Menu Close

देवशिल्पी विश्‍वकर्मा यांनी दीड लाख वर्षांपूर्वी निर्माण केलेले औरंगाबाद (बिहार) येथील देव सूर्य मंदिर !

२४ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत चालू असलेल्या छठ पर्वाच्या निमित्ताने…

देव सूर्य मंदिर

उत्तर भारतात मोठ्या उत्साहात साजरी होणारी छठ पूजा अथवा छठ पर्वास आरंभ झाला असून आज अर्थात् कार्तिक शुक्ल पक्ष षष्ठी या तिथीला (२६ ऑक्टोबरला) मुख्य पूजा असते. या पर्वात लक्षावधी हिंदू सूर्यदेवाची अत्यंत मनोभावे पूजा करतात.

बिहार राज्यात औरंगाबाद येथे असलेले देव सूर्य मंदिर वैशिष्ट्यपूर्ण मंदिर आहे. साक्षात् विश्‍वकर्म्याने एका रात्रीत हे मंदिर उभारले असल्याचे मानले जाते. या मंदिराचे प्रवेशद्वार पश्‍चिम दिशेला आहे. पश्‍चिम दिशेला प्रवेशद्वार असलेले हे मंदिर भारतातील एकमेव सूर्यदेव मंदिर आहे. मंदिर निर्मितीच्या कालखंडाचा स्पष्ट उल्लेख कुठेही आढळून येत नाही; मात्र मंदिराची निर्मिती दीड लाख वर्षांपूर्वी झाली, असे मानले जाते. छठ पर्वाच्या निमित्ताने लक्षावधी भाविक येथे सूर्यदेवाची पूजा करण्यासाठी येतात.

१. मंदिराची अद्वितीय वैशिष्ट्ये

त्रेतायुगातील ऐतिहासिक पश्‍चिमाभिमुख असे हे मंदिर त्याच्या कलात्मक भव्यतेसह इतिहासामुळेही प्रसिद्ध आहे. औरंगाबादपासून १८ किलोमीटर अंतरावर देव या ठिकाणी १०० फूट उंचीचे हे मंदिर आहे. काळ्या आणि तांबड्या रंगाच्या दगडांनी मंदिराचे बांधकाम केलेले असून ओडिशा येथील जगन्नाथ मंदिराप्रमाणे या मंदिराची रचना आहे. मंदिराबाहेर मंदिराच्या निर्माणकाळाशी संबंधित एक शिलालेख आहे. त्यावर ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेल्या आणि संस्कृत भाषेमध्ये अनुवाद केेलेल्या श्‍लोकानुसार त्रेतायुगाच्या समाप्तीनंतर इलापुत्र पुरुरवा ऐलने मंदिराच्या उभारणीला आरंभ केला. शिलालेखावरून लक्षात येते की, या प्राचीन मंदिराचे निर्माण होऊन १ लाख ५० सहस्र १७ वर्षे झाली आहेत.

२. मंदिराचा इतिहास

मंदिराच्या स्थापनेमागील गोष्ट अशी की, ऐल नावाचा राजा एकदा जंगलात शिकार करण्यासाठी गेला होता. त्या वेळी त्याला तहान लागली. त्याने सेवेकर्‍याला लोटा भरून पाणी आणण्यास सांगितले. सेवेकर्‍याने एका खड्ड्यातील पाणी राजाला आणून दिले. राजाच्या हाताला ज्या ज्या ठिकाणी त्या पाण्याचा स्पर्श झाला, त्या त्या ठिकाणी त्याला झालेला कुष्ठरोग बरा झाला. राजाला हे लक्षात आल्यावर राजाने त्या खड्डयातील पाण्याने स्नान केले, तेव्हा त्याच्या शरिरावरील सर्व कुष्ठरोग बरा झाला. त्या रात्री राजाला झोपेत एक स्वप्न पडले. त्यात ज्या खड्डयातील पाण्याने राजाने स्नान केले होते, त्या पाण्यात ३ मूर्ती असल्याचे राजाला दिसले. दुसर्‍या दिवशी राजाने त्या तीन मूर्ती बाहेर काढून त्यांची मंदिरात स्थापना केली.

३. भारताचा अद्वितीय वारसा असलेले देव सूर्य मंदिर !

देव मंदिरात सात रथांमध्ये भगवान सूर्यदेव यांची उदयाचल (उगवता सूर्य), मध्याचल (मध्यान्हच्या वेळीचा सूर्य) आणि अस्ताचल (मावळता सूर्य) अशा ३ रूपांतील दगडी मूर्ती आहे. १०० फूट उंचीचे हे मंदिर स्थापत्य आणि वास्तुकला यांचे अद्भुत् उदाहरण आहे. मंदिराच्या बांधकामात दोन दगड जोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा चुना किंवा अन्य रसायन यांचा वापर झालेला नाही. तरीही आयत, चौरस, षट्कोन, गोल, त्रिकोणी असे अनेक प्रकारांचे दगड एकमेकांना जोडलेले आहेत. त्यामुळे हे मंदिर आकर्षक आणि विस्मयकारी आहे. हे मंदिर भारताचा अद्वितीय वारसा आहे.

४. सूर्यदेवाच्या मूर्तींचे प्रतिवर्षी लक्षावधी भाविक दर्शन घेतात !

प्रतिवर्षी छठ पर्वात झारखंड, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि अन्य राज्यांतून लक्षावधी श्रद्धाळू भाविक छठपूजा करण्यासाठी येथे येतात. जो भक्त मंदिरात भगवान सूर्यदेवाची पूजा करतो, त्याची इच्छा पूर्ण होते, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. मनोकामना पूर्ण होण्यासाठी सूर्यदेवाला अर्घ्य दिले जाते.

५. मंदिरातील परंपरा

मंदिराजवळ असलेल्या सूर्यकुंड तलावाला विशेष महत्त्व आहे. या सूर्यकुंडात स्नान केल्यानंतर व्रतस्थ भाविक सूर्याची पूजा करतात. मंदिराचे मुख्य पुजारी सच्चिदानंद पाठक यांनी सांगितले की, प्रतिदिन पहाटे ४ वाजता सूर्यदेवाला घंटी वाजवून उठवले जाते. त्यानंतर मूर्तींना स्नान घालून त्यांच्या कपाळावर चंदनाचे लेपन केले जाते, तसेच नवे वस्त्र घातले जाते. सूर्यदेवाला आदित्यहृदय स्तोत्राचा पाठ ऐकवला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे.

-‘आयएएन्एस्’ संकेतस्थळ

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *