महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागांतील तरुण आयसिसच्या गळाला लागत असल्याचं चिंताजनक चित्र असतानाच, जम्मू-काश्मीरमधील नऊ अल्पवयीन मुलांनाही आयसिसच्या एका नेत्यानं व्हॉट्स अॅपवरून झपाटल्याचं उघड झालं आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला असून सर्वांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. पेट्रॉल बॉम्ब फेकणं, दगडफेक आणि काश्मीरमध्ये आयसिसचा झेंडा फडकवल्याचा आरोप या मुलांवर आहे.
अल्-हयात नावाच्या एक व्हॉट्स अॅप ग्रूपवरून तरुणाईला आयसिसकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न होत आहेत. अबू बक्र नावाच्या व्यक्तीकडे या ग्रूपची सूत्रं आहेत. तो अल-बगदादी इस्लामिक स्टेटचा म्होरक्या असून त्यांच्या मीडिया विंगचं नाव अल्-हयात आहे. या ग्रूपमध्ये अनेक परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. त्यापैकीच उत्तर आफ्रिकेतील एका सदस्यानं जम्मू-काश्मीरमधील नऊ मुलांना आयसिसची ‘महती’ सांगून भुलवलं. वेगवेगळ्या गोष्टींमधून त्यानं १५ ते १७ वर्षे वयोगटातील या मुलांची माथी भडकवली. त्यातले तिघे तर इतके झपाटले होते, की त्यांनी सीमारेषा पार करून पाकिस्तानात जाण्याची तयारीही सुरू केली होती. पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांची रवानगी बालसुधारगृहात केली.
ही मुलं याआधीही बऱ्याचदा इस्लामिक स्टेटचा झेंडा फडकवताना काश्मिरात दिसली होती. त्यांच्या या आयसिस प्रेमानं सरकार आणि लष्करी जवान हादरले होते. आता या नऊ मुलांना अटक झाल्यानं त्यांचं आयसिस कनेक्शन उघड होऊन पोलिसांना काही धागेदोरे मिळू शकतात. परंतु, ही मुलं आयसिसच्या संपर्कात आलीच नव्हती, असा दावा सुरक्षा यंत्रणांनी केलाय. शरियत कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडर बुरहान वाणीनं सुरू केलेल्या चळवळीनं ही मुलं प्रभावित झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. भारतीय लष्कराविरोधात युद्ध करण्याचं आवाहन बुरहान करत असल्याचा व्हिडिओ जम्मू-काश्मीरमध्ये फिरतोय. तो पाहूनही अनेकांची डोकी फिरली आहेत.
असं असलं तरी, जम्मू-काश्मीरमधील तरुणांमध्ये आयसिसबद्दल उत्सुकता आहे आणि ते त्यांच्या जाळ्यात सहज सापडू शकतात, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे त्यांना या दुष्टचक्रापासून दूर ठेवण्याचं मोठं आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे आहे.
संदर्भ : महाराष्ट्र टाइम्स