Menu Close

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !

lokmanya-balgangadhar-tilak

शेळ्यांना वाघ बनविण्याचे सामर्थ्य लोकमान्य टिळकांत होते. ‘‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’’ या त्यांच्या सिंहगर्जनेने ब्रिटिश साम्राज्यास पहिले हादरे बसले व देशाला लढण्यासाठी तयार केले. त्या सिंहगर्जनेची शताब्दी आजचे राज्यकर्ते विसरून गेले. सिंहगर्जनेचा राष्ट्रीय उत्सव साजरा व्हायला हवा होता. सरकारचे वाढदिवस साजरे होतात, पण सिंहगर्जनेचे विस्मरण झाले.
पंतप्रधान मोदी यांचे नेहमीचेच परदेश दौरे आणि एकनाथ खडसे यांची प्रकरणे या सगळ्यांत आपण लोकमान्य टिळकांचे स्मरण करणे विसरून गेलो. टिळकांच्या सिंहगर्जनेस शंभर वर्षे झाली. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच !’ या सिंहगर्जनेचा शतक महोत्सव निदान महाराष्ट्र सरकारने तरी ‘जंगी’ स्वरूपात साजरा करायला हवा होता. राष्ट्रीय पातळीवरचे लोकमान्य टिळक हे पहिले शक्तिमान मराठी पुढारी. फक्त काँग्रेस नव्हे तर देश टिळकांच्या मागे उभा होता. टिळक बोले व देश हाले, अशी तेव्हा परिस्थिती होती. लोकमान्यांच्या गर्जनेचा शतक महोत्सव साजरा करणे हे एका व्यक्तीचे स्मरण नसते. टिळकांचे जीवितकार्य एका राजकीय महापुरुषाचे. त्यांची प्रेरणा राजकीय होती. टिळकांचे जीवन ही एका राजकीय स्वातंत्र्याची गीता आहे. टिळकांच्या ‘सिंहगर्जने’चे स्मरण करणे म्हणजे काय ? कडवट, त्यागी नि तेजस्वी कार्यकर्ते तयार करणे आणि नव्या पिढीत ज्ञान व सामर्थ्य यांची आवड निर्माण करणे म्हणजे लोकमान्य टिळकांचे स्मरण करणे होय.

टिळकांच्या ‘स्वराज्य’ दौर्‍याचे वर्णन

टिळकांनी ‘स्वराज्या’च्या मोहिमा राबविल्या. टिळकांच्या ‘स्वराज्य’ दौर्‍याचे वर्णन दादासाहेब खापर्डे यांनी करून ठेवले. टिळकांना देवाचे स्थान लोकांनी दिले होते. वर्‍हाड प्रांतातील टिळकांच्या मोहिमेचे वर्णन करताना ना. खापर्डे सांगतात, ‘‘पंधरा दिवसांत टिळकांनी हजारों मैल पायवाटेने प्रवास केला. कोना-कोपर्‍यांत जाऊन सर्व प्रदेश हालवून सोडला. लाखो लोकांना स्वराज्यमंत्राची दीक्षा दिली, हजारो रुपयांचे ढीग गोळा केले आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शत्रूंना मित्र बनविले व अनुत्साही पुरुषांमध्ये पौरुष उत्पन्न केले. या गोष्टी फक्त टिळकांनाच साधल्या. या गोष्टी घडवून आणण्याचे सामर्थ्य केवळ टिळकांच्या तपश्‍चर्येतच होते. वरील गोष्टी ज्यावेळी दोन हजार वर्षांनी जाहीर होतील, त्यावेळी या सत्यकथेला त्या पुढच्या काळचे चिकित्सक चमत्कारच ठरवून टाकतील आणि आपल्या शहाणपणाचा विनाकारण टेंभा पाजळीत बसतील ! ते म्हणतील की, टिळकांचा एवढा प्रचंड प्रवास म्हणजे मारुतीरायाचे क्षणार्धांत लंकागमन होय. ते सांगतील की, टिळकांनी लाखो लोकांना – अशिक्षित व दुर्बल जनतेला – स्वराज्यमंत्र देऊन धीर पुरुष बनविले हे श्रीरामाने माकडसेना जमा करण्यासारखे होय. ते गांभीर्याचा आव आणून उद्गारतील की, टिळकांनी लाखों रुपयांचा पर्वत रचला हे दगडांना तारले या कथेप्रमाणे अविश्‍वसनीय होय आणि शेवटी ते चिकित्सेखोर असे ठासून बोलतील की, टिळकांनी शत्रूंना मित्र बनविले आणि भ्याडांना शूर केले ही गोष्ट मेढ्यांना वाघ बनविण्यासारखे दुर्घट होय. पण आज ज्यांना परमेश्‍वराने डोळे दिले असतील त्यांना हे ‘काही तरी’ चमत्कार वाटण्याचे कारणच नाही.

टिळकांच्या चरणांचे दर्शन व्हावे म्हणून आजारीपणा विसरून लोक मैलच्या मैल धावत सुटले, ही गोष्ट अगदी खरी आहे. टिळकांना पाहावे म्हणून म्हातारे टणटणा उड्या मारू लागले, ही कथा गप्पा नव्हे. टिळकांची चरणधूली मस्तकावर वाहण्यासाठी रानावनातून हजारो लोक उन्हातान्हांत तळमळत दोन-दोन दिवस तळ देऊन राहात हा सत्याचा पुरावा आहे; बहाणा नव्हे. हे चमत्कार कोणाला वाटले तर वाटोत, पण हे चमत्कार घडवून आणण्याचे सामर्थ्य तिलकदेवांत आहे हे खरे. तिलकदेवांची आठवण होताच भागवतातील कृष्णदेवाची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. कंसाला मारावयास श्रीकृष्ण गेले त्यावेळी श्रीकृष्ण निरनिराळ्या प्रकृतीच्या माणसांना निरनिराळे कसे दिसले याचे बहारीचे वर्णन दिलेले आहे. तिलकदेवाला तेच वर्णन अक्षरश: लागू पडते. टिळक हे जनतेला प्राण वाटतात, स्वराज्यविरोध्यांना काळ भासतात, स्वराज्यवाद्यांना स्वराज्यदेवतेची मूर्ती गमतात, धार्मिकांना साधू दिसतात, चिकित्सकांना चिकित्सक, पंडितांना पंडित, शास्त्रज्ञांना शास्त्रज्ञ, सुधारकांना सुधारक, उद्धारकांना उद्धारक भासतात व दिसतात. टिळकांचे एका शब्दात वर्णन करावयाचे असेल तर ते स्थितप्रज्ञ कर्मयोगी होत.’’

एक हजार तलवारींपेक्षा चार बंडखोर वर्तमानपत्रांची शक्ती अधिक प्रबळ नि प्रलयकारी

जुन्या आणि ज्येष्ठ नेत्यांची शस्त्रे म्हणजे प्रार्थना, व्यासपीठ आणि निषेधदर्शक नापसंती. तर टिळकांची शस्त्रे म्हणजे प्रखर वाणी, वृत्तपत्र, व्यासपीठ आणि जनतेचा क्षोभ. टिळकांसारखा दक्ष, धाडसी, प्रभावी वक्ता आणि संपादक हिंदुस्थानात झालाच नाही. ते हिंदुस्थानच्या वृत्तपत्रसृष्टीतील नेपोलियनच होते. एक हजार तलवारींपेक्षा चार बंडखोर वर्तमानपत्रांची शक्ती अधिक प्रबळ नि प्रलयकारी असते, असे नेपोलियन म्हणत असे. ते टिळकांच्या बाबतीत सत्य ठरते. टिळक पराकोटीचे देशभक्त होते. इंग्रजांचे राज्य म्हणजे देवाचे वरदान असे मानणार्‍या नेत्यांना टिळक सांगत की, सुतारकी व विणकाम यावर आपले पोट भरणार्‍या दोन कोटीहून अधिक भारतीयांच्या तोंडचे अन्न कोणी काढून घेतले असेल तर ते इंग्रज सरकारने. इंग्रज लोक क्षत्रियांपेक्षा जात्याच अधिक वैश्य आहेत. त्यांचे नाक दाबा म्हणजे तोंड उघडेल. जुने नेते म्हणत, इंग्रज सरकारने शांतता दिली. त्यावर टिळक ताडकन म्हणत, हो पण भाकरी नेली. कोणी म्हणाले, सरकारने आगगाड्या दिल्या. त्यावर ते उत्तर देत, मृतांवर अलंकार काय उपयोगाचे? ‘इंग्रज लोक देशावर चरत आहेत आणि आमच्या देशातील लोकांच्या बुद्धीची, करामतीची, शौर्याची, व्यापाराची व इतर प्रगतीची वाट बंद करीत आहेत. ती तशीच राहिली तर बंड होईल,’ असा इशारा ते सरकारला देत.

गांधींना टिळक हिमालयासारखे वाटले तो काळ

सन १८९६ च्या शेवटी महाराष्ट्रात दुष्काळाने कहर उडविला. शेकडो माणसे प्राणास मुकली. जनावरे मेली. त्यावेळी टिळकांनी शेतकर्‍यांना धीर दिला. ते म्हणाले, ‘‘कर्ज काढून सारा भरू नका. आपसात लुटमार करू नका. त्यामुळे सर्वांचा नाश होईल. सरकारी कनिष्ठ अधिकार्‍यांना घाबरू नका. त्यांच्या रागाची कदर करू नका. मृत्यूच्या जबड्यात असतानासुद्धा तुम्ही धैर्य दाखवीत नाही. आम्ही या दुष्काळाला तोंड देऊ, परंतु या मेंढरांसारख्या वागणार्‍या भित्र्या लोकांना काय करावे ? असला दुष्काळ लंडनमध्ये पडला असता आणि तेथील मुख्य प्रधान हिंदुस्थानच्या गव्हर्नर जनरलसारखा जर उदासीन राहिला असता, तर त्याचे सरकार एका आठवड्यात पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोलमडले असते !’’ टिळकांनी सार्वजनिक सभेच्या वतीने निवेदने काढून सरकारला सळो की पळो करून सोडले. त्यामुळे सार्वजनिक सभा सरकारच्या रोषाला बळी पडणार आणि इतकी चांगली संस्था नष्ट होणार, अशी भीती दादाभाईंनी लंडनहून प्रदर्शित केली होती. दुष्काळाच्या वेळी इंग्रज महाराज्यपाल एल्जिन साहेब बडोद्यात मेजवानी झोडीत होते. ते पाहून टिळक म्हणाले, ‘‘लोक उपाशी मरत आहेत. अशावेळी मेजवानी झोडणार्‍या व्हाईसरॉयांस जाब विचारण्याची सांप्रत परिस्थिती नाही याविषयी वाईट वाटते.’’ अशा तिखट अन् बोचक लिखाणामुळे क्षोभ निर्माण होई. त्यावर टिळकांना पुढच्या विधिमंडळात मज्जाव करावा अशी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्राने सरकारास सूचना केली ! गांधींना टिळक हिमालयासारखे वाटले तो हा काळ !

मी सशस्त्र बंडदेखील सनदशीर समजतो

स्वराज्याची मोहीम राबवताना टिळकांनी वनवास भोगला. यातना सहन केल्या. काळ्या पाण्याचा तुरुंगवास भोगला. मानहानी सहन केली. ते शस्त्रपूजक होते. पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा टिळकांनी तरुणांना युद्धशास्त्राचा अनुभव मिळावा म्हणून धूर्तपणे लष्करात भरती व्हायला सांगितले. ही त्यांची दूरदृष्टी होती व देश रक्षणाची तळमळ होती. नंतर त्यांनी स्वराज्याच्या चळवळीवर भर दिला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’ हे त्यांचे वचन त्या वेळी लोकप्रिय झाले. त्यापूर्वी २ मे १९०८ रोजी अकोल्यास ते प्रथम म्हणाले होते की, स्वराज्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. ‘‘मी सशस्त्र बंडदेखील सनदशीर समजतो. आज ते शक्य नाही इतकेच. जर सशस्त्र बंडाला यश येईल, अशी कोणी आठ आणे जरी खात्री दिली तर बाकीच्या आठ आण्यांबद्दल परमेश्‍वरावर विश्‍वास ठेवून मी बंड पुकारीन’’ हे टिळकांचे उद्गार सर्वशृ्रत आहेत. ‘जर शक्य असते तर बंड करून ब्रिटिश सरकार येथून नाहीसे केले असते,’ असे त्यांनी ब्रिटिश राज्यपाल विलिंग्डनसाहेब यास ठणकावून सांगितले होते. लाला लजपतरायसारखा पुरुष हद्दपार होतो आणि मिंटो जिवंत कसा राहतो, हे त्यांचे उद्गार त्यांच्या मनातील खळबळ व्यक्त करतात. कायदेशीर चळवळ फलद्रूप झाली नाही तर दुसरा श्रेयस्कर मार्ग पत्करावा लागेल, हे त्यांचे वक्तव्य प्रसिद्ध आहे. कोणताही शेवटचा बंडखोरीचा अती जालीम उपाय ज्याला जो सुचेल तो अवलंबण्यास मी तयार आहे, असे ते म्हणत त्यातले इंगित हेच होते आणि म्हणूनच, ‘टिळकांचे मार्ग व माझे मार्ग हे काही एकच नाहीत, ते भिन्न आहेत’ असे म. गांधी म्हणत. टिळकांचे मार्ग ‘अन्ग्त्गेप्’- राक्षसी आहेत असे गांधीजींचे म्हणणे होते.

टिळकांना गांधीवादाच्या अहिंसावादी असहकारितेच्या चौकटीत नेऊन बसविणे हास्यास्पद

इंग्रज अधिकार्‍यांना ठार मारा असे टिळकांनी क्रांतिकारकांना प्रत्यक्ष सांगितले नसले तरी त्यांच्या लढाऊ राजकारणापासून क्रांतिकारकांना स्फुरण चढले यात तिळमात्र शंका नाही. दामोदरपंत चापेकर, सावरकर, बापट यांच्याशी असलेले त्यांचे संबंध, बापटांकडून बॉम्ब मॅन्युअल मागवून प्रत्यक्ष बॉम्बचे प्रयोग करून पाहण्याचे त्यांचे धाडस, नेपाळमध्ये खाडिलकरांकरवी शस्त्रांचा कारखाना काढण्याचे त्यांचे प्रयत्न, गोव्यात एम्डनकडून रणसाहित्य मिळविण्याचे पुण्यातील तरुणांचे प्रयत्न, या सर्व गोष्टी विचारात घेता टिळकांना गांधीवादाच्या अहिंसावादी असहकारितेच्या चौकटीत नेऊन बसविणे हे हास्यास्पद आहे. क्रांतिकारकांच्या त्यागाविषयी टिळकांना आदर वाटे. बाळकृष्ण चापेकर हैदराबाद संस्थानातील जंगलात लपून राहिले असता, त्यांच्या अन्नपाण्याची सोय त्यांनी केशवराव कोरटकर यांच्याकरवी केली. ‘आमच्या एका हिंदी मनुष्याला तुमच्या रशियन मिलिटरी अकादमीमध्ये लष्करी अधिकार्‍याचे शिक्षण देऊन तयार करून द्याल काय ?’ अशी १९०५ साली टिळकांनी मुंबईतील रशियन वकिलातीकडे बोलणी केली होती. तसा पत्रव्यवहारही केला होता. ब्रिटिशांची सत्ता सशस्त्र प्रतिकाराने उलथून पाडण्याचा त्यांचा मानस होता, असे रशियन इतिहासकारांनी म्हटले आहे.

यावरून दिसून येईल की, क्रांतिकारकांच्या कार्याला त्यांचा हार्दिक पाठिंबा होता. त्यांनी गांधींप्रमाणे क्रांतिकारकांना आपणहून सरकारच्या स्वाधीन व्हायला सांगून क्रांतिकारकांचा तेजोभंग वा बीमोड करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. गांधींच्या म्हणण्याप्रमाणे टिळकांचे मार्ग राक्षसी असतील, पण त्यावेळी जे आवश्यक व इंग्रजांच्या मनात धडकी भरवणारे होते ते सर्व टिळकांनी स्वराज्यासाठी केले व वैयक्तिक आयुष्यात त्याची मोठी किंमत त्यांनी मोजली.

इतिहासाचे विस्मरण हे देशाचे मरण ठरू नये.

१९०९ साली ६ वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षेचा निकाल ऐकल्यानंतर ऑर्थर रोड जेलकडे परत जाताना वाटेत टिळकांस झोप लागली व सार्जंटने त्यांना जागे करताना प्रश्‍न केला. त्यास टिळक म्हणाले, ‘‘आमचे काम संपले. आता काही करावयाचे नसल्यामुळे झोप आली.’’ हे असे धैर्य दुर्मिळच म्हणायला हवे. ३१ मे १९१६ रोजी स्वातंत्र्य लढ्यास बळ देण्यासाठी नगरमध्ये घेतलेल्या सभेत टिळकांनी स्वराज्याची सिंहगर्जना केली. कापड बाजारातील इमारत कंपनीच्या वसाहतीच्या मैदानावर ही ऐतिहासिक सभा झाली. सभेला लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. टिळकांच्या सिंहगर्जनेमुळे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यास गती आली. मरगळलेली मने पेटून उठली. देशवासीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत भडकली. त्यातूनच पुढे वणवा पेटला. आज स्वातंत्र्य उपभोगणारे स्वातंत्र्याच्या व स्वराज्याच्या सिंहगर्जनेस विसरले. सरकारला दोन वर्षे, चार वर्षे झाली म्हणून कोट्यवधींचा चुराडा करून जगभरात प्रसिद्धी केली जाते. मुख्यमंत्री, मंत्र्यांच्या प्रसिद्धीसाठी पान पान जाहिराती सरकारी खर्चाने दिल्या जातात, पण सिंहगर्जनेची शताब्दी झाली ते सरकारच्या स्मरणातून गेले. स्वराज्याच्या सिंहगर्जनेची शताब्दी राष्ट्रीय पातळीवर साजरी व्हायला हवी होती. निदान महाराष्ट्राने तरी विसरायला नको होते. इतिहासाचे विस्मरण हे देशाचे मरण ठरू नये.

संदर्भ : सामना

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *