रामनाथी, गोवा येथे १९ ते २५ जून २०१६ या कालावधीत होणार्या पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या निमित्ताने…
रामनाथी, गोवा येथे ११ जून ते १७ जून २०१५ या कालावधीत हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री रामनाथ देवस्थान, रामनाथी, फोंडा, गोवा येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात भारतीय जनता पक्षाचे कल्याणचे उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र डहाके यांनी देवभूमी नेपाळ साहाय्यता मोहिमेतील अनुभव ! या विषयावर मांडलेली सूत्रे त्यांच्याच शब्दांत येथे देत आहोत.
१. नेपाळ हे एक हिंदु राष्ट्र असूनही हिंदु संघटनांचे साहाय्य मिळण्यास विलंब होणे
एप्रिलच्या अखेरीस आणि मे २०१५ या कालावधीत नेपाळमध्ये शक्तीशाली भूकंप झाल्यावर काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे मानवी तस्करी चालू केली. त्यामुळे नेपाळ सीमेवर शासनाने कायदेशीर प्रक्रिया अवलंबली. त्यातील नियम फार जाचक होते. नेपाळ सीमेवर आम्हाला ४ घंटे थांबावे लागले. मी ९.४.२०१५ या दिवशी काठमांडूमध्ये आलो. नंतर आमचे अभियान चालू झाले. नेपाळमध्ये असणार्या हिंदुत्ववादी संघटना, उदा. मानवधर्म सेवा समिती, हिंदू जागरण नेपाल, राष्ट्रीय धर्मसभा नेपाल या आपापल्या परीने काम करत होत्या. जेव्हा हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्या सर्वांना एकत्र आणण्यात आले. तेव्हा असे जाणवले की, नेपाळ हे एक हिंदु राष्ट्र आहे; पण हिंदुत्वनिष्ठ संघटना साहाय्याला येण्यास विलंब लावतात.
२. नेपाळमध्ये साहाय्यासाठी आलेल्या अन्य संघटना
नेपाळमध्ये काही परदेशी संघटना साहाय्यासाठी आल्या होत्या. मी त्यांचे टी-शर्ट पाहिले. तेव्हा त्यावर वर्ल्ड ख्रिश्चन ऑर्गनायझेशन असे लिहिले होते. तेथे अमेरिकेतील रेड क्रॉस ही संघटनाही आली होती आणि जपान अन् इंडोनेशिया येथील बौद्ध संघटनाही आल्या होत्या.
३. साहाय्य करतांना धर्मांतराचा कट रचणार्या धूर्त संघटना !
३ अ. नेपाळला भूकंपाच्या संकटातून केवळ येशूच वाचवू शकतो, असे सांगणारे धूर्त मिशनरी ! : नेपाळमध्ये भूकंप झाल्यावर लगेच या संघटना तेथे आल्या होत्या. बंधूंनो, त्यांचा उद्देश तेथे साहाय्य करण्याचा नव्हता, तर तेथील हिंदूंचे धर्मांतर करण्याचा होता. ख्रिस्ती मिशनरी हे नेपाळी लोकांना बायबलचे वितरण करत होते. ते आपल्या हिंदु बांधवांना सांगायचे, या संकटातून केवळ येशूच तुम्हाला वाचवू शकतो ! तुम्हीही आमच्याप्रमाणेच प्रार्थना करा. प्रार्थना केल्यानंतर ते लोक त्यांना धान्याचे वितरण करत होते, तसेच अन्य साहित्यही वाटत होते. म्हणजे तेथे धर्मांतराचा कट रचला जात होता.
३ आ. बुद्धाच्या प्रार्थना करायला सांगून नंतर त्यांना धान्याचे वितरण करणार्या बौद्ध संघटना ! : इंडोनेशिया आणि जपान येथून ज्या बौद्ध संघटना तेथे आल्या होत्या, त्यासुद्धा तेच करत होत्या. त्या संघटना लोकांना बुद्धाच्या प्रार्थना करायला लावून मग त्यांना धान्याचे वितरण करत होत्या.
४. संवेदनाशून्य विदेशी !
तेथे काही विदेशी लोकही होते. त्यांनी चांगले कपडे घातले होते आणि ते तेथील मंदिरांची छायाचित्रे काढत होते, तसेच ते आपल्या हिंदु बांधवांच्या पडलेल्या घरांचीही छायाचित्रे काढत होते.
५. साहाय्यता कार्य करतांना प्रत्यक्ष अनुभवलेला भूकंप !
२५.४.२०१५ या दिवशी नेपाळ येथेे पहिला भूकंप झाला आणि १२.५.२०१५ या दिवशी दुसरा मोठा भूकंप झाला. त्या वेळी आम्ही तेथील भक्तपूर या भागात साहाय्यकार्य करत होतो. आम्ही ढिगार्याखाली अडकलेल्या वस्तू काढून देत होतो. ते करतांना आम्ही कार्य करत असलेली गल्ली कुठपर्यंत आहे, ते पाहूया, असे वाटल्याने मी काम थांबवून तेथे जाऊन पाहिले, तर ती गल्ली रस्त्याच्या बाजूलाच होती आणि रस्त्यावर लगेच एक मोकळे पटांगण होते. मग मी पुन्हा कामाला आलो आणि अर्ध्या घंट्यानंतर तेथे पुन्हा भूकंप झाला. भूमी हलू लागली आणि तेथून काही अंतरावर बसलेल्या नेपाळी महिला आयो ! आयो ! , असे म्हणून ओरडत पळू लागल्या. नेपाळी भाषेत आयो चा अर्थ आला, असा होतो. तेथे गोंधळ माजला, आरडाओरडा चालू झाला. तेथे नेमके काय झाले आहे, हेच मला समजेना. लोक पळू लागले. वरून विटा पडू लागल्या. मी एवढ्या वेगाने कधी पळालो नव्हतो. मी एका पक्क्या घराच्या दारापर्यंत पोचलो. ते दार उघडे होते आणि आत कुणीच नव्हते. तेथील सगळे लोक पळून गेले होते. मीही तेथून देवाचे नाव घेऊन पळालो. एवढ्या विटा आणि दगड पडत असूनही मी सुखरूप मोकळ्या पटांगणात पोचलो.
६. भूकंपानंतर झालेली मानवी तस्करी !
नेपाळमध्ये भूकंप झाला, तेव्हा काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी तेथे मानवी तस्करी चालू केली. तेथे जी मुले आणि महिला अनाथ झाल्या, त्यांची तस्करी करण्याचे प्रयत्न चालू झाले. त्यामुळे नेपाळ शासनाने तेथे कडक कायदे केले.
– डॉ. उपेंद्र डहाके, उपाध्यक्ष, भाजप, कल्याण, महाराष्ट्र.