पुष्कर (राजस्थान) येथे तृतीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलन
पुष्कर (राजस्थान) – भारतभूमी विश्वाचे आध्यात्मिक नेतृत्व करते आणि गोमाता त्यासाठी भारताचे प्रतिनिधित्व करते. आज पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाच्या निमित्ताने देशभरातून गोसेवेचा पवित्र संकल्प घेऊन एकत्र आलेल्या तरुणांना पाहून मला आनंद होत आहे. यांच्या माध्यमातून गायीला भारतात पुन्हा प्रतिष्ठा मिळेल, असे प्रतिपादन उत्तराखंड येथील पू. दादा गुरुजी यांनी केले. ते येथे ६ डिसेंबरपर्यंत चालणार्या तृतीय पंचगव्य चिकित्सा महासंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला संबोधित करत होते. या सोहळ्याचा स्व. राजीव दीक्षित यांच्या प्रतिमापूजनाने आणि दीपप्रज्वलनाने झाला. या वेळी व्यासपिठावर सूर्ययोगी पू. उमाशंकरजी (पुडुचेरी) आणि गव्यसिद्धाचार्य श्री. निरंजनभाई वर्मा उपस्थित होते. या संमेलनासाठी देशभरातून ५०० हून अधिक गोप्रेमी उपस्थित आहेत.
या वेळी सूर्ययोगी पू. उमाशंकरजी म्हणाले, पंचगव्य चिकित्सेतून शरिराचे संतुलन राखले जाते. पंचगव्य चिकित्सेत जे काही संशोधन होत आहे, त्यातून विश्वकल्याणासाठी अनेक गोष्टी पुढे येतील. या वेळी उपस्थित संतांच्या हस्ते पंचगव्य चिकित्सेशी संबंधित विविध साहित्याचे विमोचन करण्यात आले. त्यानंतर महर्षि वाग्भट गोशाला एवं अनुसंधान केंद्राचे कर्नाटक प्रभारी गव्यसिद्धाचार्य श्री. दामोदर भाई, राजस्थान प्रभारी गव्यसिद्धाचार्य श्री. अजित शर्मा आणि गव्यसिद्धाचार्य श्री. नीतेश ओझा यांनी पंचगव्य चिकित्सा करतांना आलेले अनुभव सर्वांसमोर मांडले.
असा झाला तृतीय पंचगव्य महासंमेलनाचा प्रारंभ !
४ डिसेंबरला पहाटे ५.३० वाजता श्री. निरंजनभाई वर्मा यांचे मार्गदर्शन चालू झाले. त्यानंतर अन्नपाण्याविना केवळ सूर्याच्या ऊर्जेवर जिवंत राहू शकणारे सूर्ययोगी पू. उमाशंकरजी यांनी सूर्ययोगाचे काही प्रयोग उपस्थितांकडून करून घेतले. त्यानंतर महासंमेलन स्थळापासून पुष्कर येथील ब्रह्मदेवाच्या मंदिरापर्यंत एक जनजागृती फेरी काढण्यात आली. त्यानंतर मुख्य उद्घाटन समारंभाला प्रारंभ झाला.
पंचगव्य चिकित्सेचा प्रसार करणार्या साहित्याचे प्रकाशन !
या वेळी पुढील साहित्याचे मान्यवरांकडून प्रकाशन करण्यात आले…
१. अ. भा. पंचगव्य चिकित्सक संघाची वार्षिक पत्रिका गव्यसिद्ध
२. जयपूर येथील सौ. अनिता शर्मा संकलित गोसानिध्य में दिनचर्या हा लघुग्रंथ
३. गो-संस्कृतीला समर्पित पाक्षिक शंखनादचा विशेषांक
४. पू. निरंजनभाई वर्मा यांच्या मार्गदर्शनावर आधारित पंचगव्य चिकित्सा व्याख्यान संग्रहाची डिव्हीडी आणि एम्पी ३
५. पंचगव्याचा शरिरातील १२ अंगांवर होणारा परिणाम, वैदिक आणि आधुनिक स्वरूपातील गोमाता आणि क्षीरमंथन : सृष्टीचा सर्वांत मोठा शोध या विषयांवर आधारित भित्तीपत्रके
गोसंवर्धनाच्या संदर्भात सनातन संस्था गोप्रेमींच्या समवेत ! – श्री. निरंजनभाई वर्मा
या वेळी उद्घाटन सोहळ्यात श्री. निरंजनभाई वर्मा यांच्या मार्गदर्शनानुसार सनातन संस्थेचे वैद्य श्री. मेघराज पराडकर यांनी संकलित केलेल्या पंचगव्य उत्पाद बनाएं !, या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी श्री. निरंजनभाई वर्मा म्हणाले, सनातन संस्था ही देशातील अग्रणी संस्था आहे, जी गोसंवर्धनाच्या कार्यात सतत आपल्यासमवेत आहे. या ग्रंथाचे प्रकाशन केल्याविषयी आम्ही सर्वजण संस्थेचे आभारी आहोत आणि येणार्या दिवसांत संस्था पंचगव्याशी संबंधित अजूनही काही ग्रंथांचे प्रकाशन करणार आहे. हे ग्रंथही लोकांसाठी लाभदायी ठरतील.