नंदुरबार येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाची निदर्शने
नंदुरबार : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य दोघे यांचा खोटे आरोप लादून आठ वर्षे सतत अमानुष छळ करणारे तत्कालीन अधिकारी आणि राज्यकर्ते यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, यांसह विविध मागण्यांसाठी १२ जून २०१६ या दिवशी सकाळी १० वाजता येथे राष्ट्रीय हिंदु आंदोलनाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. नंदुरबार तहसील कार्यालयाजवळ नेहरू पुतळ्यासमोर ही निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी मागण्या आणि घोषणा यांचे विविध फलक झळकवत घोषणा दिल्या.
या प्रसंगी सौरभ पंडित यांनी बालभारतीच्या सहावी इयत्तेच्या पुस्तकात भारताच्या नकाशाचे विकृतीकरण करणार्यांवर आणि तत्सम गंभीर चुका करणार्या संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. जाणीवपूर्वक राष्ट्रीय मानचिन्हांचा हा अपमान केला जात आहे, असे श्री. पंडित या वेळी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिका गिरनार यांनी जागतिक योग दिवस साजरा करतांना ‘ॐ’चे महत्त्व विषद केले आणि शासनाच्या योगदिनाच्या कार्यक्रमातून ‘ॐ’ वगळून भावना दुखावू नये, अशी मागणी मांडली. हिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी जम्मू-काश्मीर येथे ‘हरि पर्वता’चे नाव ‘कोह-ए-मारन’ करण्यात आले असून भाजप शासनाने त्वरित त्याचे नामांतर करावे, अशी मागणीसुद्धा पाटील यांनी मांडली. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सौ. भारती पंडित, भावना कदम, जितू मराठे, राजू चौधरी, रणजित राजपूत, पंकज डाबी आदींचा सहभाग होता.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात