Menu Close

सर्व पुराणांचे आद्यकर्ते एकमेवाद्वितीय महर्षि व्यास !

अनुक्रमणिका

१. महर्षि व्यास यांची विविध नावे

२. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड असणार्‍या व्याससाहित्याचे अलौकिक ग्रंथकार महर्षि व्यास !

३. व्यासचर्या

४. व्यासांचे अमूल्य कार्य

५. महर्षि व्यासांचे महत्त्व

६. श्रीकृष्णाने व्यासांचे केलेले कौतुक


vyas_640

वेदोत्तर कालापासून ते आजतागायत महर्षि व्यास हे भारतीय संस्कृतीचे महाप्राण ठरले आहेत. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे.

१. महर्षि व्यास यांची विविध नावे

व्यास शब्दाची व्युत्पत्ती आहे – ‘विशदं करोति इति व्यासः ।’ म्हणजे विषय विशद करतो तो ‘व्यास’. वर्णाने काळे म्हणून त्यांना ‘कृष्ण’ म्हणत; तर द्वीपात (बेटावर) जन्मले म्हणून ‘द्वैपायन’ म्हणत. ‘कृष्णद्वैपायन’ असेही जोडनाव रूढ आहे. त्यांनी ‘वेदान् विव्यास’ म्हणजे वेदांचे विभाग केले, म्हणून त्यांना ‘व्यास’ असे संबोधीत. पराशरपुत्र म्हणून त्यांना ‘पाराशर्य’ही म्हणत. व्यासांचा उल्लेख करतांना ‘भगवान व्यास’ असे म्हणण्याचा विद्वज्जनांत परिपाठ आहे. श्री शंकराचार्य त्यांना तशाच उपाधीने उल्लेखीत. त्यांना ‘महर्षि’ असेही म्हटले जाते.

२. भारतीय संस्कृतीचा मेरुदंड असणार्‍या व्याससाहित्याचे अलौकिक ग्रंथकार महर्षि व्यास !

‘व्यासोचि्छष्टं जगत्सर्वम् ।’ म्हणजे जगातील सर्व ज्ञान व्यासांनी उष्टे करून सोडले आहे, अशी लोकोक्ती रूढ झाली आहे. जसे वर्तुळाच्या व्यासाने परिघाचे सर्व बिंदू स्पर्शिले जातात, तसाच व्यासांनी सर्व विषयांना स्पर्श केला आहे. केवळ स्पर्शच केला नाही, तर त्यांचे सखोल विवरण केले आहे.’

‘वर्तुळाच्या मध्यबिंदूतून दोन्ही अंगांच्या (बाजूच्या) परिघाला जोडणारी रेषा म्हणजे व्यास. त्याप्रमाणे या सृष्टी (वर्तुळ) चक्राचा विभाजन करणारे ते व्यास. हे दोन्ही अंगांना स्पर्श करतात. ही दोन अंगे म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. असे असूनही ते त्या दोन्हींपासून अलिप्त असतात; म्हणून त्यांना ‘व्यास’, असे म्हणतात.’

– जगद्गुरु श्री शंकराचार्य, करवीरपीठ, कोल्हापूर.

`युगायुगातून एखादीच अशी विभूती जन्माला येते. व्यासांचा जन्म भारतात झाला, ही गोष्ट भारतीय जनतेला अनंत कालपर्यंत अभिमानास्पद राहील. ‘आजवर जगात असा दिव्योदात्त, विद्वान आणि साहित्यकार झाला नाही आणि होणार नाही’, असे म्हटले जाते. आपली संस्कृती व्यासकृत महाभारत आणि पुराणे यांवर आधारलेली आहे. भारतीय संस्कृतीचे सर्वांगांनी यथावत ज्ञान करून घ्यायचे, तर व्यासरचित ग्रंथांचे अध्ययन करणे अपरिहार्य आहे. व्याससाहित्य हा भारतीय संस्कृतीचा मेरुदंड आहे.

३. व्यासचर्या

व्यासरचित आणि व्याससंपादित वेदविभाजन, ब्रह्मसूत्रे, पुराणे आणि महाभारत या ग्रंथांना मिळून होणारी ती ‘व्यासचर्या’.

अ. वेदविभाजन

वेदांचे विषयानुसार विभाजन व्यासांनी केले.

‘चार पाद असलेला असा एकच वेद होता’, असे पुराणांत म्हटले आहे. हे चार पाय म्हणजे चार वेद होत. (अगि्नपुराण, अध्याय १५०, श्लोक २४; श्रीविष्णुपुराण, अंश ३, अध्याय ४, श्लोक १; वायुपुराण, अध्याय १, श्लोक १७९; पद्मपुराण, पातालखण्ड, अध्याय २, श्लोक ४३) वेद एकराशी असल्यामुळे तो अध्ययनाला अवघड होऊ लागला, हे व्यासांना कळून आले. त्यांनी एका वेदराशीचे अध्ययनाच्या सोयीसाठी चार विभाग केले.

१. वेदराशीतील सर्व ऋचा वेगळ्या काढून त्यांच्या संग्रहाला ‘ऋग्वेद’ असे नाव दिले.

२. त्यातीलच गानयोग्य अशा ऋचा वेगळ्या काढून त्यांच्या समूहाला ‘सामवेद’ अशी संज्ञा दिली.

३. यज्ञाविषयी तपशीलवार ज्ञान देणार्‍या गद्यभागाला ‘यजुर्वेद’ म्हणून वेगळे केले.

४. यातुविद्येचे (जादूटोण्याचे) तसेच लौकिक व्यवहारात उपयोजिले जाणारे मंत्र वेगळे करून त्यांचे ‘अथर्ववेद’ हे नामकरण केले. व्यासांचे हे वेदविभाजनाचे कार्य तत्कालीन सर्व आचार्यांनी मान्य केले. यावरून त्यांच्या कार्याचे महत्त्व कळून येते.’

आ. ब्रह्मसूत्रे

महर्षि व्यासांनी लिहिलेल्या ब्रह्मसूत्रांमध्ये उपनिषदांचा अर्थनिर्णय केलला असल्याने वेदान्तात त्यांचाही अंतर्भाव होतो. उपनिषदांमध्ये वेदांचा गूढ अर्थ उलगडून दाखवलेला असल्याने त्यांना वेदान्त अशी संज्ञा प्राप्त झाली.

इ. पुराणे

व्यास पुराणांचे आद्यकर्ते आहेत. यातील भागवतपुराण सर्वांत महत्त्वाचे आहे. ‘पुरा नवं भवति ।’ म्हणजे प्राचीन असूनही जे नवे असते, ते पुराण होय. पुराणांमधील विषयांचे पुढील ५ भागांत वर्गीकरण करण्यात आले आहे –

१. सर्ग,

२. प्रतिसर्ग,

३. मन्वंतर,

४. वंश आणि

५. वंशानुचरित.

ई. महाभारत

भारतीय युद्ध संपून धर्मराजाला राज्याभिषेक झाल्यावर कौरव-पांडवांचा इतिहास ग्रंथनिविष्ट (ग्रंथित) करावा, असे व्यासांनी ठरविले. त्यासाठी तीन वर्षे लेखनोद्योग करून त्यांनी ‘जय’ नावाचा ग्रंथ लिहिला. कौरव-पांडवांच्या जन्मापासून भारतीय युद्धाच्या समाप्तीपर्यंतचा इतिहास या ‘जय’ नामक ग्रंथात आहेत.

पुढे वैशंपायनऋषी यांनी आणि नंतर लौमहर्षणी नामक सूतपुत्राने केलेल्या संस्करणाने या ग्रंथाचे अनुक्रमे आधी ‘भारत’ आणि पुढे एक लक्ष श्लोकसंख्या होऊन ‘महाभारत’ असे नामकरण करण्यात आले.

४. व्यासांचे अमूल्य कार्य

अ. राष्ट्रीय अभ्युत्थानासाठी राजसत्तेला विस्तृत आणि सुयोग्य मार्गदर्शन करणारे

अज्ञात अतीतापासून वर्तमानापर्यंत आणि हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत एक प्रचंड देशकाल व्यासांच्या विशाल दृष्टीपुढे उभा होता. राष्ट्र सुखी, संपन्न आणि सर्वांगी परिवर्धित व्हायचे, तर आधी राज्यातली राजनीती सुरक्षित राहिली पाहिजे. त्यासाठी राजा नीतीमान, चारित्र्यवान, समर्थ आणि सर्वार्थी सावधान असला पाहिजे. जर राजा समर्थ नसेल, तर दुष्ट-दुर्जन सज्जनांना खाऊन टाकतील आणि धर्माची नौका बुडून जाईल. राष्ट्राचा म्हणून एक सामान्य धर्म असतो आणि तो शासनाच्या दक्षतेवर आणि सुव्यवस्थेवर आधारलेला असतो; म्हणून व्यासांनी राजसत्तेला विस्तृत आणि सुयोग्य मार्गदर्शन केले आहे.

आ. इहलोकी कर्मवाद, दैववाद आणि अध्यात्म यांचा संगम साधून धर्माची घडी बसवणारे

‘देशकालपरिस्थितीत व्यक्ती, राष्ट्र, समग्र जीवन, लोक आणि परलोक या सर्वांचे धारणपोषण करतो, तो धर्म होय’, अशी व्यासांची धर्मव्याख्या आहे. लोकस्थितीचे सनातन बीज म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे केवळ स्वर्ग-मोक्षाचा विचार नव्हे, तर या व्यावहारिक जगात लोकधारणा करतो, लोकांना सुखी, समृद्ध, परस्परपूरक, नीतीप्रवण आणि पुरुषार्थी बनवतो, तो धर्म होय. व्यास इहलोकी कर्मवाद, दैववाद आणि अध्यात्म किंवा आत्मतत्त्व यांच्यावर विश्वास ठेवतात. मानवी ऐहिक जीवनाचे वार्ता किंवा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र किंवा दंडनीती हे दोन आधारस्तंभ आहेत. अर्थावाचून जगात पान हालत नाही आणि हा मानवी अर्थ राजधर्माश्रित आहे; म्हणून राजाने योग्य प्रकारे नीतीला अनुसरून शासन चालवावे आणि माणसाने उद्यमशील रहावे. जो अर्थलाभ करून घ्यायचा तो स्वाभिमान जागृत ठेवून साधावा. अप्रतिष्ठेच्या मार्गाने माणसाने कोणत्याही वस्तूची आकांक्षा धरू नये. भीक मागणार्‍याचा मार्ग किंवा लुटारूपणाचा मार्ग अप्रशस्त होय. मग त्यात कितीही अर्थलाभ व्हायचा असो. श्रमार्जित लाभ, हेच तत्त्व माणसाने सदैव डोळ्यांपुढे ठेवावे.

इ. भिन्न लोकांचे यजनसंप्रदाय एक करून सर्वसामान्य धर्म निर्माण करणारे कृष्णद्वैपायन

हिंदुस्थानच्याच नव्हे, तर जगाच्या वाङ्मयात अत्यंत थोर अशी व्यक्ती म्हणजे कृष्णद्वैपायन व्यास हीच होय. वाङ्मयाद्वारे जगाचे एकीकरण घडवून आणणारा पुरुष जगात व्यासांव्यतिरिक्त दुसरा झालाच नाही.

ऋग्वेद हा पंजाबातील सोमयाजींचा (सोमयाग करणार्‍यांचा) संप्रदाय होता. यजुर्वेद हा दक्षिणेकडील पशुयाग करणार्‍यांचा संप्रदाय होता. सामवेद हा अत्यंत प्राचीन सत्रसंस्था (१३ पासून १०० दिवसांपर्यंत यज्ञयाग जिथे होतात अशा संस्था) चालविणार्‍यांचा संप्रदाय होता, तर ‘अथर्ववेद हा मगधातील प्राचीन मगांच्या परंपरेचा विकास होय’, असे शोधाअंती दिसून येईल. या भिन्न लोकांचे यजनसंप्रदाय एक करून सर्वसामान्य धर्म निर्माण करणे, ही क्रिया व्यासांनी केली आणि त्या क्रियेचे फल म्हणजे आजची वेदचतुष्टयीची रचना हे होय. या रचनेमुळे प्रत्येक वेद भिन्न धर्म न रहाता एकाच मोठ्या समवाय (समन्वय करणार्‍या) धर्माचे अंग बनला. सर्व ठिकाणच्या लोकांचे संग्रहण, हे त्यांच्या विद्येचे संग्रहण केल्याने होते आणि ‘संप्रदायभिन्नतेमुळे होणारा विरोधसुद्धा या संग्राहक कृतीने काढून टाकता येतो’, हे समाजशास्त्रीय तत्त्व व्यासांनी जाणले आणि आपल्या थोर कार्याची उभारणी केली.

विविध उपासनासंप्रदाय अन् त्यांचे वाङ्मय यांचे एकत्रिकरण करणारे पुराणाचे आद्यकर्ते

व्यासांना असेही दिसून आले की, सामान्य लोकांत यज्ञधर्माचा प्रसार नाही, तर सामान्य लोकांचा धर्म निराळाच आहे. सामान्य जनतेस मान्य अशी विविध स्थानिक दैवते आहेत; तीर्थस्थाने आहेत; पवित्र झालेले प्रदेश आहेत; वीरकथा अन् राक्षसमर्दनाच्या कथा स्थानोस्थानी आहेत; शिव, श्रीविष्णु, देवी या तीन देवतांच्या उपासना चोहोकडे आहेत आणि या सर्व गोष्टींस साहाय्यक होईल, असे प्राचीन वाङ्मय सूतवर्गाने बरेचसे संरक्षून ठेवले आहे. या परिस्थितीत केवळ हवि अर्पण करणार्‍या लोकांच्या धर्मकर्माच्या एकीकरणाने जनतेचे ऐक्य घडविण्याचा कार्यभाग होणार नाही, तर सामान्य लोकांचे उपासनासंप्रदायसुद्धा एकत्रित केले पाहिजेत अन् त्यांचे वाङ्मयही एकत्रित झाले पाहिजे. या दृष्टीमुळे व्यासांनी चोहोकडच्या साहित्याचे एकीकरण करण्यास प्रारंभ केला. त्यांनी जे काय आरंभिले, ते कार्य अनेक अनुयायांकडून पुढे वृद्धींगत झाले अन् त्यामुळे सर्व पुराणांचे आद्यकर्ते अशी त्यांची प्रसिद्धी झाली.

५. महर्षि व्यासांचे महत्त्व

अ. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आदीगुरु व्यासांचे पूजन प्रथम

व्यासांच्या महान ग्रंथरचनेमुळे त्यांना आदीगुरु म्हणतात. (शैव संप्रदायानुसार शिवाला, तर दत्त संप्रदायानुसार दत्ताला आदीगुरु म्हणतात.) आषाढ पौर्णिमेला गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिष्यमंडळी गुरुपौर्णिमा साजरी करतात. या प्रसंगी व्यासांचे पुण्यस्मरण म्हणून गुरुपूजनापूर्वी व्यासपूजन करतात.

आ. ईश्वरभक्तीरूप वाणीने सभेत बोलण्याचे स्थळ म्हणजे व्यासपीठ

सभेत बोलणारा वक्ता ज्यावर उभा असतो, त्याला व्यासपीठ म्हणतात. ‘व्यासपिठावर बसणार्‍या व्यक्तीने काही पथ्ये पाळायची असतात. सर्वांत प्रथम व्यासपिठावरून व्यासांना अमान्य असा एकही विचार बोलता कामा नये; म्हणून व्यासपिठावर बसणार्‍या व्यासाने साहित्याचा सखोल अभ्यास केला पाहिजे. व्यासपिठावरून कोणाची अकारण निंदा किंवा स्तुती करता कामा नये. व्यासपिठावर बसणारा माणूस श्री सरस्वतीचा खरा उपासक असला पाहिजे. त्याची वाणी वाङ्मयीन विलास म्हणून नव्हे, तर ईश्वरभक्तीच्या रूपात वाहिली पाहिजे. त्याची वाणी व्यासांप्रमाणे सरळ, स्पष्ट, सखोल आणि समाजोन्नतीसाधक असली पाहिजे.’

६. श्रीकृष्णाने व्यासांचे केलेले कौतुक

मुनीनामप्यहं व्यासः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १०, श्लोक ३७’, म्हणजे मुनींमध्ये मी व्यास आहे’, असे म्हणून श्रीकृष्णाने व्यासांचे महत्त्वच दर्शवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *