सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात जाणीवपूर्वक निर्दोष आणि निरपराधी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांचा छळ केला जात आहे. केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी १ जून या दिवशी पहाटे ६ वाजता सौ. कांचन दिलीप अकोलकर यांच्या घरावर अवैधपणा छापा टाकला. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील साहित्य जप्त केले. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून ही कारवाई करण्यात आली. सारंग अकोलकर यांचे नाव अकारण या प्रकरणात गोवण्यात येत आहे. त्याच्या वृद्ध आई-वडिलांची स्थिती हालाखीची असून ते केवळ १० बाय १० च्या खोलीत रहात होते; मात्र प्रसिद्धीमाध्यमांच्या सतत होणार्या छळाला कंटाळून ते गोवा येथे रहाण्यास गेले. त्यामुळे हिंदूंना जाणीवपूर्वक बळी देण्याचे प्रकार थांबवावेत, तसेच गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अवैध छापा टाकणार्या तपास अधिकार्यांना निलंबित करावे या मागणीसाठी ६ जून या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. शेखर गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख श्री. सचिन पवार, धर्मजागरण मंचचे सर्वश्री चंद्रकांत आवळे, विकास आवळे, हिंदु धर्माभिमानी श्री. अमोल साळुंखे, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री संतोष देसाई, दत्तात्रय रेठरेकर, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ या वेळी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात