिमूट कुंकू देवीच्या चरणांपासून डोक्यापर्यंत वहात यावे किंवा देवीला कुंकवाने स्नान घालावे. काही ठिकाणी कुंकुमार्चनात कुंकू केवळ चरणांवर वहातात.

आ. देवीची ओटी भरणे : ताट (शक्यतो पितळेचे), तांदूळ, सुती/रेशमी साडी (शक्यतो नऊवारी साडी), खण आणि शेंडी असलेला नारळ. तसेच हळद-कुंकू, फूल, वेणी असे साहित्यही इच्छेनुसार घ्यावे.

६. श्री महालक्ष्मी देवस्थानातील काही महत्त्वाचे उत्सव

अ. पालखी प्रदक्षिणा : प्रत्येक शुक्रवारी रात्री देवीला पालखीत बसवून देवळाच्या आवारात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. अशीच पालखी प्रदक्षिणा आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ या पाच मासांतील (महिन्यांतील) पौर्णिमेला निघते.

आ. गंधलेपन पूजा : चैत्र मासात वसंतपंचमीच्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची गंधलेपन पूजा बांधली जाते.

इ. रथोत्सव : प्रतिवर्षी चैत्र कृष्ण प्रतिपदेला श्री महालक्ष्मीदेवीचा रथोत्सव साजरा केला जातो. या वेळी देवीला रथात बसवून तिची मिरवणूक काढली जाते.

ई. अलंकार पूजा : वैशाख मासात येणार्‍या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सायंकाळी देवीला झोपाळ्यावर बसवून तिची भरजरी वस्त्रे आणि रत्नजडित अलंकारांनी युक्त अशी अलंकार पूजा बांधली जाते. झोपाळ्यास झोके दिले जातात.

उ. शारदीय नवरात्रोत्सव : आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत श्री महालक्ष्मीदेवीचा नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. दसर्‍याच्या दिवशी शिलंगणासाठी (सीमोल्लंघनासाठी) देवीची पालखी निघते.

ऊ. महाप्रसाद : आश्विन पौर्णिमा हा श्री महालक्ष्मीदेवीच्या महाप्रसादाचा दिवस.

ए. दीपोत्सव : हा सोहळा दीपावलीच्या दिवसापासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत असतो. या पंधरा दिवसांत प्रतिदिन देवीला दुग्धस्नान घालतात.

ऐ. किरणोत्सव : प्रतिवर्षी कार्तिक मासात साधारणपणे ९, १० आणि ११ नोव्हेंबर असे तीन दिवस, तसेच माघ मासात ३१ जानेवारी, १ आणि २ फेब्रुवारी असे तीन दिवस देवीचा किरणोत्सव साजरा होतो. पहिल्या दिवशी सूर्यदेवाचे किरण देवीच्या चरणांना स्पर्श करतात. दुसर्‍या दिवशी सूर्याचे किरण देवीच्या मध्यभागावर येतात आणि तिसर्‍या दिवशी ते देवीच्या मुखमंडलासह संपूर्ण मूर्तीला प्रकाशात न्हाऊन काढतात.

किरणोत्सवाच्या प्रसंगी देवीची सालंकृत पूजा केलेली असते. सूर्यकिरणांनी मूर्तीला स्पर्श करण्याच्या आधी सर्व विद्युत दीप मालवून गाभार्‍यात केवळ दोन समया तेवत ठेवल्या जातात. काही मिनिटांनंतर सूर्यकिरण गेल्यावर देवीची कर्पूरारती, तसेच देवळात घंटानाद केला जातो.

सविस्तर माहितीसाठी वाचा सनातन-निर्मित ग्रंथ : करवीरनिवासिनी श्री महालक्ष्मीदेवी (उपासनेमागील शास्त्र आणि उत्सव)

Leave a Comment