मध्य आशियामधला अरल समुद्र पूर्णपणे कोरडा पडलाय आणि पृथ्वीवरचे हे सर्वात मोठे मानवाने निर्माण केलेले हे सर्वात भयावह असे पर्यावरण संकट आहे.
मध्य आशियातील कझाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यामध्ये असणारा हा अरल समुद्र आहे. खरेतर आहे म्हणण्यापेक्षा हा समुद्र होता, असेच म्हणावे लागेल. आता या समुद्राचे वाळवंट झाले आहे. गेल्या काही वर्षातल्या या समुद्राच्या प्रतिमांवर नजर टाकली तर आपल्याला सहज लक्षात येईल की हा समुद्र आपण कशा प्रकारे गमावून बसलोय.
याआधी कझाकीस्तान, उझबेकीस्तान आणि तुर्कमेनिस्तान या भागातल्या सिर दर्या आणि अमु दर्या या नद्या या समुद्राला येऊन मिळायच्या. या प्रवाहांमुळे या समुद्राचा ६८ हजार चौ. किमीचा पाणपसारा होता. पण १९६० साली सोव्हिएट रशियाने सिंचन प्रकल्पांसाठी या नद्यांचे पाणी वळवले. त्यामुळे या समुद्राचा पाणीपुरवठाच खंडित झाला आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण समुद्रच आकसून गेला. २०१४ मध्ये नासाने प्रसिद्ध केलेल्या या अरल समुद्राच्या प्रतिमा बघा. या समुद्राचा उत्तरेकडचा भाग थोडा वाचलाय. पण बाकी सगळा भाग कोरडाठाक आहे.
आपल्याकडे मान्सूनचे चक्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरच अवलंबून आहे. या समुद्राला होणारा नद्यांचा पाणीपुरवठाच गायब झाला तर ? ही कल्पना केल्यानंतर आपल्याला या समुद्राचे गायब होणे किती भयावह आहे हे समजू शकते.
अरल समुद्र हा कॅस्पियन आणि भूमध्य समुद्रासारखाच होता. पण भुमध्य समुद्र हा अटलांटिक महासागराला जोडलेला आहे. कॅस्पियन आणि अरल समुद्र मात्र लँडलॉक आहेत. त्यांच्या सभोवती जमीन आहे. त्यामुळे अरल समुद्राचा पाणीपुरवठा फक्त नद्यांवर
अवलंबून होता.
समुद्रच गायब झाल्याने इथली बेटं उघडी पडली. मच्छिमारी पूर्ण नष्ट झाली आणि त्यावर अवलंबून असलेले किनार्यावरचे संपूर्ण जीवनही संपले. समुद्रावर अवलंबून असलेले हवामानाचे चक्रही बिघडले आहे. हिवाळा जास्त कोरडा झालाय आणि उन्हाळ्याची तीव्रताही वाढलीय.
संपूर्ण मध्य आशियाला या पर्यावरणीय संकटाचे भोग भोगावे लागणार आहेत. ज्या नद्या आपल्या जीवनदायिनी आहेत त्याच नद्यांचे प्रवाह मनमानीपणे वळवल्यानंतर किती भयंकर परिणाम होऊ शकतात. याचे अरल समुद्र हे जिवंत उदाहरण आहे.
संदर्भ : आईबीएन लोकमत