भरुच : हिंदू समाजातील पुरूषांमध्ये नपुंसकत्व वाढल्याने हिंदू समाजाच्या लोकसंख्येत घट होत असल्याचे विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले. गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील जंबुसार येथील एका जाहीर सभेत तोगडिया यांनी हे विधान केले.
विहिंपच्या जाहीर कार्यक्रमात बोलताना तोगडिया म्हणाले, हिंदू समाजातील नव्या दमाच्या तरुणांनी विहिंपमध्ये सामील व्हावे. हिंदू समाजातील पुरूषांमधील नपुंसकत्व वाढत असल्याने हिंदू समाजाच्या लोकसंख्येत घट होत आहे. देशात मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढत असल्याचे ते म्हणाले.
हिंदू जोडप्यांनी मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येला प्रत्युत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त अपत्ये जन्माला घातली पाहिजेत, असे तोगडिया यांनी यावेळी म्हटले. यावेळी त्यांनी ‘लव्ह जिहाद’ आणि ख्रिश्चनांकडून करण्यात येणाऱ्या हिंदूंच्या धर्मांतरणावरही टीका केली. ‘मोदी सरकार सत्तेत असल्यामुळे राम मंदिरासाठी आंदोलन करण्याची गरज नाही’, असे तोगडिया म्हणाले.
केंद्र सरकारवर टीका करताना तोगडिया यांनी सरकारचे धोरण हिंदूंना संरक्षण देणारे नसल्याचे म्हटले. तुम्ही बुलेट ट्रेन आणि स्मार्ट सिटीज तयार करत आहात. मात्र, देशात पुढील काळात हिंदूच उरले नाही तर या बुलेट्र ट्रेनने कोण प्रवास करणार?, स्मार्ट सिटीजमध्ये कोण राहणार?, असा प्रश्न तोगडिया यांनी उपस्थित केला. या सभेत ५० तरूणांना धर्माच्या रक्षणाची शपथ देऊन त्रिशुळांचे वाटपही करण्यात आले.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स