सातारा येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील मागणी
सातारा : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने (बालभारती)च्या इयत्ता सहावीच्या इतिहासाच्या पुस्तकात अरुणाचल प्रदेश हा भारताचा नव्हे, तर चीनचा भाग असल्याचे दाखवले आहे. पुस्तकातील नकाशात मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील कान्हेरी गुंफा पाण्याच्या खाली दाखवण्यात आली आहे, तसेच भारताची राजधानी देहली ज्या यमुना नदीच्या काठावर वसली आहे, त्या तिरावर न दाखवता तिच्या विरुद्ध तीरावर दाखवण्यात आली आहे. अशा विकृत नकाशांमुळे विद्यार्थ्यांपर्यंत चुकीच्या गोष्टी पोहोचत आहे. अशा प्रकारे राष्ट्रीय मानचित्रांचा अवमान होऊन जनतेच्या राष्ट्रभावना दुखावल्या गेल्या आहेत. हा प्रकार चिंताजनक आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकांमध्ये असे चुकीचे नकाशे आणि माहिती अंतर्भूत करून राष्ट्राचा अवमान करणारे शिक्षणतज्ञ, त्याला संमती देणारे अशा सर्व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच सुधारित पुस्तक विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित करण्यात यावे. या सुधारित आवृत्तीचा व्यय दोषींकडून वसूल करावा, अशी मागणी सातारा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत सोनवणे यांनी केली.
याच मागणीच्या जोडीला योगक्रियांत ॐ चा उपयोग अनिवार्य करण्यात यावा आणि जम्मू-काश्मीर येथे हरि पर्वताचे नाव कोह-ए- मारन करण्याचा हिंदुद्रोही निर्णय रहित करावा, या मागण्यांसाठी गोलबाग, राजवाडा, सातारा येथे हिंदुत्ववादी आणि शिवप्रेमी संघटनांच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
या वेळी समितीच्या सौ. रूपा महाडिक यांनीही साध्वी प्रज्ञासिंह यांचा ८ वर्षे छळ करणारे पोलीस आणि तत्कालीन राज्यकर्ते यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी केली. विश्व हिंदु परिषदेचे शहरमंत्री श्री. जितेंद्र वाडकर, समितीचे श्री. हणमंत कदम, तसेच सौ. विद्या कदम यांनीही मार्गदर्शन केले.
आंदोलनाला हिंदु महासभा, शिवसेना, बजरंग दल, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदु परिषद यांसह अनेक स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिला. या वेळी विविध हिंदुत्ववादी संघटनांचे ५० प्रतिनिधी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात