हिंदुत्ववादी संघटनांची प्रशासनाकडे मागणी
भाग्यनगर – उस्मानिया विद्यापिठातील विद्यार्थ्यांचा एक गट, काही शिक्षक, मानवाधिकारवाले आणि शहरातील इतर विद्यापिठांतील काही विद्यार्थी यांनी १० डिसेंबरला मानवाधिकार दिनी विद्यापिठामध्ये गोमांस मेजवानीचे आयोजन केले आहे. मेजवानीचा हा कार्यक्रम रहित करावा आणि विद्येचे माहेरघर असणार्या विद्यापिठात अशा हिंदुद्वेषी कार्यक्रमांचे आयोजन करणार्या विद्यार्थ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी प्रशासनाकडे केली आहे. त्या संदर्भातील एक निवेदन हिंदुत्ववादी संघटनांनी तेथील जिल्हाधिकारी के. निर्मला यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे, गोमाता हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे विद्यापिठात गोमांसाच्या मेजवानीचे आयोजन करणे, हे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. विद्यापीठ हे विद्यादानाचे पवित्र ठिकाण आहे. अशा पवित्र ठिकाणी काही समाजकंटक अशा प्रकारच्या हिंदुद्वेषी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा घाट घालत आहेत. वर्ष २०१२ मध्येही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा झालेल्या हिंसाचारात अनेक विद्यार्थ्यांना रुग्णालयात भरती व्हावे लागले होते. अशा घटना घडणे अयोग्य आहे. त्यामुळे हा हिंदुद्वेषी कार्यक्रम रहित करावा, अशी हिंदूंची मागणी आहे.
हे निवेदन देतांना शिवसेना राज्य अध्यक्ष श्री. मुरारी, उच्च न्यायालयाचे अधिवक्ता रमणमूर्ती, नेताजी स्फूर्ती केंद्राचे संस्थापक श्री. सीतारामय्या, हिंदु एकता मंचचे सचिव श्री. जगतय्या, हिंदु महासभेचे श्री. अशोक कुमार शुक्ल, शिवशक्ती संघटनेचे संस्थापक श्री. करुणाकर, हिंदु जनजागृती समितीचे तेलंगण राज्य समन्वयक श्री. चंद्रु मोगेर आणि अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते.
विद्यापिठात घुसून गोमांस मेजवानी बंद पाडू ! – प्रखर हिंदुत्ववादी आणि भाजपचे आमदार टी. राजासिंह
भाग्यनगर – विद्यापीठ हे विद्येचे मंदिर आहे. तेथे विद्या ग्रहण करायला जायला हवे. स्वतःचे भविष्य बनवायला हवे; पण तेथे जर हिंदूंच्या भावना दुखावणारे बीफ फेस्टीवलसारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले, तर ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही. उस्मानिया विद्यापिठाच्या विद्यार्थ्यांनी हा हिंदुद्वेषी कार्यक्रम रहित करावा अन्यथा गोभक्त विद्यापिठात घुसून तो बंद करतील आणि या हिंदुद्वेषी विद्यार्थ्यांना योग्य तो धडा शिकवतील. हिंदुबहुल देशात हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवणारे असे कार्यक्रम होता कामा नयेत. सध्या शहरातील वातावरण चांगले आहे. ते चांगले ठेवण्यासाठी आम्ही प्रशासनाला सर्वतोपरी साहाय्य करू; पण प्रशासनाने हा हिंदुद्वेषी कार्यक्रम रहित करावा. नाहीतर शहरातील वातावरण बिघडण्यास प्रशासनच उत्तरदायी असेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात