कोल्हापूर : ६ जून या दिवशी शिवसेनेच्या वतीने येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील मनकर्णिका कुंडावरील शौचालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड करून ते पाडण्यात आले. शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. भक्तांच्या धार्मिक भावना न दुखावता आता या कुंडावरील उर्वरित बांधकाम पाडून मनकर्णिका कुंड भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणी श्री महालक्ष्मी भ्रष्टाचारविरोधी कृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी एस्.आर्. बर्गे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आली.
या वेळी श्री महालक्ष्मी देवस्थान भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे श्री. सुधाकर सुतार, श्री. मधुकर नाझरे, हिंदु एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण दुसे, हिंदु महासभेचे शहर अध्यक्ष श्री. मनोहर सोरप, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी उपस्थित होते.
या पुरातत्वीय वास्तूमध्ये बांधकामाची अनुमती नसतांना बांधलेले हे अनधिकृत बांधकाम पाडण्याविषयी अनेकदा मागणी करून, आंदोलने करून याविषयी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी हेतूतः दुर्लक्ष केले होते. अखेर या प्रकरणी शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने देवीभक्त शिवसैनिकांनी मनकर्णिका कुंडावरील हे अवैध बांधकाम तोडून टाकले. हा देवीभक्तांच्या भावनांचा उद्रेकच आहे. येथून पुढे अशा घटना न घडण्यासाठी शौचालयाचे उर्वरित बांधकाम प्रशासनाच्या वतीने त्वरित हटवण्यात यावे अन्यथा प्रशासनाच्या विरोधात जनआंदोलन छेडावे लागेल, अशी चेतावणी समितीने निवेदनाद्वारे दिली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात