२४ जुलै या दिवशी असलेल्या गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने…
‘गुरुदेवांच्या शब्दाशब्दांतून जाणवणारी ज्वलंत धर्मनिष्ठा आणि सनातन धर्म पुनर्प्रतिष्ठापनेसाठीची त्यांची कमालीची अधीरता, ही साक्षात् देवांनाही दिपवून टाकील.’ – (‘घनगर्जित’, जानेवारी २०१२)
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्याविषयी संक्षिप्त माहिती !
हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सांगणार्या आणि धर्मरक्षणासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लेखणी झिजवणार्या मोजक्या संतांपैकी एक म्हणजे वडाळा महादेव (जिल्हा नगर, महाराष्ट्र) येथील गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !
गुरुदेव डॉ. नारायणानंदनाथ काटेस्वामीजी हे उत्तरप्रदेशातील महान संत धर्मसम्राट करपात्री स्वामीजी यांचे शिष्य ! गुरुदेवांनी पुणे विद्यापिठातून ‘डॉक्टरेट’ची पदवी घेतली होती. त्यांनी जीवनातील बहुतांश काळ हा हिमालयात व्यतीत केला. तेथे त्यांनी कठोर तपश्चर्या आणि योगसाधना केली. आध्यात्मिक आणि धार्मिक साहित्य लिहिणे, हा त्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग होता. गुरुदेवांनी धर्मजागृती आणि समाजकल्याण यांसाठी भारतभर भ्रमण केले.
सनातन धर्मातील मूल्ये आणि आध्यात्मिक विचारधन संपूर्ण विश्वात प्रसृत करण्यासाठी जीवनभर अथक परिश्रम घेतले. गुरुदेव यांच्या चमत्कारिक नि आध्यात्मिक व्यक्तीमत्त्वाच्या सान्निध्यात येणार्या व्यक्तीत अल्पावधीतच प्रचंड पालट होत असत. त्यांच्यामधील विस्मयकारक शक्तीमुळे भटकलेल्या आत्म्यांना ईश्वरी चैतन्याची अनुभूती येत.
महाराष्ट्राच्या नगर जिल्ह्यात असलेल्या श्रीरामपूर शहरापासून ७-८ किमी अंतरावर वसलेले निसर्गरम्य असे वडाळा महादेव हे गांव ! महादेवाचे अतिप्राचीन हेमाडपंथी देवस्थान असलेले हे वडाळा गाव. या पवित्र गावातच गुरुदेवांचा चैतन्यमय आश्रम वसला आहे.
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांची सनातनवर असलेली कृपादृष्टी !
सनातनच्या पाठीशी सदैव उभे राहून त्यांना आध्यात्मिक आधार प्रदान करणारे महायोगी गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या चरणी सनातन परिवार सदैव कृतज्ञ राहील !
- वर्ष २००४ मध्ये सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांची गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्याशी पहिली भेट झाली. त्या भेटीनंतरच्या पौर्णिमेपासून देहत्यागापर्यंत गुरुदेव प्रतिदिन परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सनातनचे साधक यांच्यासाठी ११ आहुत्या देत होते.
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टाळण्यासाठी आणि सनातनच्या धर्मप्रसारकार्यातील अडथळे दूर होण्यासाठी त्यांनी देहत्यागापर्यंत अर्थात् डिसेंबर २०१० पर्यंत वेळोवेळी जप, हवन, सप्तशतीपाठ इत्यादी केले.
- सनातनवरील आरिष्ट टाळण्यासाठी गुरुदेवांनी सांगितले, ‘‘मीच काय ते करतो’’ आणि त्यांनी लगेचच अनुष्ठान चालू केले.
- राष्ट्र अन् धर्म यांविषयीचे त्यांचे विपुल ओजस्वी लिखाण त्यांनी सनातनला सदासाठीच उपलब्ध करून दिले आहे. हे लिखाण त्यांच्या अनेक वर्षांच्या तपश्चर्येने समृद्ध आणि पुढील अनेक पिढ्यांना आदर्श जीवन जगण्यासाठी उपयोगी असे आहे.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कार्यात विविध संतांचा सहभाग’)
गुरुदेवांच्या कल्पनेतील वैदिक शासन भारतवर्षात पुनःश्च अवतरावे !
गुरुदेवांचे कार्य न संपणारे, नित्यनूतनता बहाल करणारे, सनातन मूल्यांना जपणारे आणि जोपासणारे आहे. गुरुदेवांचे कार्य आता निर्गुण चैतन्याच्या स्तरावर अधिक वेगाने होत आहेच. ‘गुरुदेवांच्या निर्गुण चैतन्याचा लाभ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्हा सर्वांना व्हावा आणि त्यांच्या कल्पनेतील वैदिक शासन या भारतवर्षात पुनःश्च अवतरावे’, हीच भगवान श्रीकृष्णाच्या चरणी सनातन परिवाराच्या वतीने प्रार्थना !
– (परात्पर गुरु) डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था. (साप्ताहिक ‘सनातन चिंतन’)
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींचेे साहित्य म्हणजे साक्षात् भगवंताचे प्रकटीकरण !
गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांनी लिहिलेले साहित्य !
१. त्यांचे साहित्य म्हणजे नेत्रहीनाची दृष्टी, पांगळ्याचे पाय आणि दुर्बलाची शक्ती आहे.
२. या साहित्यामुळे अज्ञानी ज्ञानवंत होतो, भित्रा शूरवीर होतो आणि मरणारा अमर होतो.
३. संरक्षणाची आवश्यकता असणार्यांना कल्पवृक्षाप्रमाणे साहाय्य करते.
४. वेदना आणि व्यथा यांचा अग्नी शमवणारी पावसाची धार आहे.
५. मनुष्यातील कुटीलता नष्ट होऊन चांगले विचार निर्माण होतात.
६. त्यातील अंगभूत दिव्य तेज माणसाचे हृदय उजळून टाकते.’
७. मानवजातीसाठी ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.
८. ते मनुष्यातील सुप्त शक्ती जागृत करते.
– (पू.) श्री. भास्कर (गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे उत्तराधिकारी)
हिंदूंना ज्वलंत पुरुषार्थी बनवणारे आणि खरेखुरे सारस्वत गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी !
‘गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांच्या समग्र साहित्याचा विचार केला, तर ते साहित्यिकांचे साहित्यिक होते. त्यांच्या साहित्यातील एकही ओळ अशी दाखवता येणार नाही की, जिला राष्ट्र किंवा धर्म यांचा सुगंध येत नाही !
पौराणिक वा आधुनिक कथा लिहाव्यात, तर काटेस्वामीजींनीच, गांधी-नेहरूंचे वाभाडे काढावेत, तर तेही त्यांनीच, पाखंडाचे खंडण करावे, तर गुरुदेव हवेतच आणि धर्मशास्त्राचे सुगम भाषेत विवेचन करायचे झाले, तर त्यांच्याविना पर्यायच नाही !
…म्हणूनच ते खरेखुरे सारस्वत होते.’
(साप्ताहिक ‘सनातन चिंतन’,२८.७.२०११)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात