परळी वैजनाथ


भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ २४ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर हे ठकाण आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात असून येथून जवळच औष्णिक विद्युत केंद्र आहे.

Leave a Comment