वॉशिंग्टन : ‘इसिस‘चे नियंत्रण असलेल्या भागात जिवंत व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढून घेण्यास मान्यता देणारा नियम या दहशतवादी संघटनेने मंजूर केल्याचे उघड झाले आहे. या त्यांच्या निर्णयामुळे मानवी अवयवांची तस्करी वाढण्याची भीती पाश्चात्त्य जगाकडून व्यक्त होत आहे.
‘इसिस‘ने जानेवारी, 2015 मध्येच हा नियम केला असल्याचे एका अहवालात उघड झाले आहे. यानुसार, एखाद्या मुस्लिमाचा जीव वाचविण्यासाठी अपहरण केलेल्या व्यक्तीच्या शरीरातून एखादा अवयव काढला जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान अवयव काढलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तरी हरकत नसल्याचे “इसिस‘चे म्हणणे आहे. या अहवालाची अद्याप सत्यता स्पष्ट झाली नसली, तरी “इसिस‘ची मनोवृत्ती पाहता हे सत्य असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेच्या सैनिकांनी सीरियामध्ये घातलेल्या छाप्यांमध्ये हाती आलेल्या कागदपत्रांवरून ही माहिती मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे.