फोरम फॉर हिंदू अवेकनिंगचे यश !
परदेशातील धर्माभिमानी हिंदूंकडून भारतातील जन्महिंदू काही शिकतील का ?
न्यू जर्सी (अमेरिका) : हॉलीवूडमधील फॉक्स मुव्हीज् ने निर्मित केलेल्या एक्स-मेन : अपोकॅलीप्स या चित्रपटात श्रीकृष्ण या हिंदूंच्या उपास्य देवतेला एका अमानवी स्वरूपात दाखवून त्याचे विडंबन करण्यात आले होते. या प्रकरणी अमेरिकेतील अनेक हिंदूंनी तेथील फोरम फॉर हिंदू अवेकनिंग या हिंदुत्ववादी संघटनेशी आणि येथील हिंदू नेते राजन झेद यांच्याशी संपर्क साधला आणि हे विडंबन थांबण्यासाठी मोहीम राबवण्याची मागणी केली. त्यानंतर या संघटनेने या चित्रपट निर्मात्याशी पत्राद्वारे संपर्क साधला. त्याला प्रतिसाद म्हणून ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आणि चित्रपटाचे निर्देशक ब्रायन सिंगर यांनी २७ मे या दिवशी प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून श्रीकृष्णाचे विडंबन असलेली दृश्ये वगळण्याचा निर्णय घेतला.
फोरम फॉर हिंदू अवेकनिंगने ट्वेंटीएथ सेन्चुरी फॉक्स मुव्हीज् आस्थापनाला पत्र पाठवून या प्रकारचा निषेध केला होता आणि चित्रपटातून श्रीकृष्णाचा उल्लेख असलेली दृश्ये आणि संवाद वगळण्याची, तसेच या चित्रपटाचा ट्रेलर यु-ट्युबवरून काढून टाकण्याची मागणी केली होती. वरील प्रकारामुळे जगभरातील १०० कोटी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असेही या पत्रात नमूद करण्यात आले होते. शेवटी फोरम फॉर हिंदू अवेकनिंग या संघटनेच्या प्रयत्नांना यश आल्याने सर्व हिंदू श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात