‘२१ ऑगस्ट १९०७ ! जर्मनीतील स्टुटगार्ट या शहरी आंतरराष्ट्र्रीय समाजवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी जगातून १ सहस्र प्रतिनिधी तेथे आले होते. हिंदुस्थानच्या प्रतिनिधीची वेळ येताच राजघराण्यातील वाटणारी आणि प्रचंड आत्मविश्वास असलेली एक प्रौढ स्त्री व्यासपिठावर आली. तिने ठराव मांडला, ‘हिंदुस्थानातील ब्रिटीश राज्य आहे तसेच पुढे चालू रहाणे, हे हिंदी लोकांच्या खर्याखुर्या हिताला अत्यंत बाधक आणि नितांत घातक आहे. आदर्श सामाजिक व्यवस्थेच्या दृष्टीने कोणत्याही लोकांवर हुकूमशाही किंवा जुलमी स्वरूपाचे सरकार असता कामा नये; म्हणून जगातील स्वातंत्र्याच्या सगळ्या कैवार्यांनी त्या गांजलेल्या देशात रहाणार्या सर्व मानवी लोकसंख्येच्या एक पंचमाश लोकांना पारतंत्र्यातून मुक्त करण्याच्या कार्यात साहाय्य दिले पाहिजे !’ हा ठराव मांडल्यावर तिने आपल्या पोलक्यातून आणलेला हिंदुस्थानचा तिरंगी ध्वज दिमाखाने तेथे फडकावला. खणखणीत आवाजात इंग्रजीत ती म्हणाली, ‘‘हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ध्वज आहे. पहा, पहा ! आता त्याचा जन्म झाला आहे. सभ्य गृहस्थहो, मी तुम्हाला आवाहन करते की, उठा आणि या ध्वजाला प्रणाम करा !’’ या नाट्यपूर्ण घटनेने चकित झालेले सर्व प्रतिनिधी उभे राहिले आणि त्यांनी हिंदुस्थानच्या पहिल्या स्वतंत्र राष्ट्र्रध्वजाला प्रणामकेला ! कोण होती ही वीरांगना ? या वीरांगनेचे नाव होते, मॅडम भिकाईजी रुस्तुम कामा !
१. मदनलाल धिंग्रा यांच्या स्मरणार्थ ‘मदन तलवार’ नियतकालिक चालू करणे
मॅडम कामा यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान थक्क करणारे आहे. मदनलाल धिंग्रा यांनी कर्झन वायलीचा वध केल्यावर मॅडम कामा यांनी सप्टेंबर १९०९ मध्ये मदनलाल यांच्या स्मरणार्थ ‘मदन तलवार’ नावाचे एक नियतकालिक चालू केले.
२. मार्सेलिस येथील सावरकरांच्या बेकायदाअटकेचे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणे
सावरकर पॅरिसहून लंडनला जातांना त्यांना जॅक्सन वधाच्या प्रकरणात व्हिक्टोरिया स्थानकावर अटक करण्यात आली आणि न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना हिंदुस्थानात पाठवण्याचे ठरले. सावरकरांना घेऊन जाणारी ‘मोरिया’ बोट मार्सेलिस बंदरात येऊन पोहोचली. हे कळताच मॅडम कामा मोटारीने पॅरिसहून मार्सेलिसला आल्या. सावरकरांना पकडून परत बोटीवर नेल्याच्या घटनेनंतर १०-१५ मिनिटांनी त्या तेथे जाऊन पोहोचल्या. तेथे उडालेल्या खळबळीमुळेे चौकशी करताच लोकांकडून तो प्रकार त्यांना समजला. त्यांना खूप दुःख झाले; पण त्या स्वस्थ बसल्या नाहीत. मार्सेलिसचे महापौर जां जोरे यांना त्यांनी ही घटना सांगितली. ‘ब्रिटीश पोलिसांनी फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना केलेली अटक, हा फ्रान्सचा अपमान आहे’, हे त्यांनी जोरे यांना सांगितले आणि स्वतः ते वृत्त पॅरिसच्या ‘ल ताँ’ या वर्तमानपत्राला पाठवले. या वृत्ताच्या प्रसिद्धीमुळे सावरकरांची अवैध अटक सार्या जगभर गाजली आणि ब्रिटीश सरकारवर नामुष्कीची पाळी आली. या सर्व कृतीमध्ये कामाबाईंची धडक, धैर्य आणि देशभक्ती यांची विशुद्धताही दिसून येते.
३. नारायणराव सावरकरांना शिक्षणासाठी साहाय्य करणे
३० जानेवारी १९११ या दिवशी सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. त्या वेळी त्यांच्या धाकट्या भावाला म्हणजे नारायणराव सावरकर यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी कामाबाईंनी आर्थिक साहाय्य केले.
४. विदेशातील हिंदुस्थानी सैनिकांत देशभक्ती रूजवणे
पहिल्या महायुद्धाच्या वेळी कामाबाई मार्सेलिसमधील सैनिकी शिबिरांना भेट देत आणि तेथील हिंदुस्थानी सैनिकांना विचारत, ‘ज्यांनी तुमच्या हिंदमातेला दास्यात टाकले आहे, त्यांच्यासाठी तुम्ही लढणार ?’ या युद्धात फ्रान्स हे इंग्लंडचे मित्रराष्ट्र्र होते; म्हणून कामाबाईंवर ‘त्यांनी पॅरिसच्या बाहेर रहावे आणि आठवड्यातून एकदा पोलिसांसमोर हजेरी द्यावी’, अशी बंधनेही घालण्यात आली; पण त्या डगमगल्या नाहीत.’
५. हिंदुस्थानात परतण्याची ओढ
युद्धसमाप्तीनंतर कामाबाई पॅरिसला परतल्या. मायभूमीकडे परतण्याची त्यांची ओढ खूपच तीव्र झाली. फार मिनतवारीने आणि स्वातंत्र्यलढ्यात भाग न घेण्याच्या अटीवर वर्ष १९३५ मध्ये, म्हणजे ३४ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर त्यांना हिंदुस्थानात यायची अनुमती मिळाली. त्या मुंबईस आल्या; पण फार काळ जगल्या नाहीत. १२ ऑगस्ट १९३६ ला त्यांची जीवनज्योत मालवली. कामाबाईंचे कोठेही स्मारक झाले नाही; परंतु हिंदुस्थान स्वतंत्र होण्यासाठीं कामाबाईंनी केलेला सर्वस्वाचा होम, प्रदीर्घ काळापर्यंत त्यांनी परदेशात भोगलेल्या हालअपेष्टा विस्मृतीत जाता कामा नयेत. राष्ट्र्राने त्यांचा उचित सन्मान केला पाहिजे.’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात