पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन २०१६
- फरीदाबाद (हरियाणा) येथे पत्रकार परिषद
- हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कृती कार्यक्रम ठरणार !
- देश-विदेशातील १२५ हून अधिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ४१५ हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार !
फरीदाबाद : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे राष्ट्रव्यापी संघटन निर्माण करण्यासाठी १९ ते २५ जून या कालावधीत गोव्यात अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे पंजाब आणि हरियाणा राज्य समन्वयक श्री. सुरेश मुंजाल यांनी येथे दिली. अधिवेशनाचे यंदाचे ५ वे वर्ष आहे.
या अधिवेशनाची सविस्तर माहिती देण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जून या दिवशी फरीदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी फरीदाबाद येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. अजित पटवा, हिंदु लीगल सेल या संघटनेचे सचिव तथा प्रवक्ता अधिवक्ता श्री. प्रशांत पटेल, सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री आणि हिंदु स्वाभिमान या संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा अधिवक्त्या श्रीमती चेतना शर्मा हे मान्यवर उपस्थित होते.
श्री. मुंजाल पुढे म्हणाले,
१. देशात हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत असूनही हिंदूंच्या मागील अनेक वर्षांपासूनच्या मागण्या अद्यापही अपूर्ण आहेत. काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, कलम ३७० रहित करणे, गोवंश हत्येवर देशव्यापी बंदी आणणे, राममंदिर उभारणे आदी विषयांवर सरकारने कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही.
२. यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून या अधिवेशनाच्या माध्यमातून हिंदु राष्ट्राची हाक हिंदूंपर्यंत पोहचवण्यात येणार आहे.
३. मागील अधिवेशनात निश्चित झाल्यानुसार देहली आणि फरीदाबाद येथे राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात अनेक आंदोलने करण्यात आली. यामध्ये इसिसविरोधी आंदोलन, जेएन्यूतील देशद्रोही घोषणांच्या विरोधात आंदोलन आदी आंदोलनांचा समावेश होता.
४. याशिवाय १९ आणि २० डिसेंबर २०१५ या दिवशी स्थानिक हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एकत्रिकरणासाठी देहली येथे राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाचेही आयोजन करण्यात आले होते.
५. यंदाच्या अधिवेशनास भारतातील २१ राज्यांसह नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका या देशांतील १२५हून अधिक हिंदुत्वष्ठ संघटनांचे ४१५हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. देहली (एन्.सी.आर्), पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तरप्रदेश येथील २१ हिंदुत्वनिष्ठ उपस्थित रहाणार आहेत.
६. या अधिवेशनात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी समान कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असून त्याअंतर्गत वर्षभरातील आगामी उपक्रमांची दिशाही ठरवण्यात येणार आहे.
या वेळी अधिवक्त्या श्रीमती चेतना शर्मा म्हणाल्या, सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एका व्यासपिठावर यावे, या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वांनी आपापसांतील मतभेद विसरून एक हिंदु म्हणून या अधिवेशनात सहभागी व्हावे.
अधिवक्ता श्री. प्रशांत पटेल म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदु धर्माला अपकीर्त करणार्यांच्या विरोधात आम्ही वैध मार्गाने विरोध करत आहोत. कलियुगात संघटनातच शक्ती असल्याने आम्ही सर्व जण मिळून या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत.
कु. कृतिका खत्री म्हणाल्या, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आम्ही सर्व जण ईश्वरी अधिष्ठान ठेवून कार्यरत आहोत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात