५ जुलै या दिवशी असलेल्या आझाद हिंद सेनेच्या ७४ व्या स्थापनादिनाच्या निमित्ताने…
आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस हे जहालमतवादी होते. इंग्रजांना धडा शिकवण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अखेरच्या लढाईचे नेतृत्व करण्याचे कार्य नियतीने नेताजींच्या हाती सोपवले. नेताजींनी हे पवित्र कार्य असीम साहस आणि तन, मन, धन यांचा त्याग केलेल्या हिंदी सैनिकांच्या ‘आझाद हिंदसेना’ या संघटनेद्वारे पार पाडले. या संघटनेचा अल्पसा परिचय !
लेखक : श्री. सुधाकर पाटील
१. ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिकांचे नेताजींकडून संघटन !
‘इंग्रजांच्या नजरकैदेतून पळ काढल्यानंतर सुभाषबाबू यांनी फेब्रुवारी १९४३ पर्यंत जर्मनीतच वास्तव्य केले. त्यांनी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरशी अनेक भेटी घेऊन त्यांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी साहाय्याचे आवाहन केले. दुसर्या महायुद्धात विजयी घोडदौड मारणार्या हिटलरने बोस यांना सर्व सहकार्य देऊ केले. त्यानुसार त्यांनी जर्मनीला शरण आलेल्या इंग्रजांच्या सैन्यातील हिंदी सैनिकांचे प्रबोधन करून त्यांचे संघटन केले. सुभाषचंद्र बोस यांच्या येथील भाषणाने हिंदी सैनिक भारावून जात आणि स्वातंत्र्यासाठी प्रतिज्ञाबद्ध होते.
२. आझाद हिंद सेनेची स्थापना आणि ‘चलो दिल्ली’चा नारा !
पूर्वेकडील आशियाई देशांत जर्मनीचे मित्रराष्ट्र असलेल्या जपानची सेना ब्रिटीश सैन्याची धूळधाण उडवत होती. त्यांच्याकडेही शरण आलेले ब्रिटीश सैन्यातील हिंदी सैनिक होतेे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मार्गदर्शनानुसार तेथे अगोदरपासून वास्तव्य करून असलेल्या रासबिहारी बोस यांनी या हिंदी सैन्यांचे संघटन केले. या हिंदी सैन्याची भेट घेण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस ९० दिवसांच्या पाणबुडीतील प्रवासात मृत्यूशी झुंज देत जुलै १९४३ रोजी जपानच्या राजधानी टोकियो येथे पोहोचले. रासबिहारी बोस यांनी या सैन्याचे नेतृत्व नेताजींकडे सोपवले आणि ५ जुलै १९४३ ला सिंगापूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. त्या वेळी सहस्त्रो सैनिकांसमोर ऐतिहासिक भाषण करतांना ते म्हणाले, ‘‘मित्रहो, सैनिकहो! तुमची युद्धघोषणा एकच असू द्या ! चलो दिल्ली ! आपणापैकी कितीजण या स्वातंत्र्ययुद्धात व्यक्तीशः जिवंत रहातील, ते मला माहीत नाही; पण मला हे माहीत आहे की, शेवटी विजय आपलाच होईल. तेव्हा उठा आणि आपली शस्त्रास्त्रे हाती घ्या. त्या भारतात तुमच्यासमोर तुमच्या आधीच्या क्रांतीकारकांनी रस्ता तयार करून ठेवला आहे आणि शेवटी तोच रस्ता आपल्याला दिल्लीकडे घेऊन जाणार आहे….चलो दिल्ली.’’
३. भारताच्या हंगामी सरकारचे प्रमुख लष्कर म्हणून कार्यान्वित !
सहस्त्रो सशस्त्र हिंदी सैनिकांची फौज तयार झाल्यावर आणि पूर्व आशियाई देशातील लाखो हिंदी जनतेचा भारतीय स्वातंत्र्याला पाठिंबा मिळवल्यावर नेताजींनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचे दुसरे हंगामी सरकार स्थापन केले. या हंगामी सरकारला जपान, जर्मनी, चीन, इटली, ब्रह्मदेश इत्यादी देशांनी त्यांची मान्यता घोषित केली. या हंगामी सरकारचे आझाद हिंद सेना, हे प्रमुख लष्कर बनले !
आझाद हिंद सेनेत सर्व जाती-जमाती, निरनिराळ्या प्रांतांचे, वेगवेगळ्या भाषांचे सैनिक होते. सेनेत एकात्मतेची भावना होती. ‘कदम कदम बढाए जा’, या गीताशी समरस होऊन नेताजी आणि त्यांचे लष्कर यांनी आझाद हिंदुस्थानचे स्वप्न साकारण्यासाठी विजयी घोडदौड सुरु केली.
४. राणी ऑफ झांशी रेजिमेंट’ची स्थापना !
नेताजींनी झांशीची राणी रेजिमेंटच्या धर्तीवर महिलांसाठी ‘राणी ऑफ झांशी रेजिमेंट’ची स्थापना केली. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी देखील लष्करी प्रशिक्षण घेतले पाहिजे, अशी खंबीर भूमिका त्यांनी घेतली. नेताजी सांगत, ‘हिंदुस्थानात वर्ष १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात लढलेल्या झांशीच्या राणीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून महिलांनीही स्वातंत्र्यलढ्यात उतरून हिंदुस्थान स्वतंत्र करण्याच्या पवित्र कार्यात योगदान दिले पाहिजे’.
५. आझाद हिंद सेनेची मुसंडी !
आझाद हिंद सेनेचा ब्रिटीश सत्तेच्या विरोधात लष्करी उठाव सुरू होताच जपानचे सत्ताधीश जनरल टोजो यांनी इंग्लंडकडून जिंकलेली अंदमान व निकोबार ही दोन बेटे आझाद हिंद सेनेच्या हाती सुपूर्द केली. २९ डिसेंबर १९४३ रोजी स्वतंत्र हिंदुस्थानचे प्रमुख म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी अंदमानला भेट दिली आणि आपला स्वतंत्र ध्वज तिथे फडकवून सेल्युलर तुरंगात शिक्षा भोगलेल्या क्रांतीकारकांना आदरांजली वाहिली.
जानेवारी १९४४ मध्ये नेताजींनी त्यांची सशस्त्र सेना ब्रह्मदेशात हालवली. १९ मार्च १९४४ च्या ऐतिहासिक दिवशी आझाद हिंंद सेनेने भारताच्या भूमीत प्रवेश केला. इंफाळ, कोहिमा इत्यादी ठिकाणी या सेनेने ब्रिटीश फौजांवर विजय मिळवला. या विजयानिमित्त, २२ सप्टेंबर १९४४ ला केलेल्या भाषणात नेताजी गरजले, ‘‘आपली मातृभूमी स्वातंत्र्याचा शोध करत आहे ! त्यासाठी मी आज तुमच्याकडे रक्ताची मागणी करत आहे. फक्त रक्तामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळेल. तुम्ही मला तुमचे रक्त द्या. मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन! ’’ (‘‘दिल्ली के लाल किलेपर तिरंगा लहराने के लिए तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा’’) हे भाषण इतिहासात अजरामर झाले. त्यांच्या या हृदय हेलावून टाकणार्या उद्गारांनी उपस्थित हिंदी तरुणांची मने रोमांचित झाली आणि त्यांनी आपल्या प्रतिज्ञा रक्ताच्या शाईने लिहून काढल्या.
६. ‘चलो दिल्ली’चे स्वप्न अधुरे; पण ब्रिटिशांना हादरवले !
मार्च १९४५ पासून मित्रराष्ट्रांपुढे जपानची पीछेहाट होऊ लागली. ७ मे १९४५ ला जर्मनीने विनाअट शरणांगती पत्करली तर जपानने १५ ऑगस्ट या दिवशी शरणागतीची अधिकृत घोषणा केली. जपान-जर्मनीच्या या अनपेक्षित पराभवाने सुभाषचंद्रांच्या सर्व आशा मावळल्या. पुढील रणक्षेत्रासाठी सयामला जात असतांनाच १८ ऑगस्ट १९४५ रोजी फार्मोसा बेटावर त्यांचे बॉम्बर विमान कोसळून त्यांचा हदयद्रावक अंत झाला. आझाद हिंद सेनेच्या फौजा दिल्लीपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत, तरी त्या सेनेने जे प्रचंड आव्हान ब्रिटीश साम्राज्यशाहीसमोर उभे केले, त्याला इतिहासात तोड नाही. त्यामुळे ब्रिटीश सत्ता हादरली. भारतावर पुढे सत्ता गाजवणे कठीण जाईल, याची कल्पना इंग्रजांना आली. चाणाक्ष आणि धूर्त इंग्रज सरकारने भावी संकट ओळखल. पुढील मानहानी पत्करण्यापेक्षा हा देश सोडून जाण्याचा निर्णय इंग्रजांनी घेतला, अशी कबुली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधानांनी दिली होती.
७. ब्रिटिशांनी धास्ती घेतली आणि नेहरूही नमले !
स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणार्या नेताजींच्या आझाद हिंद सेनेला संपूर्ण भारतवासियांचाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला होता. त्याचा प्रत्यय जेव्हा इंग्रज सरकारने या आझाद हिंद सेनेच्या सेनाधिकार्यांवर दिल्लीच्या लाल किल्ल्यात इंग्लंडच्या राजाच्या विरुद्ध युद्ध पुकारल्याच्या आरोपावरून खटला चालवला, तेव्हा प्रकर्षाने आला. नेताजींनी ब्रिटीश-भारतावर सशस्त्र आक्रमण करण्याची घोषणा केली, तेव्हा पंडित नेहरू यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. परंतु नेताजींच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जेव्हा आझाद हिंद सेनेच्या अधिकार्यांवर वरील खटला दिल्लीत उभा राहिला, तेव्हा संपूर्ण देशातून त्यांच्या बाजूने लोकमत प्रकट झाले. आझाद हिंद सेनेची ही लोकप्रियता पाहून अखेर नेहरूंनी त्यांची भूमिका पालटली आणि स्वतः सेनेच्या अधिकार्यांचे वकीलपत्र घेतले. शेवटी आरोप ठेवलेले आझाद हिंद सेनेचे तिन्ही सेनाधिकारी लष्करी न्यायालयापुढे दोषी ठरले. तरीही त्यांची शिक्षा माफ करण्यात आली; कारण इंग्रज सत्ताधिशांना कळून चुकले होते की, नेताजींच्या सहकार्यांना शिक्षा केली, तर ९० वर्षांत कधीही पाहिला मिळाला नव्हता, असा लोकक्षोभ उफाळून येईल. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांच्या निस्वार्थ देशसेवेमुळे एवढी स्वातंत्र्यकांक्षा कोट्यवधी देशवासियांच्या मनात निर्माण केली होती.’
(संदर्भ : ‘झुंज क्रांतीवीरांची : स्वातंत्र्यलढ्याचा सशस्त्र इतिहास’)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात