अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असताना उत्तर प्रदेशच्या एका मंत्र्याला मुस्लिमांनीही राम मंदिरासाठी ‘कर सेवा’ द्यावी, असं आवाहन करणं महागात पडलं आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या मंत्र्याची मंत्रिमंडळातून तडकाफडकी हकालपट्टी केली आहे.
अखिलेश सरकारमध्ये राज्य मंत्रिपदाचा दर्जा असलेले ओमपाल नेहरा यांनी बिजनौर येथील सभेत बोलताना अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत मुस्लिमांनीही सहकार्य करायला हवं, अशी इच्छा प्रदर्शित केली. मुस्लिमांना हिंदूशी सलोखा वाढवायचा असेल तर त्यांनी अयोध्या, मथुरा आणि काशीतील मशिदींवरील दावा सोडायला हवा. तेथील मंदिरांच्या उभारणीसाठी त्यांनी हिंदूंना साथ द्यायला हवी. अयोध्येत राम मंदिराची उभारणी सुरू झाल्यास त्यात मुस्लिमांनी ‘कर सेवा’ द्यायला हवी, असे आवाहनच त्यांनी केले. या विधानाची गंभीर दखल घेत अखिलेश यांनी नेहरा यांना थेट मंत्रिमंडळातून बाहेरचाच रस्ता दाखवला.
दरम्यान, ६५ वर्षीय नेहरा हे मुलायम सिंह यादव यांचे विश्वासू मानले जातात. बाबरी मशिदीच्या पतनावेळीही नेहरा चर्चेत आले होते. रामाचं मंदिर अयोध्येत होणार नाही तर कुठे होणार?, याचं उत्तर मुस्लिमांनीच द्यावं असं तेव्हा नेहरा म्हणाले होते. हिंदू-मुस्लिम सलोख्यासाठी त्यांनी त्यावेळीही मुस्लिमांनी अयोध्येवरील दावा सोडावा, असा आग्रह धरला होता.
स्त्रोत : महाराष्ट्र टाइम्स