‘हरि ओम सेवा समिती’ची उपजिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
पुणे : डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी पुणे येथील सौ. कांचन अकोलकर यांच्या घरावर अवैधरित्या छापा घातला. अकोलकर कुटुंबियांना अंधारात ठेवून त्यांच्या घरावर छापा घातल्याच्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी श्री आसाराम बापू साधक परिवाराच्या वतीने करण्यात आली. ‘हरि ओम सेवा समिती’च्या वतीने या संदर्भातील निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले. गरीब कार्यकर्त्यांच्या घरावर अशाप्रकारे अवैधरित्या छापा घालणार्या तपास अधिकार्यांना निलंबित करावे, अशी प्रमुख मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी बनावट किल्लीने अकोलकर यांचे घर उघडून खोलीतील कपाटाचे कुलुप तोडून त्यातील साहित्य जप्त केले. सनातनच्या निष्पाप साधकांना यात गोवण्यासाठी कोणतेही साहित्य घुसडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न होऊ शकतो. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी अकोलकर कुटुंबियांची फेब्रुवारीमध्ये भेट घेतली होती, तसेच त्यांचा संपर्क क्रमांकही अधिकार्यांकडे असतांना त्यांना अंधारात ठेवून ही कारवाई का करण्यात आली ? अन्वेषण यंत्रणा हिंदूंच्या विरोधात फुरफुरतात; मात्र ‘इस्लामिक स्टेट’सारख्या महाभयंकर आतंकवादी संघटनेत सहभागी होऊ इच्छिणार्यांचे समुपदेशन करतात. हिंदूंना नाहक बळी देण्याचे प्रकार थांबवावेत, अशी मार्मिक टिपणी निवेदनात करण्यात आली आहे.
डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली आहे. या प्रकरणी सनातनने डॉ. तावडे निष्पाप असल्याचे सांगून हिंदुत्ववादी सनातनला विनाकारण गोवण्यात येत असल्याचे सांगितले होते. या प्रकरणीही ‘हरि ओम सेवा समिती’ सनातनच्या पाठीशी असल्याचे आसाराम बापू संप्रदायाच्या साधकांनी सांगितले. (सनातनच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार्या हरी ओम सेवा समितीचे आभार ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात