हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेही मार्गदर्शन !
देहली : येथील देहली पब्लिक लाइब्ररीच्या सभागृहात मंदिरांची दुर्दशा : कारण और उपाय या विषयावर सेंटर फॉर गूड गर्व्हनन्स या संस्थेकडून व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष श्री. लालबाबू गुप्ता यांनी या वेळी मार्गदर्शन केले. या व्याख्यानासाठी देशातील १५ जिल्ह्यांतून सदस्य आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे देहली येथील कार्यकर्ते श्री. कार्तिक साळुंखे आणि सनातन संस्थेचे श्री. सुदर्शन गुप्ता उपस्थित होते. श्री. साळुंखे यांनीही या विषयावर मार्गदर्शन केले.
श्री. लालबाबू गुप्ता म्हणाले, मंदिर आपल्या संस्कृतीचे आधारस्तंभ होते. ऋषीमुनी आणि संत यांच्याकडून मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जात होते. वर्तमान स्थितीत मंदिरांची स्थिती दयनीय झाली आहे. मंदिरांचा वापर केवळ अर्थार्जनासाठीच काही विशेष संप्रदाय, समाज आणि पंथ यांच्याकडून केला जात आहे. ही दुरवस्था दूर करण्यासाठी आणि सुयोग्य व्यवस्थापन आणण्यासाठी सेंटर फॉर गूड गर्व्हनन्सकडून एका मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीची जर मंदिराच्या व्यवस्थापनाकडून फसवणूक झाली असेल, तर ते आमच्याकडे तक्रार करू शकते. या संदर्भात संकेतस्थळ लवकरच चालू करण्यात येणार आहे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंखे यांनी मार्गदर्शनात सांगितले, आज हिंदूंना कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. त्याचाच हा परिणाम आहे की, मंदिरांची दुरवस्था होऊ लागली आहे. मोठमोठ्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. मंदिरांचा पैसा धर्मशिक्षणासाठी नव्हे, तर अन्य कार्यासाठीच वापरला जात आहे. यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देऊन मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांच्या हातात रहाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात